‘आयुष्मान भव’ अभियानाचा जिल्ह्यात मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ; 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत राबविणार विविध उपक्रम

 









‘आयुष्मान भव’ अभियानाचा जिल्ह्यात मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ;

17 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत राबविणार विविध उपक्रम

 

      अमरावती, दि. 13 : देशवासियांच्या निरोगी आयुष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आयुष्मान भव:’ मोहिमेची सुरूवात करण्यात आली आहे. या मोहिमेचा जिल्हास्तरावर शुभारंभ आज जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला. आयुष्मान भव: ही महत्त्वांकाक्षी मोहिम जिल्हास्तरावर दि. 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत विविध उपक्रमाच्या माध्यमातून राबविली जाणार आहे.

 

        आयुष्मान भवः मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवि राणा, परिविक्षाधीन अधिकारी नरेश अकुनूरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.बनसोड, निवासी वैद्यकीय अधिकारी संदीप हेडाऊ, आयुष्यमान भारतचे जिल्हा समन्वय डॉ. अंकिता मेटांगे आदी उपस्थित होते.

 

       

        खासदार डॉ. बोंडे म्हणाले, सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याचे महत्त्वाचे काम वैद्यकीय अधिकारी करीत आहे. कोरोना महामारीच्या काळात डॉक्टरांनी केलेले कार्य असाधारण आहे. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना ही सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू ठेवून केंद्र व राज्य शासनाव्दारे राबवित आहे. दुर्धर आजाराच्या उपचारासाठी ही योजना वरदान ठरत असून गरीबांना त्यांचा लाभ मिळत आहे. आरोग्य विभागांनी गावपातळीपर्यंत गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

        आमदार रवि राणा म्हणाले की, शासनाव्दारे सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य विषयक अनेक योजना राबविण्यात येतात. ह्या योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. यासाठी तालुका व ग्रामस्तरावर शिबिराचे आयोजन करावे. स्थानिक स्तरावर शिबिरासंदर्भात जनजागृती करुन जास्तीतजास्त लोकांचे आरोग्य तपासणी करुन घ्यावी. त्यांना उत्तम दर्जाचे उपचार देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

         

        जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांनी प्रास्ताविकेत सांगितले की, आयुष्मान कार्डच्या माध्यमातून सामान्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे शक्य होणार असून  यासाठी "आयुष्मान भव:" ही महत्तवांकाक्षी मोहिम 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत राबविली जाणार आहे. मोहिमेत पात्र लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड नोंदणी करून त्याचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विभागाव्दारे आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी, रक्तदान मोहिम, अवयवदान जागृती मोहिम, स्वच्छता मोहिम, १८ वर्षांवरील पुरुषांची आरोग्य तपासणी अशा मोहिम आरोग्य मेळाव्यात राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन उद्धव जुकरे यांनी तर आभार प्रदर्शन सुनिल वाठोडे यांनी मानले.

 

मान्यवरांच्या हस्ते कार्ड वितरण

 

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य या एकत्रित योजनेच्या कार्ड वाटप करण्यात आले. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात  उल्लेखनीय काम केलेल्या "निक्षय मित्र" यानांही यावेळी गौरविण्यात आले. तसेच कार्यक्रम दरम्यान उपस्थितांना अवयव दान करण्याबाबत शपथ देण्यात आली.

 

‘राष्ट्रीय पोषण माह’ रॅलीला दाखविली हिरवी झेंडी

 

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत दि. 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत ‘राष्ट्रीय पोषण माह 2023’ राबविण्यात येत  आहे. त्याअनुषंगाने आज जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथून सकाळी रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपीप सौंदळे  व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला.

 

        रॅलीची सुरुवात  जिल्हा सामान्य रुग्णालय प्रांगण येथून सुरु होऊन इर्विन चौक, रेल्वे स्टेशन मार्गे उस्मानिया मस्जिद येथून परत जिल्हा सामान्य रुग्णालय येथे समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नर्सिंग स्कुलचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी निवासी वैद्यकीय अधिकारी संदीप हेडाऊ, आहार विभागाचे आहारतज्ज्ञ डॉ. कविता देशमुख, बालरोगतज्ज्ञ डॉ. शिरभाते, डॉ. अनिता तेलंगे, आरोग्यसेविका ललिता अटळकर आदी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती