Thursday, May 7, 2020

'मनरेगा’च्या माध्यमातून जिल्ह्यात 48 हजारांहून अधिक व्यक्तींना रोजगार - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


         कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला असतानाच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यात 48 हजार 489 व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. मेळघाटात या कामांना प्राधान्य देण्यात आले असून, घरकुलासह विविध विकासकामांना चालना देण्यात आली आहे, असे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे सांगितले._
         सध्या कोरोना संकटकाळ पाहता संचारबंदी लागू आहे. या काळात ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मनरेगाच्या माध्यमातून अधिकाधिक कामांना चालना देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार या कामांबाबत आढावाही त्यांनी वेळोवेळी घेतला. त्यानुसार आजमितीला जिल्ह्यात 48 हजार 489 मजूर उपस्थिती आहे. मजुरांची उपस्थिती सातत्याने वाढत असून त्याप्रमाणे विविध विकासकामांना गती देण्यात येत आहे.
         लॉकडाऊनमुळे उद्योग व व्यापारावर अवलंबून असलेल्या नागरिकांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात उपजीविकेचा प्रश्न बिकट सोडविण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरुपाच्या कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिल्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध होत आहेत. या कामांवर मोठी रोजगारनिर्मिती होत आहे.          मनरेगाच्या माध्यमातून ‘मागेल त्याला काम’ देण्याचा संकल्प असल्यामुळे तात्काळ कामे सुरु करण्यात आली. मागेल त्याला रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या या योजनेमुळे रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात  सुटला आहे.  त्यामुळे कामासाठी कुठेही बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. मेळघाटात अधिकाधिक रोजगारनिर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे. दि. 7 मेच्या प्राप्त माहितीनुसार, चिखलदरा तालुक्यात सुमारे 24 हजार 500, तर धारणी तालुक्यात सुमारे 10 हजार 800 मजूर उपस्थिती आहे.  जिल्ह्यात 615 गावांत  मनरेगाच्या माध्यमातून सुमारे तीन हजार विविध विकासकामांना चालना देण्यात आली असून, मजूर उपस्थिती वाढत आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.  
          राज्यात 3 लाख 81 हजार 930 लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यात आजच्या आकडेवारीनुसार 48 हजार 489 मजूर उपस्थित आहेत.  मजुरांची ही संख्या सातत्याने वाढत असून प्रत्येक तालुकास्तरावर मागणी नुसार कामांचे नियोजन करण्यात आले आहे. या कामामुळे गावांमध्ये अत्यावश्यक तसेच शेतीसाठी आवश्यक असलेल्या वैयक्तिक  कामांची निवड करणे सुलभ झाले आहे. रोजगार हमीच्या कामांवर पूर्वी 206 रुपये मजुरीचा दर होता. परंतु 1 एप्रिलपासून या दरात वाढ करण्यात आली आहे. प्रतिदिन 238 रुपये याप्रमाणे किमान मजूरी देण्यात येते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे बांधकामाला प्राधान्य देण्यात आले असून राज्यात मोठ्या प्रमाणावर बांधकाम पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी मनरेगाअंतर्गत कामांना सुरुवात करावी, असेही आवाहन करण्यात येत आहे.
          लॉकडाऊनचा पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध भागात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामांना सुरुवात केली आहे. यामध्ये वैयक्तिक लाभाच्या तसेच सामूहिक विकास कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी ही योजना वरदान ठरत आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
           मनरेगातून आजच्या आकडेवारीनुसार अचलपूर तालुक्यात 221, अमरावतीत 113, अंजनगाव सुर्जी येथे 189, भातकुली येथे 136, चांदूर रेल्वेत 109, चांदूर बाजारमध्ये 202, चिखलद-यात 668, दर्यापूरमध्ये 300, धामणगाव रेल्वेत 60, धारणी तालुक्यात 395, मोर्शीत 303, नांदगाव खंडेश्वरमध्ये 92, तिवसा येथे 180, वरूडमध्ये 138 अशी एकूण 3 हजार 106 कामे राबविण्यात येत आहेत.

                                        0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...