जिल्ह्यात अडकलेले पंचवीस मजूर, कामगार स्वगृही बिहारला रवाना




 पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवानगी..

अमरावती, दि. 4 : बिहार राज्यातील अमरावती जिल्ह्यात लॉक डाऊनमुळे अडकून पडलेले 25 मजूर बांधव आज विशेष्‍ बसने बिहारकडे रवाना झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आज जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी बसला हिरवी झेंडी दाखवून त्यांना रवाना केले. मजूर बांधवांना टाटा करुन तुमचा प्रवास सुखी होवो च्या सदिच्छाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

यावेळी माजी नगरसेवक हमीद शध्दा, भातकुली काँग्रेस कमेटीचे मुकदम पठाण, उर्दु एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आरीफ हुसैन यांच्यासह सरकार ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.

50 सीटर बसमध्ये 25 मजूर बांधव सदर बसमध्ये प्रवास करीत असून बिहार राज्यातील नवादा जिल्ह्यात त्यांना पोहोचविण्यात येणार आहे. त्यांना स्वगृही पोहोचण्यासाठी 13 तासचा अवधी लागणार आहे. पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नामुळे मजूर बांधवांना अमरावती जिल्ह्यातून बिहार राज्यात प्रवासासाठी परवानगी, आरोग्य तपासणी व इतर आवश्यक बाबीसाठी सहाय्य करण्यात आले आहे. शहरातील चांदणी चौक स्थित सरकार ग्रुपच्या सहकार्याने मजूर बांधवांना त्यांच्या स्वगृही रवाना करण्यात येत आहे. प्रवासात त्यांच्याकरीता भोजनाचे पॅकेटस व पिण्याच्या पाण्याची सुविधाही पुरविण्यात आली आहे.

श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, अनेक दिवसापासून घरापासून दूर असणारे हे कामगार बांधव लवकरच स्वत:च्या घरी परत पोहचतील. परराज्यातील मजूर आणि कामगार यांना लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांच्या त्यांच्या घरी जायला मिळते आहे.

 जिल्ह्यात अडकलेल्या मजूर बांधवांना स्वगृही परतण्यासाठी परवानगी प्रक्रिया गतीने राबविण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. हे मजूर बांधव असल्यामुळे त्यांना शक्य त्या सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार संबंधित सर्व उद्योग, आस्थापना यांच्याकडून अडकलेल्या नागरीकांची यादीही प्रशासनाकडून यापुर्वीच तयार करण्यात आली होती. कोरोना प्रतिबंधासाठी लागू दक्षतेचे सर्व नियम तपासूनच त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली.

रोजगारानिमित्त हे मजूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आले होते. संचारबंदी लागू झाल्यामूळे ते अडकून पडले होते. एकूण 300 कामगार बांधवांना विशेष बसने त्यांच्या त्यांच्या राज्यात पोहोचविण्यात येणार आहे. आज रोजी 25 मजूर बांधवांना रवाना करण्यात आले आहे. यानंतर येत्या काही दिवसात टप्प्या टप्प्याने आणखी उर्वरित मजूरांना रवाना करण्यात येणार आहे.

 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती