Monday, September 4, 2023

हवामान अंदाजःजिल्ह्यात 9 सप्टेंबरपर्यंत मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता



हवामान अंदाजःजिल्ह्यात 9 सप्टेंबरपर्यंत मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

अमरावती दि. 4 : प्रादेशिक मौसम विभाग नागपुरद्वारे प्राप्त संदेशानुसार, दि. 5 ते 9 सप्टेंबर 2023 दरम्यान जिल्ह्यात मेघ गर्जनासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच एक ते दोन ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने शेतकरी बांधवांनी भाजीपाला, फळबागा आणि इतर पिकांमध्ये पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घेवून उपाययोजना राबवावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र अमरावतीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के . पी. सिंह, यांनी केले आहे.

 

उपाययोजना याप्रमाणे : पावस पडण्याची शक्यता लक्षात घेवून शेतकरी बांधवांनी भाजीपाला, फळबागा आणि इतर पिकांमध्ये पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. आवश्यकता भासल्यास खोदलेल्या चरांद्वारे अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. भाजीपाला आणि फळबाग पिकाला पिक वाढीची अवस्था बघून आधार द्यावा. संत्रावर्गीय फळबागा मध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उताराच्या दिशेने व दोन ओळीनंतर 30 सेंमी खोल, 30 सेंमी खालची रुंदी व 45 सेंमी वरची रुंदी या आकाराचे चर खोदावेत. झाडाच्या बुंध्याजवळ पाणी साचून राहू नये म्हणून आळे व दांड सपाट करून घ्यावेत. कृषी रसायनांची फवारणी, कामे पाऊसाच्या उघडीप नंतर करावीत किंवा पुढे ढकलावीत.

 

मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने शेतात काम करत असताना मेघगर्जनेचा आवाज आल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पाऊस व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने शेळ्या, मेंढ्या व इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने जनावरांना गोठ्यामध्येच चाऱ्याची व्यवस्था करावी. जनावरे हे खुल्या पाण्याचे स्त्रोत, नदी किंवा तलाव तसेच  ट्रक्टर व इतर धातूच्या अवजारांपासून दूर ठेवावे. पावसापासून संरक्षण करण्यासाठी जनावरांच्या गोठयाचे छप्पर दुरुस्त करून घ्यावे. जनावरांच्या गोठयाचा सभोवतालील परिसर स्वच्छ व निरोगी ठेवावा आणि गोठ्याभोवती असलेली अनावश्यक झाडे झुडुपे काढून टाकावीत. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी शेडच्या सभोवताली चर खोदावेत.

 

शेतकरी बंधूनी हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानचा पूर्वानुमानाकरीता मेघदुत मोबाईल अॅपचा वापर करावा. तसेच शेतकरी बंधूंनी मेघगर्जना व विजेचा पूर्वानुमानाकरिता दामिनी अॅपचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्राचे कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. सचिन मुंढे व कृषी हवामान निरीक्षक व्ही. बी. पोहरे यांनी केले आहे.

00000 

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...