Wednesday, May 6, 2020

सध्याच्या संकटकाळात तथागत गौतम बुद्धाची शिकवण अंगीकारणे गरजेचे - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर



       तथागत गौतम बुद्ध यांनी समस्त जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश दिला. सध्याच्या काळात जगापुढे कोरोनाचे महासंकट उभे राहिले असताना मानवजातीच्या हितासाठी  सर्वांनीच शिस्त, संयम, धैर्य याचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यासाठी तथागत गौतम बुद्ध यांचे विचार अंगीकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
       बुद्धपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील समस्त जनतेला बुद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्त दलितमित्र ललित मेश्राम यांनी भगवान गौतम बुद्ध यांची सुंदर मूर्ती पालकमंत्र्यांना भेट दिली. ही आपल्यासाठी अमूल्य भेट आहे. भगवान गौतम बुद्ध यांचे विचार आपल्याला सतत प्रेरणा देत असतात, असे त्या यावेळी म्हणाल्या. नीरज मेश्राम हेही यावेळी उपस्थित होते.
        पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, सध्याच्या संकटकाळात भगवान गौतम बुद्ध  यांचे विचार जगाला तारून नेतील. तथागत गौतम बुद्ध यांनी सत्य, अहिंसेचा पुरस्कार करताना संयम, धैर्य या मूल्यांची शिकवण जगाला दिली. सध्याच्या काळात ही शिकवण अंगीकारणे खूप गरजेचे आहे. कोरोनाचे महासंकटावर मात करण्यासाठी धैर्य, शिस्त व संयम आवश्यक आहे.
           यानिमित्त सर्व नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी घराबाहेर न पडता घरात राहूनच बुद्ध पौर्णिमा साजरी करावी, असे आवाहनही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले आहे.
०००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...