जिल्ह्यात 10 हजारांहून अधिक परिचारिका, आरोग्यसेविकांचे आरोग्य सेवेत योगदान

महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा

                       

अमरावती, दि. 11 : सेवा हे ब्रीद घेऊन आयुष्यभर रुग्णांची शुश्रुषा करणा-या परिचारिका, आरोग्य सेविका या आरोग्य यंत्रणेचा कणा असून, कोरोना संकटावर मात करण्यासाठी त्यांचे अमूल्य योगदान मिळत आहे. जिल्ह्यात सुमारे 10 हजार परिचारिका, आरोग्य सेविका, मदतनीस कार्यरत असून, त्या अविरतपणे अहोरात्र काम करत आहेत.

संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी, दुर्गम भागात आरोग्यसुविधा पोहोचविण्यात, आरोग्य सेवा वितरणात, नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्य पुरविण्यास आणि आता कोरोनासारख्या महाभयंकर संसर्गजन्य विषाणूशी लढण्यासाठी परिचारिका सदैव   तत्पर आहेत. आधुनिक शुश्रुषा शास्त्राच्या संस्थापक म्हणून ओळखल्या जाणा-या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा 12 मे हा जन्मदिवस आहे. त्यांच्या  सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो. यानिमित्त अखंड सेवेचे व्रत घेतलेल्या परिचारिकांना मनस्वी सलाम करते, अशा शब्दांत राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी परिचारिका व आरोग्यसेविका भगिनींना शुभेच्छा दिल्या आहेत.

 आधुनिक परिचर्येचा पाया घालणा-या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस अर्थात 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे.  कोरोनासारखे महाकाय संकट संपूर्ण विश्वात घोंगावत असताना आपली आरोग्य यंत्रणा जीवाची बाजी लावून रुग्णांना उपचार करीत आहेत. या सर्व प्रक्रियेत रुग्णांची संपूर्ण सेवा  करण्याचे महत्वाचे काम परिचारिका करत  आहेत.

रुग्ण हा डॉक्टरांपेक्षा जास्त वेळ परिचारिकेच्या देखरेखीखाली असतो. रुग्ण सर्वात प्रथम परिचारिकाच्या संपर्कात येतो.  रूग्णांवर मायेची फुंकर घालून त्यांची अहोरात्र सेवा करत स्वतःच्या आयुष्यातला काळोख विसरून रूग्णाच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते.  जिल्ह्यामधील विविध रूग्णालयांत दहा हजारांहून अधिक परिचारिका, आरोग्यसेविका, मदतनीस या तपासणी, उपचार, अतिदक्षता वॉर्डात उपचार अशा विविध कामांत योगदान देत आहेत. 

सध्याच्या युगातील बदललेले वातावरण, असाध्य रोगात झालेली वाढ, विविध संसर्गजन्य आजार व सध्याचा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव यामुळे जगभरातील सगळ्याच देशात परिचर्या सेवेची मागणी वाढत आहे.  कोविड 19 आजारांच्या नियंत्रणामध्ये परिचारिकांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. कारण परिचारिका हा आरोग्य यंत्रणेतील मोठा समूह मजबूत कणा आहे. त्यांच्यामुळेच उपचार योग्यपद्धतीने होण्यास मदत होत आहे, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

 पारिचारिका, आरोग्यसेविका, मदतनीस भगिनी या डॉक्टरांच्या बरोबरीने रुग्णांना उपचार देत आहेत. परिचारिका ज्यावेळी आपल्या अभ्यासाला सुरुवात करून थेट रुग्ण सेवा प्रशिक्षणास सुरुवात करतात. त्यावेळी  या व्यवसायाशी निगडित शपथ घेतात किंवा प्रतिज्ञा करतात. ती शपथ खूपच प्रेरणादायी आहे, त्याचा वेगळा सोहळा हा प्रत्येक नर्सिंग कॉलेजमध्ये पार पडत असतो. या प्रतिज्ञेशी बांधील राहून या भगिनी आयुष्यभर सेवेत अविरत असतात. जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, स्त्री रूग्णालय, विभागीय संदर्भ रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तालुका रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे, महापालिका रुग्णालये, नगरपालिका रुग्णालय याशिवाय विविध संस्थांची, तसेच  रुग्णालयांत शुश्रुषेद्वारे रुग्णांना निरामय आयुष्य मिळण्यासाठी धडपडणा-या या सर्व सेविकांबद्दल जागतिक परिचारिका दिनानिमित्त  विविध स्तरांतून कृतज्ञता व्यक्त होत आहे.

                                                000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती