अत्यावश्यक सेवा व मुलभूत सुविधांना गुरुवारपासून सूट - जिल्हाधिकारी शैलेश नवाल


·       शनिवार दुपार ते सोमवार सकाळ पर्यंत दुकाने राहतील बंद
·       मुख्य बाजारपेठा बंद; अंतर्गत भागातील केवळ एकल दुकांनाना परवानगी
·       शहरात सुरु असलेली बांधकामे दक्षता पाळून पूर्ण करता येणार

          कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात 17 मेपर्यंत संचारबंदी लागू आहे. तथापि, नागरिकांच्या सुविधेसाठी राज्य शासनाच्या आदेशान्वये काही अत्यावश्यक सेवा व मूलभूत सुविधांना उद्यापासून (7 मे) सूट देण्यात आली असून, सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत त्या सुरू राहतील. मुख्य बाजारपेठेतील व मॉल्समधील दुकाने बंद राहणार असून, कॉलनी, गृह संकुल व गल्लीतील दुकाने सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. एखादे दुकान सुरु किंवा बंद करण्याबाबत निर्णयाचे अधिकार महापालिका आयुक्त, नगरपालिका मुख्याधिकारी यांना असतील. ग्रामीण भागातील मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकाने सुरु ठेवता येतील.
           दर आठवड्यात शनिवारी दुपारी 3 पासून ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या काळात दुकानांची साफसफाई, स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात यावे. तसे होत असल्याची खातरजमा पालिकेच्या पथकांनी आकस्मिक भेट देऊन करावी असे ही निर्देश आहेत.   
          तसा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जारी केला.  त्यानुसार अमरावती शहर व ग्रामीण जिल्ह्यातील सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेत सुरु राहतील.  ग्रामीण क्षेत्रातील सर्व प्रकारची बांधकामे करण्यास मुभा असेल. शहरी भागात महानगरपालिका व नगर परिषद/नगर पंचायत क्षेत्रातील सुरु असलेली बांधकामे पूर्ण करता येतील. ज्या ठिकाणी काम आहे त्याच ठिकाणी मजूर राहतील व मजुरांची वाहतुक होणार नाही या अटीवर काम सुरु राहील. नविनीकरण उर्जा प्रकल्पाचे बांधकाम करता येईल. मात्र त्या त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी व दक्षता नियमांचे पालन आवश्यक आहे.
        ग्रामीण भागातील सर्व प्रकारचे औद्योगिक उपक्रम यांना परवानगी असेल. शहरी भागात औद्योगिक वसाहती व औद्योगिक टाऊनशिपमधील उद्योग नियंत्रित प्रवेश ठेवून सुरु करता येतील. विशेष आर्थिक्‍ क्षेत्र, औद्योगिक वसाहत व वस्ती, जीवनावश्यक वस्तु निर्मिती उद्योग, त्यांना पुरवठा करणारे साखळी उद्योग, माहिती व तंत्रज्ञान संबंधित उपकरणे निर्मिती उद्योग, पँकीग मटेरिअल उद्योग यांना परवानगी असेल. जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे उद्योग, जसे औषधी उत्पादन, वैद्यकीय उपकरणे व त्या संबंधी लागणारा कच्चा माल सुरु राहतील तसेच सतत प्रक्रिया करावे लागणारे उद्योग आणि त्याची पुरवठा साखळी आवश्यक असणारे उद्योग. त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिका-यांनी अमरावती यांनी आवश्यकतेप्रमाणे पासेस निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व उद्योग शिफ्टनिहाय व सामाजिक अंतराचे नियम पाळून सुरु करण्याचे निर्देश आहेत.    
            शहरी भागातील महानगरपालीका, नगर परिषद, नगर पंचायत हददीतील मॉल्स बाजार संकुल, व बाजारातील अत्यावश्यक वस्तु विक्री करणाऱ्या दुकांना व्यतिरिक्त इतर दुकाने बंद राहतील. त्याचप्रमाणे Containment Zone वगळून शहरी भागातील सर्व प्रकारची जिवनावश्यक व बिगर जिवनावश्यक स्वतंत्र (Standalone) दुकाने, कॉलनी दुकाने, व निवासी संकुलातील दुकाने सुरु करता येतील. गल्लीत 5 पेक्षा जास्त दुकाने असू नये. गल्ली/रस्त्यावर 5 किंवा त्यापेक्षा जास्त दुकाने असल्यास त्यातील केवळ जिवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु राहतील.  घरपोच सेवा देण्याबाबत जास्तीत जास्त कार्यवाही करण्यात यावी जेणेकरुन कुठेही गर्दी होणार नाही. ग्रामीण भागातील मॉल्स व्यतिरिक्त सर्व दुकाने सुरु करता येतील. वरील सर्व शहरी व ग्रामीण भागातील दुकाने सुरु करतांना Social Distancing, 5 पेक्षा जास्त ग्राहक एका वेळी नसणे, दुकानासमोर वर्तुळ आखणे, परिसर दर 2 तासांनी निर्जंतुकीकरण करणे, मास्क वापरणे, हँडवॉश, सॅनीटायझरचा वापर करणे, दुकानाची वेळ व दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक राहील. वरील सर्व दुकानांची वेळ सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 वा. अशी असेल. रुग्णालये, औषधी दुकाने, पूर्णवेळ सुरु राहतील. मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्याबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील.
            मिठाई  व खाद्यपदार्थाची दुकाने येथे केवळ पॅकींग वस्तु विकाव्या व तेथे ग्राहकांनी बसुन खाऊ नये व तेथे केवळ पार्सलची व्यवस्था असावी. जास्तीत जास्त ग्राहकांना घरपोच सेवा (Home Delivery) मिळण्याकरीता व दुकाने/गोदाम यांना सुरु ठेवण्याबाबत आयुक्त महानगरपालीका, मुख्याधिकारी नगर परिषद/नगर पंचायत यांनी नियोजन करावे व आवश्कतेप्रमाणे पासेस निर्गमित कराव्यात, खाजगी कार्यालये ही 33%  कर्मचारी आस्थापनेसह सुरु ठेवावी इतर कर्मचारी यांनी घरुनच काम करावे, असे निर्देश आहेत.
            कृषी यंत्रणेची दुकाने, त्यांचे सुटे भाग (पुरवठा साखळी सह) व दुरुस्ती करण्याकरीता सदर प्रतिष्ठाने सुरु ठेवण्याबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी त्यांचे स्तरावरुन परवानगी प्रदान करण्याबाबत कार्यवाही करावी व आवश्कतेप्रमाणे पासेस निर्गमित कराव्यात तसेच कृषी कामांकरीता अडथळा निर्माण होणार नाही या अनुषंगाने नियोजन करण्यात यावे. मासेमारीच्या अनुषंगाने असलेली सर्व व्यवसाय सुरु राहतील. मासेमारी व अनुषांगीक व्‍यवसायाकरिता वाहतुकीची मुभा राहील.
            दुध संकलन करणे त्‍यावर प्रक्रिया करणे, त्‍याचे वितरण व विक्री सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 वा.पर्यत चालू राहील.
बँका सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत सुरु राहतील. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, यांची वाहतुक वितरण , साठवण व विक्री सुरु राहील. पेट्रोल पंप व डिझेल पंप (सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 वा.पर्यत) या वेळेव्यतिरिक्त सर्वसामान्य नागरीकांना बंद राहतील. केवळ अत्यावश्यक सेवा,वाहतूकदारांना/शासकिय सेवा वाहतूकदारांना सुरु राहील.
            सोशल डिस्टंसिंग न पाळणे, मास्क न वापरणे, सार्वजनिक स्थळी थुंकणे, दुकानावर दर पत्रक न लावणे अशा बाबी आढळल्यास दंडनिय कारवाई करावी असे आदेश आहेत.

 

लॉकडाऊनच्‍या कालावधीत खालील सेवा प्रतिबंधीत राहतील.

1. सुरक्षेच्‍या उद्देशाशिवाय रेल्‍वे मधुन सर्व प्रवासी हालचाल बंद राहील.

2. सार्वजनिक वाहतुकीसाठीच्‍या बसेस बंद राहतील.

3. वैद्यकीय कारणाशिवाय किंवा या मार्गदर्शक तत्‍वानुसार परवानगी असलेल्‍या व्‍यक्‍ती वगळुन इतर

     व्‍यक्‍तींना आंतर जिल्‍हा व आंतर राज्‍य संचारणास बंदी राहील.

4. सर्व शैक्षणीक प्रशिक्षण, संस्‍था व शिकवणी वर्ग बंद राहतील.

5. या मार्गदर्शक तत्‍वानुसार विशेष परवानगी असलेल्‍या व्‍यतीरिक्‍त इतर सर्व औद्योगीक व वाणिज्यिक आस्‍थापना बंद राहतील.

6. या मार्गदर्शक तत्‍वानुसार विशेष परवानगी असलेल्‍या परवान्‍याशिवाय अतिथ्‍य सेवा बंद राहतील.

7. सर्व सिनेमा हॉल, मॉल, शॉपिंग कॉम्‍पलेक्‍स, व्‍यायामशाळा व क्रिडा कॉम्‍पलेक्‍स, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि सभागृह, असेब्‍ली हॉल व इतर तत्‍सम ठिकाणे.

8.  सर्व सामाजिक धार्मिक कार्ये, सांस्‍कृतीक, शैक्षणिक, करमणुक,खेळ, राजकीय, इतर मेळावे.

9. सर्व धार्मिक स्‍थळे तसेच धार्मिक कार्यक्रम परिषदा, पुजेची ठिकाणे भाविकासाठी बंद ठेवण्‍यात  

     इत्‍यादीवर बंदी राहील.

10. तंबाखू, तंबाखूजन्‍य विक्री करणारी सर्व प्रतिष्‍ठान/ पानटपरी चालु ठेवण्‍यास मनाई राहील.

11. सलून, स्पा, कटिंग, ब्यूटी पार्लर इ. दुकाने बंद राहतील.

 12. कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती यांच्याकडील भाजी बाजार येथील भाजीपाला व फळे यार्ड दिनांक

      17 मे 2020 पर्यंत बंद राहील.

   

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती