Saturday, May 2, 2020

पालकमंत्र्यांची माजी आमदार बी. टी. देशमुख यांच्याशी चर्चा


कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जोखमीच्या क्षेत्रात उपविभाग करून सूक्ष्म नियोजन आवश्यक
पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
अमरावती, दि. २ : कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने अधिक प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज ज्येष्ठ नेते व माजी शिक्षक आमदार बी. टी. देशमुख यांच्याशी चर्चा करून मार्गदर्शन घेतले. 
 
त्यानुसार कंटेन्मेंट झोन व जोखमीच्या क्षेत्रात उपविभाग तयार करून सर्वेक्षण, तपासणी यांची संख्या वाढविण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

 जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी कंटेन्मेंट झोन व जोखमीच्या परिसरात उपविभाग तयार केले पाहिजेत. सूक्ष्म नियोजनाद्वारे प्रभावीपणे उपाययोजनांची अंमलबजावणी केली पाहिजे, अशी सूचना श्री. देशमुख यांनी केली. जिल्ह्यात आतापर्यंत झालेली उपाययोजनांची अंमलबजावणी, जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचना, स्थानिक स्थिती, संभाव्य स्थिती व प्रादुर्भाव थांबविण्यासाठी नव्याने करावयाचे उपाय आदी बाबींसंदर्भात सविस्तर चर्चा यावेळी झाली. 

जोखमीचे क्षेत्राकडे अधिक लक्ष केंद्रित होणे आवश्यक आहे. तपासण्याची संख्या वाढवली पाहिजे. कंटेन्मेंट झोन परिसराचे उपविभाग करून त्यात अधिक जोखमीचा परिसर, कमी जोखीम असलेला भाग असे वर्गीकरण करून तीव्रतेनुसार कार्यवाही व्हावी. त्यामुळे अतिजोखमीच्या परिसरात अधिक प्रतिबंधक उपाय योजणे, आवश्यक पथक नेमणे, तपासणी, संशयितांची माहिती मिळवणे, थ्रोट swab घेणे आदी कामे प्रभावीपणे करणे शक्य होईल. त्यानुसार प्रशासनाने कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

श्रीमती ठाकुर यांनी माजी आमदार बीटी देशमुख यांची भेट घेऊन कोरोनाच्या संकटावर मात करण्याकरिता त्यांच्या दिर्घ अनुभवातून काही मार्गदर्शन मिळावे याकरिता चर्चा केली.
कोरोनाचे संकट कोण्या एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून सकल मानवजातीवर आलेले हे संकट आहे. अशा परिस्थितीत राजकारणापलिकडे वर जाऊन प्रखर इच्छाशक्तीने व मोठ्या मनाने काम करण्याची आवश्यकता असते. जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकुर यावर तंतोतंत खरऱ्या उतरल्या आहेत. माजी आ.बी.टी
 देशमुख यांची भेट घेऊन त्यांनी हे सिध्द करुन दाखविले. बी.टी.देशमुख यांनी आपल्या आयुष्याचे दोन तप समाजकारण व राजकारणासाठी वाहिले आहे. अशा व्यक्तीच्या दीर्घ अनुभवाचा व मार्गदर्शनाचा या संकटाकाळात फायदा व्हावा याकरिता पालकमंत्री ठाकुर यांनी त्यांची भेट घेऊन कोरोना संक्रमण रोखण्याकरिताच्या नव्या उपाययोजनांवर चर्चा केली. यावेळी बी.टी. देशमुखांनीसुध्दा आपले मोलाचे मार्गदर्शन पालकमंत्र्यांना केले व उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...