Wednesday, May 20, 2020

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मान्सुनपूर्व तयारीचा आढावा

पावसाच्या कालावधीत संपर्क यंत्रणा सुसज्ज ठेवावी

-        जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती, दि. 20 : पावसाच्या कालावधीत अतिवृष्टी पाहता बाधित गावांत तातडीने आपतकालीन सुविधा पुरविण्यासाठी संपर्क यंत्रणा महत्वपूर्ण ठरते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण कक्षात तसेच इतर शासकीय यंत्रणांनी संपर्क यंत्रणा सुसज्ज ठेवावी. आपातकालीन परिस्थिती उद्भल्यास त्याठिकाणी तातडीने मदत पोहोचवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात मान्सुनपूर्व तयारीचा आढावा श्री. नवाल यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. पोलीस अधिक्षक हरीबालाजी एन., निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांचेसह जलसंपदा व महावितरण विभागाचे अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

श्री. नवाल म्हणाले की, मागीलवर्षी ज्या गावात अतिवृष्टी झाली व ज्याठिकाणी पूर परिस्थितीचा धोका आहे, अशा गावांत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविणे आवश्यक असते. त्यांना निवारा, खाद्यान्न सुविधा व आरोग्य सुविधा जिल्हा प्रशासनाव्दारे पुरविण्यात येते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपतकालीन परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपदा निवारण बल, राज्य आपदा निवारण बल यांच्याकडून अधिकारी कर्मचाऱ्यांना 7 जून पूर्वी प्रशिक्षण देऊन कुठल्याही नैसर्गिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी यंत्रणा सुसज्ज ठेवावे.

महावितरण विभागाने ग्रामीण व शहरी भागात आपातकालीन परिस्थितीत विज पुरवठा सुरळीत राहील यासाठी नियोजन करावे. वाढ झालेल्या झाडांची कटाई तसेच अनुषंगीक बाबी सुसज्ज ठेवाव्यात. जलसंपदा विभागाने अप्परवर्धा धरण तसेच इतर धरणातून होणारा विसर्ग, बंधारे तसेच जिल्ह्यातील पुलांची पाहणी करुन दुरुस्तीची व खबरदारीची कामे तत्काळ पूर्ण करुन घ्यावीत. महापालीकेने शहरातील सर्व नाल्यांची पाहणी करुन स्वच्छता आदी करुन घ्यावी. जिल्ह्यात कुठेही जिवीत व मालमत्तेची हानी होणारा प्रसंग उद्भवू नये म्हणून अगोदरच दक्षता घेऊन आवश्यक नियोजन व कामे करुन घ्यावीत. आपातकालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाने बोटस् व अनुषंगीक साधनसामुग्री सुसज्ज ठेवावी.  राज्य राखीव पोलीस बलने सुध्दा त्यांच्याकडील यंत्रणा व नियंत्रण कक्ष सुसज्ज ठेवावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

 जिल्हा प्रशासनाने त्यांच्या अधिनस्त असलेले पर्जन्यमापक यंत्र व विज अटकाव यंत्र नादुरुस्त असल्यास दुरुस्त करुन घ्यावे, यंत्र सुरळीत असल्याचे प्रमाणपत्र संबंधित यंत्रणेकडून 7 जून पूर्वी प्राप्त करुन घ्यावे. जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास पर्जन्यमानचा व अनुषंगिक बाबीचा दैनंदिन अहवाल न चूकता पाठवावा. साथीच्या रोगापासून बचाव करण्यासाठी ग्रामस्तरावर पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. चार महिन्याच्या पावसाच्या कालावधीत अतिवृष्टी किंवा पुरबाधित गावांना धान्य पुरवठ्यासाठी पुरेसा धान्य साठा संचित ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.

नदी लगतच्या तसेच प्रकल्पाच्या आजू बाजूच्या क्षेत्रातील नागरी वस्तींना धोका निर्माण झाल्यास आधीच त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी बचाव पथके तयार ठेवावीत. तसेच अधिक पर्जन्यमान अंदाज घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने अगोदरच पुराच्या लाईन बाहेर शाळा, धर्मशाळा आदि ठिकाणी निवासाची व्यवस्था करावी. अतिसंवेदनशील गावांची यादी तयार करुन त्याठिकाणी पुरेशी आपातकालीन व्यवस्था सुसज्ज ठेवावी. जलसंपदा विभागाने प्रकल्पातील पाण्याची लेव्हल व पाण्याचा विसर्ग याबाबत दैनंदिन अहवाल जिल्हा प्रशासनाला कळवावा, अशा सूचनाही श्री. नवाल यांनी दिल्या.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...