महापालिकेच्या पदाधिकारी व अधिका-यांशी पालकमंत्र्यांशी संवाद

शहराच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी निधी कमी पडू देणार नाही
             -  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

           कोरोना प्रतिबंध उपाययोजनांमध्ये महापालिका या यंत्रणेची भूमिका खूप महत्वाची आहे. अमरावती शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या काळात सर्वांनी एकजूट होऊन काम करण्याची गरज आहे. अमरावती शहरात आरोग्य, स्वच्छता यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली.

            शहरातील उपाययोजनांच्या अनुषंगाने पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी महापालिकेच्या पदाधिकारी व अधिका-यांशी आज ‘झूम’च्या माध्यमातून संवाद  साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहू, स्‍थायी समिती सभापती राधा कुरील, मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे, सभागृह नेता सुनिल काळे, विरोधी पक्षनेता बबलु शेखावत, गटनेता चेतन पवार, गटनेता दिनेश बुब, नगरसेवक मिलींद चिमोटे, विलास इंगोले, प्रकाश बनसोड, बाळासाहेब भुयार, तुषार भारतीय यांच्यासह अनेक पदाधिकारी, अधिकारी या चर्चेत सहभागी झाले होते.  

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना प्रतिबंधासाठी शासनाकडून विविध पावले उचलण्यात आली आहेत. महापालिकेची जबाबदारी मोठी आहे. आपण सर्वांनी मिळून हे शहर सुरक्षित ठेवायचे आहे. त्यासाठी महापालिकेला आवश्यक त्या सर्व यंत्रणा मिळवून देण्यात येतील. शहरात आरोग्य व स्वच्छतेसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. मात्र, स्वच्छतेत सातत्य ठेवले पाहिजे. नागरिकांची गैरसोय होता कामा नये. नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा शासनाकडून मिळवून देण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की,  कोरोनाविरुद्ध लढण्‍यासाठी नागरिकांची चळवळ निर्माण होणे अपेक्षित आहे. यासाठी सर्व नगरसेवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. महानगरपालिकेला आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. आवश्यक  सर्व बाबींचे प्रस्‍ताव सादर करण्‍याच्‍या सूचना यावेळी त्‍यांनी दिल्‍या.

त्या पुढे म्हणाल्या की, शासनातर्फे विविध उपाययोजना करण्‍यात येत असून सर्व लोकप्रतिनिधींना विश्‍वासात घेऊन नियोजन करण्‍यात येईल. महानगरपालिकेने प्रत्‍येक प्रभागात पुन्‍हा सॅनिटायझेशन करण्‍याचे निर्देश त्यांनी दिले.

महानगरपालिकेला आर्थिक सहकार्यासोबतच डॉक्‍टर व इतर यंत्रणा उपलब्‍ध करुन देण्‍यात येईल. मनपा पदाधिका-यांच्‍या सगळ्या सूचना या महत्‍वपूर्ण असून त्‍या पूर्ण करण्यात येईल. वसुंधरा या ॲपच्या धर्तीवर अमरावती कोविड योध्‍दा हे अॅप त्‍वरित कार्यान्वित करण्‍याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.  

 अमरावती महानगरपालिकेतर्फे आरोग्‍य पथकामार्फत सर्वेक्षण झाले असून त्‍याला सर्व नागरीकांनीसहकार्य केले आहे. हाय रिस्क भागात अधिक गतिमान काम सुरु असून या परिसरामध्‍ये मोठ्या प्रमाणात यंत्रणा कार्यान्वित करण्‍यात आली आहे, असे आयुक्तांनी सांगितले.

 

दक्षता नियमांचा प्रत्‍येक नागरिकांनी अवलंब करावा. नियमभंग करणारांवर पोलीस प्रशासनाने करणे अपेक्षित आहे. शिस्तभंग करून इतरांचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कारवाई झाली पाहिजे.पोलीसांनी कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांकडून देण्यात आले. सर्व पदाधिका-यांनी आपापल्‍या परिसरात कोरोना प्रतिबंधाविषयी जनजागृती करावी तसेच कोरोना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे  आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकुर यांनी केले. 

 

अमरावतीत लॅब सुरु झाल्याबद्दल या बैठकीत महानगरपालिकेच्‍या सर्व पदाधिका-यांनी पालकमंत्री श्रीमती  ठाकूर यांचे अभिनंदन केले. शहरातील विविध आवश्यक विकासकामांविषयी यावेळी चर्चा झाली.

                                    000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती