Monday, May 11, 2020

गारपीटग्रस्त भागात सर्वेक्षणाचे निर्देश शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर


अमरावती, दि. 11 : कोरोनाच्या संकटाशी मुकाबला सुरू असतानाच काल जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होऊन नैसर्गिक संकट उभे राहिले आहे. तथापि, शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. प्रशासनाने गारपीटग्रस्त भागातील पीक नुकसानीबाबत सर्वेक्षण करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यात चिखलदरा, कारंजा बहिरम, अचलपूर, दर्यापूर, तिवसा, चांदूर बाजार, वरूड, मोर्शी, धामणगाव आदी परिसरात जोरदार पाऊस व काही ठिकाणी गारपीट झाली. काही ठिकाणी पीकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करण्यात यावे. आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन सविस्तर सर्वेक्षण करावे. एकही बाब सुटता कामा नये, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

सध्या कोरोना प्रतिबंधामुळे संचारबंदी लागू आहे. शेतीची कामे, शेतीसंबंधित उद्योग- व्यवसाय सुरु आहेत. तथापि, संचारबंदीचा परिणाम कृषी क्षेत्रावरही झाला आहे. त्यामुळे या काळात शेतकरी बांधवांपुढील विविध अडचणींचे वेळीच निराकरण झाले पाहिजे. खरीप पतपुरवठ्याला गती देण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत. त्याबाबत बँकांनी काटेकोरपणे कार्यवाही करावी. शेतकरी बांधवांची अडवणूक होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

            मेळघाटातही गारपीट झाली आहे. तिथेही परिपूर्ण सर्वेक्षण करावे. लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावल्याने अनेक आदिवासी कुटुंबांसमोर आर्थिक संकट आले आहे. अशा वेळी त्यांना मदत करण्यासाठी शासनाच्या आदिवासी विकास विभागमार्फत खावटी अनुदानाच्या स्वरुपात मदत देण्यात येणार आहे. विभागाने त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

 

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, कोरोना विषाणूच्या  संसर्गाच्या अनुषंगाने  करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आदिवासीं बांधव व शेतकरी बांधवांसमोर अनेक आर्थिक समस्या उभ्या राहिल्या आहेत. या समस्यांचे निवारण करण्यासाठी विविध पावले शासनाकडून उचलण्यात आली आहेत. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेत कामांना गती देण्यात आली आहे.  ग्रामीण भागात उपजीविकेचा प्रश्न बिकट सोडविण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरुपाच्या कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिल्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध होत आहेत. या कामांवर मोठी रोजगारनिर्मिती होत आहे.  मनरेगाच्या माध्यमातून ‘मागेल त्याला काम’ देण्याचा संकल्प असल्यामुळे तात्काळ कामे सुरु करण्यात आली. मागेल त्याला रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या या योजनेमुळे रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात  सुटला आहे. अमरावती जिल्ह्यात 48 हजारांहून अधिक व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सध्याच्या संकट काळात विविध क्षेत्रांपुढे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. मात्र, विविध उपाययोजनांतून शासन- प्रशासन त्यावर खंबीरपणे मात करण्याचा प्रयत्न करत आहे. या उपाययोजनांपासून एकही नागरिक वंचित राहता कामा नये, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. नागरिकांनीही या काळात कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी आवश्यक दक्षता घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले.

                                    000 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...