Sunday, May 10, 2020

सुरक्षित वावर व आवश्यक दक्षता ही जीवनशैली व्हावीकोरोनाविरुद्धच्या लढाईत नागरिकांची साथ आवश्यक - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


         कोरोना रूग्णांवर उपचार, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा,  दक्षतापालनासाठी सातत्यपूर्ण मोहिमा, अडकलेल्या कामगार बांधवांना स्वगृही पोहोचविणे  अशा अनेक कामांमध्ये विविध यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहेत. अर्थचक्र सुरळीत होण्यासाठी संचारबंदीत शिथीलताही आणण्यात आली असून, त्यामुळे सुरक्षित वावर ठेवण्याची सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे. कुठलाही संसर्ग टाळण्यासाठी यापुढे सोशल डिस्टन्स पाळून सुरक्षित वावर व दक्षता ही जीवनशैली म्हणून अंगीकारावी लागणार असून त्याचा सर्वांनी अवलंब करावा, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.   
          पालकमंत्री श्रीमती ठाकूर या कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून जिल्ह्यातील उपाययोजनांचा आढावा रोज घेत आहेत. कोविड रूग्णालयात उपचारानंतर 15 रुग्ण घरी बरे होऊन परतले आहेत. त्याबद्दल समाधान व्यक्त करत श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, 15 रूग्ण घरी बरे होऊन परतल्याचे वृत्त दिलासादायक आहे. योग्य उपचारानंतर रुग्ण बरे होतात. त्यामुळे कुणालाही लक्षणे आढळून आल्यास त्यांनी स्वत:हून शासकीय रूग्णालयांत जाऊन तपासणी केली पाहिजे. कुठलीही माहिती लपवू नये. अजूनही लढाई संपलेली नाही, ही जाणीव ठेवावी. जीवनावश्यक वस्तूंसाठी बाहेर पडताना मास्कशिवाय बाहेर पडू नये व सोशल डिस्टन्स ठेवावे. आपल्या स्वत:सह इतरांचीही काळजी घ्यावी. 
          त्या पुढे म्हणाल्या की, दक्षतापालन न करणा-या व इतरांचे आरोग्य धोक्यात आणणा-या व्यक्तींवर कारवाई करण्याचे निर्देश यंत्रणांना दिले आहेत. मात्र, कारवाई करण्याची वेळच येऊ नये, यासाठी नागरिकांनीच दक्षता घेऊन आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. जिल्ह्यात अडकून पडलेल्या कामगार बांधवांसाठी सुरक्षेची काळजी घेऊन विशेष रेल्वे व बसची व्यवस्था करण्यात येत आहे. शक्य ते सर्व प्रयत्न होत आहेत. सर्व कामगार बांधवांना सुरक्षितपणे पोहोचविण्यात येईल. त्यामुळे कृपया कुणीही चालत जाऊ नये, असे कळकळीचे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले.  
          त्या पुढे म्हणाल्या की, कोरोना संकटामुळे विविध क्षेत्रांपुढे उभी राहिलेली आव्हाने दूर करण्यासाठी शासनाकडून रोज लोकहिताचे निर्णय घेतले जात आहे. संकटकाळात कोरोनाचा प्रतिबंध करताना विविध क्षेत्रांना शक्य ते सर्व सहाय्य करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शेतकरी बांधवांना खरीप हंगामासाठी नियमित कर्जपुरवठ्याबाबत निर्देश दिले आहेत. कपाशी खरेदीला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत भरड धान्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रात मका व ज्वारी खरेदीसाठी परवानगी देण्यात आल्यामुळे राज्यातील मका व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोविड-19बाबत ग्रामस्थाचे प्रबोधन करून स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्यास प्रवृत्त करण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजनांतून जाणीव जागृती करण्यासाठी जिल्ह्यात 1 हजार 604 स्वच्छाग्रही काम करत आहेत.
          पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, कोरोना संकटकाळात रोज नवे प्रश्न उभे राहत आहेत. त्यांचे निराकरण करत शासन-प्रशासन खंबीरपणे विविध स्तरांवर कार्यरत आहे. अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी शिथिलता आणली तरी दक्षता घेतलीच गेली पाहिजे. कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांचीच असून नागरिकांची त्याला साथ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने मास्कचा वापर व सोशल डिस्टन्स ठेवण्याची दक्षता घ्यावी व कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

                             000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...