Monday, May 25, 2020

पालकमंत्र्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय ऑनलाईन सेमिनारचे उद्घाटन




क्रीडा क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढणे आवश्यक

                   -  महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 25 : धकाधकीच्या आजच्या जीवनात निरामय आरोग्य व मानसिक व्यवस्थापनासाठी योग व खेळ अत्यंत आवश्यक आहेत. शारीरिक शिक्षणामुळे नेतृत्व गुणांचा विकास होतो. त्यामुळे महिलांनी योग व खेळाचा अवलंब दैनंदिन जीवनात केला पाहिजे, तसेच क्रीडा क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केली.   

श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय ऑनलाईन सेमिनार व कार्यशाळा ‘झूम’च्या माध्यमातून झाली. त्याचे उद्घाटन करताना महिला व बालकल्याण मंत्री श्रीमती ठाकूर यांच्या बोलत होत्या. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह विविध तज्ज्ञ या सेमिनारमध्ये सहभागी झाले.

 2020 या वर्षात ‘शारीरिक शिक्षण क्षेत्रातील नवी आव्हाने व संधी’ या विषयाच्या अनुषंगाने आरोग्य, मानसिक व्यवस्थापन, पोषण, योगशास्त्र, पर्यावरण, क्रीडा पर्यटन व विपणन, स्त्री सक्षमीकरण, माहितीविज्ञान, आर्थिक वृद्धी व बहुमाध्यम विकास असे विविध विषय या सेमिनारमध्ये चर्चिले गेले.  महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे व आयोजन सचिव डॉ. पी. एस. सयार यांच्यासह विविध तज्ज्ञ उपस्थित होते.

सेमिनारचे उद्घाटकीय भाषण करताना महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, शारीरिक शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. आजच्या धकाधकीच्या काळात तर ताणतणावांचे निरसन करणे, शरीर व आरोग्य सुदृढ ठेवणे यासह नेतृत्व गुणांच्या विकासासाठीही क्रीडा व योग यांचा अवलंब करणे उपयुक्त ठरते. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात महिलांचाही सहभाग वाढला पाहिजे. त्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहेत.

त्या पुढे म्हणाल्या की, महिला व बालविकास विभागाकडून महिला व बालकांसाठी पोषणाबाबत विविध योजना राबविण्यात येतात. सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाले. त्यामुळे पोषण आहार उपक्रमात अडथळा आल्याने माता आणि बालकांच्या पोषण आहारात खंड पडू नये यासाठी आम्ही घरपोच शिधा पुरविण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी होत आहे. पोषणाच्या अनुषंगाने आवश्यक सामग्रीपासून एकही व्यक्ती वंचित राहू नये यासाठी संपूर्ण दक्षता घेतली जात आहे. अंगणवाडी सेविका हा गावपातळी, परिसर स्तरावरील महत्वाचा घटक असतो. त्यामुळे त्यांना सक्षम करण्यासाठी आम्ही विविध निर्णय घेतले आहेत. अमृत आहार योजनेत दिला जाणारा चौरस आहार व इतर उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

 कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी राज्य महिला आयोगाकडून हेल्पलाईन आदी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.  महिलांवरील कौटुंबिक अत्याचार रोखण्यासाठी मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल करणे आवश्यक असून तरुण पिढीला शिक्षणातून याविषयीच्या नैतिक मूल्यांचे धडे देण्याची गरज आहे. महिलांनीही खंबीर राहून वेळोवेळी व्यक्त झाले पाहिजे. मूक राहत अन्याय सहन करणे अत्यंत चुकीचे आहे. बोलत राहा, व्यक्त व्हा. खेळ, योग यांच्या अवलंबाने साहस, नेतृत्व, चिकाटी गुणांचा विकास होतो. त्यामुळे त्याचा अंगीकार केला पाहिजे. या अनुषंगाने क्रीडा विकासासाठी विविध संकल्पना पुढे येण्यासाठी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या चर्चासत्र उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मलेशिया विद्यापीठासह विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठातील सुमारे 950 तज्ज्ञांनी या चर्चासत्र व कार्यशाळेत भाग घेतला, अशी माहिती प्राचार्य श्रीमती ठाकरे यांनी दिली.

 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...