छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था(सारथी); मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून रोजगार निर्मिती

 विशेष लेख :

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था(सारथी);

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून रोजगार निर्मिती

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), अमरावती मार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात. सारथीमार्फत देण्यात येणाऱ्या या योजनांचा लाभ घेऊन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करीत आहेत. या संदर्भात माहिती करुन देणारा लेख.

            महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून 25 जून 2018 रोजी कंपनी अधिनियम 2013 चे कलम 8 अन्वये सारथी संस्थेचे स्थापना करण्यात आली तसेच नोंदणी कंपनी कायद्यान्वये नोंदणी करण्यात आली आहे. सारथी संस्थचे मुख्य कार्यालय पुणे येथे तर उपकेंद्र कोल्हापूर येथे आहे. तसेच खारघर(नवी मुंबई), पुणे, नाशिक, औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर येथे विभागीय कार्यालय आहेत. सारथी संस्था मुख्यत: मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा- कुणबी या लक्षित गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी ही संस्था नियोजन विभागाच्या अधिपत्त्याखाली कामकाज करते.

केंद्रीय लोकसेवा आयोग

सारथीमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा मोफत प्रशिक्षणातून सन 2020 ते 2022 दरम्यान 51 विद्यार्थ्यांची अंतिम यादीत निवड झाली आहेत. यामध्ये 12 जण आयएएस, 18 जण आयपीएस, 6 जण आयआरएस, 2 जण आयएफएस तर इतर सेवेला 13 जणांची अंतिम यादीत निवड झाली आहेत. 

            या उपक्रमांतर्गत सारथी मार्फत युपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षांच्या पूर्व, मुख्य तसेच मुलाखत या तीनही टप्प्यावर विद्यार्थ्यांना तयारीसाठी प्रशिक्षण सहाय्य करण्यात येते. या उपक्रमांतर्गत युपीएससीच्या पूर्व परीक्षेसाठी 500 विद्यार्थी दरवर्षी निवडण्यात येतात. नवी दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दरमहा 13 हजार रूपये व पुणे येथील विद्यार्थ्यांना दरमहा 9 हजार रूपये विद्यावेतन दिले जाते. तसेच  प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथीमार्फत भरण्यात येते. युपीएससी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना युपीएससी मुख्य परीक्षेच्या तयारीकरिता एकवेळ एकरक्कमी 50 हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. तर युपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखतीच्या तयारीसाठी एकवेळ एकरक्कमी 25 हजार आर्थिक सहाय्य दिले जाते.

 

आवश्यक कागदपत्रे : महाराष्ट्र रहिवाशी प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाव्दारे जारी केलेले जात प्रमाणपत्र (मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा- कुणबी), शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षाचे संबधित तहसिलदार अथवा सक्षम प्राधिकरणाव्दारे जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र किंवा ईडब्लूएस प्रमाणपत्र, अर्ज भरण्याच्या दिवशी उमेदवारांकडे कोणत्याही शाखेत पदवी असणे आवश्यक राहील.

महाराष्ट्र राज्यसेवा आयोग

केंद्रीय लोकसेवा परीक्षाप्रमाणेच राज्यसेवा परीक्षामध्ये ही सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, प्रशिक्षण सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. एमपीएससीसाठी 750 विद्यार्थ्यांची निवड दरवर्षी करण्यात येते. यासाठी पुणे येथे विद्यार्थ्यांना दरमहा 8 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथीमार्फत भरण्यात येते. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 15 हजार रूपये एक रक्कमी  अर्थ सहाय्य म्हणून दिले जाते. तसेच मुलाखतीच्या तयारीसाठी  विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी 10 हजार रूपये एकरकमी दिले जातात.

आवश्यक कागदपत्रे : महाराष्ट्र रहिवाशी प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाव्दारे जारी केलेले जात प्रमाणपत्र (मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा- कुणबी), शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षाचे संबधित तहसिलदार अथवा सक्षम प्राधिकरणाव्दारे जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र किंवा ईडब्लूएस प्रमाणपत्र, अर्ज भरण्याच्या दिवशी उमेदवारांकडे कोणत्याही शाखेत पदवी असणे आवश्यक राहिल.

           

छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृती (CSMNRF)

 

या योजनेंतर्गत सारथीमार्फत लक्षित गटातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी संशोधन पूर्ण होईपर्यंत परंतु कमाल 5 वर्षाच्या कालावधीकरिता संशोधन प्रगती अहवालाच्या आधारे जेआरईसाठी प्रति विद्यार्थी प्रतिमहा 31 हजार रूपये अधिछात्रवृती व एसआरईसाठी प्रति विद्यार्थी प्रतिमहा 35 हजार रूपये अधिछात्रवृती देण्यात येते. तसेच युजीसी नियमानुसार घरभाडे भत्ता व आकस्मिक खर्च देण्यात येतो. सन 2019 ते 2023 या कालावधीत एकूण 2 हजार 109 विद्यार्थांना फेलोशिपसाठी एकूण 42 कोटी 33 लाख 36 हजार, घरभाडे भत्त्यासाठी 2 कोटी 36 लाख 50 हजार व आकस्मिक खर्चासाठी 40 लाख 7 हजार निधी वितरित करण्यात आलेला आहे. यामध्ये छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृती योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यातील सन 2019 ते 2022 पर्यंत एकूण 30 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

 

आवश्यक कागदपत्रे : महाराष्ट्र रहिवाशी प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाव्दारे जारी केलेले जात प्रमाणपत्र (मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा- कुणबी), शैक्षणिक वर्षाच्या लगतपूर्वीच्या वित्तीय वर्षाचे संबधित तहसिलदार अथवा सक्षम प्राधिकरणाव्दारे जारी केलेले उत्पन्न प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र किंवा ईडब्लूएस प्रमाणपत्र, अर्ज भरण्याच्या दिवशी उमेदवारांकडे कोणत्याही शाखेत पदवी असणे आवश्यक राहिल. अर्ज करणऱ्या उमेदवाराकडे एम.फील किंवा संशोधनाकरिता कायम नोंदणी असणे आवश्यक राहील.

 

-           सतिश आनंदराव बगमारे,

माहिती सहायक/उपसंपादक,

जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती