धारणी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका प्रशासनाकडून विविध उपाययोजनांची काटेकोर अंमलबाजवणी - सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी


 

 

अमरावती, दि. 21 : जगभरातील अनेक देशासह भारतात आणि महाराष्ट्रात देखील कोरोना विषाणूचा (कोविड 19 आजाराचा) प्रसार झालेला आहे. या विषाणूचा अधिक प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक खबरदारी व उपाययोजना म्हणून जिल्हयात संचारबंदी लागू केलेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव धारणी तालुक्यात होऊ नये म्हणून महसूल प्रशासनाकडून सुध्दा योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे, अशी माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी आज दिली.

उपविभागातील रहिवाशी असलेले नागरीक मोठ्या प्रमाणावर इतर जिल्ह्यातून तसेच राज्यातून स्वगावी परतत आहेत. तालुक्यात परतणाऱ्या नागरीकांमध्ये ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही, अशा कुटुंबाचा शोध घेऊन कोविड 19 आजाराची आरोग्य तपासणी व माहिती होण्यासाठी गाव पातळीवर समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील तसेच स्वयंसेवी संस्था यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने धारणी, चिखलदराच्या तहसीलदारांना दिशानिर्देश देण्यात आले असून दि. 25 मे पासून मोहिमेला सुरुवात होणार असून एक महिन्याच्या आत मोहिम पूर्ण होणार आहे.

तालुक्यात कोविड 19 आजारासंबंधी व्यापक जनजागृती होण्यासाठी तसेच अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी धारणीच्या वसंतराव नाईक महाविदयालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे सहाय्य घेण्यात आले आहे. सदर विद्यार्थ्यांकडून कोरोना विषाणू संदर्भात जनजागृती, गर्दी टाळण्याचे उपाय व सोशल डिस्टन्सिंगचे महत्व नागरिकांना पटवून देण्यात येत आहे.

तालुक्याच्या बँकेतील तसेच इतर कार्यालयातील नागरिकांची गर्दीचे नियंत्रण ठेवण्यासाठी, सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी उपविभागीय कार्यालय व प्रकल्प कार्यालयाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

धारणी तहसील कार्यालयाकडून गरजू व्यक्तींना राशन किट व धान्य वाटप करण्यात येत आहे. गृह व संस्थात्मक विलगीकरणात ठेवलेल्या व्यक्तींना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यांच्या देखरेखीसाठी गटविकास अधिकाऱ्यांची नेमून देण्यात आले आहे. बाहेर जिल्ह्यातून तसेच परराज्यातून येणाऱ्या वयक्तींची ग्रामीण रुग्णालयात आवर्जून वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे.

तालुक्यात ठिकठिकाणी गर्दीच्या ठिकाणी तसेच विविध जीवनावश्यक वस्तू विक्रीच्या दुकानांत धारणी नगर पंचायतीतर्फे हात धुण्यासाठी हँडवॉश उपलब्ध करुन देण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी भरणारा आठवडी बाजार बंद करण्यात आला आहे. तालुक्यात एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून जमाबंदीचे आदेश लागू करण्यात आले असून भाजीपाला, फळे व इतर आवश्यक वस्तूंचा बाजार एपीएमसीच्या मैदान व जिल्हा परिषदेच्या मैदानवावर भरविण्यात येत आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्याकरीता पोलीस प्रशासनामार्फत सर्व सिमांवर नाकाबंदी करण्यात आली असून कोणत्याही व्यक्तीस अथवा वाहनास विनापरवानगी प्रवेश नाकारण्यात येत आहे. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी महसूल प्रशासनाकडून एकल खिडकी योजना राबविण्यात येत आहे, असे धारणीच्या सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती