Tuesday, May 5, 2020

बेजबाबदारांवर जिल्हा प्रशासन व पालिकेचा बडगा


 


प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करणा-यांकडून दोन लाख दंड वसूल

           कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी आपत्ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005 तसेच साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 अन्‍वये प्रतिबंधात्‍मक उपाययोजना होत आहेत. त्याचे उल्लंघन करणा-या व्यक्तींविरुद्ध दंडवसुली करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेच्या संयुक्त पथकांनी शहरातील नियमभंग करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करुन त्यांच्याकडून दोन लाख रुपये दंड वसूल केला आहे.

प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून इतरांचे आरोग्य धोक्यात घालणा-या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार महापालिकेकडून या कार्यवाहीला गती देण्यात आली असून, अद्यापपर्यंत दोन लाखांवर दंड वसूल करण्यात आला आहे.

            कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी सार्वजनिक स्‍थळी थुंकण्‍यावर बंदी, चेह-यावर कायम मास्‍क वापरणे, सोशल डिस्‍टन्सिंग पाळणे गरजेचे आहे. या बाबींचे पालन व्‍हावे याकरिता त्याचे उल्‍लंघन करणा-या व्‍यक्‍तींवर दंडात्‍मक व फौजदारी कार्यवाही करण्‍याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडून वेळोवेळी निर्देश देण्यात आले होते.  त्यानुसार महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनीही पथकांना गतिमान कार्यवाहीसाठी स्वतंत्र मोहिम हाती घेण्याचे निर्देश दिले.

            त्यानुसार महापालिका प्रशासनाच्या पथकांकडून 5 एप्रिलपासून शहरात मोहिम राबविण्यात आली. सार्वजनिक स्‍थळी थुंकणे, चेह-यावर कायम मास्क न वापरणे, सोशल डिस्‍टन्सिंग न पाळणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पथकांकडून धडाक्याने कारवाई करण्यात येत आहे.

मास्क लावून न फिरणा-या आतापर्यंत सुमारे सहाशे व्यक्ती व सोशल डिन्स्टन्सिंग न पाळणा-या 46 आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. झोन क्रमांक एकमध्ये  35 हजार 500 रुपये, झोन क्रमांक दोनमधून 66 हजार 900, झोन क्रमांक तीनच्या परिसरातून 22 हजार रुपये, झोन क्रमांक चार मधून 28 हजार 400, तर झोन क्रमांक पाचमधून 49 हजार 200 रुपये अशा एकूण 2 लाख 2 हजार रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.  

सार्वजनिक स्‍थळी थुंकताना प्रथम आढळणा-यास 500 रुपये दंड, दुस-यांदा आढळल्‍यास फौजदारी कार्यवाही, सार्वजनिक स्‍थळी चेह-यावर मास्‍क न वापरणे, प्रथम आढळल्‍यास 200 रुपये दंड, दुस-यांदा आढळल्‍यास फौजदारी कार्यवाही, दुकानदार, फळ, भाजीपाला विक्रेते, सर्व जीवनावश्‍यक वस्‍तू विक्रेते इत्‍यादी आणि ग्राहक यांनी सोशल डिस्‍टन्सिंग न राखणे (2 ग्राहकामध्‍ये कमीत कमी 3 फुट अंतर न राखणे, विक्रेत्‍याने मार्किंग न करणे) 200 रूपये (ग्राहक, व्‍यक्‍ती), रुपये 2000/- (आस्‍थापना मालक, दुकानदार विक्रेता). दुस-यांदा आढळल्‍यास फौजदारी कार्यवाहीची तरतूद आहे. किराणा जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांनी वस्तूचे दर पत्रक न लावल्यास प्रथम दंडात्मक कार्यवाहीचा दंड रु. दोन हजार रूपये व दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी स्वरूपाची कारवाईची तरतूद आहे. 

जिल्‍हाधिकारी कार्यालय व महानगरपालिका, अमरावती यांच्याकडून संयुक्त कार्यवाही होत असून, या पथकांनी शहरात सर्वत्र काटेकोर नजर ठेवून बेजबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी. आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीने शिस्त व कायद्याचे पालन होणे आवश्यक आहे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिले.

                                    000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...