Thursday, September 7, 2023

कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

 

कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

अमरावती, दि. 7 :  राज्यात सध्या कापूस पिक पाते व बोंडे लागण्याच्या अवस्थेत तर काही ठिकाणी पक्वतेच्या अवस्थेत आहे. काही तुरळक ठिकाणी कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. हा प्रादुर्भाव पुढे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी कापूस पीकावरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणाबाबत कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ते याप्रमाणे.

किडींची ओळख

गुलाबी बोंड अळीचे मादी पतंग पाते, फुले व बोंडावर लांबुळकी चपटी, मोत्यासाखी चकचकीत पांढरी अंडी घालते. अंडयातून बाहेर पडलेली अळी प्रथम पांढूरकी असते व  मोठी झालेली अळी गुलाबी रंगाची होते.

नुकसानीचे स्वरूप

        अंडयातून बाहेर पडल्यावर अळी सुरुवातीला पाते व फुलांचे नुकसान करते व पुढील अवस्थेत बोंडात शिरते व आतील सरकी व कापूस खाऊन उपजीविका करते. या किडीचा प्रादुर्भाव फुले आल्यानंतर झाल्यास प्रादुर्भावीत फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखे दिसतात.यालाच डोमकळी असे म्हणतात. बोंडे तयार झाल्यानंतर अळ्या बोंडांना छिद्रे पाडून आत शिरतात व बोंडांचे नुकसान करतात. अळीचे प्रवेशछिद्र बंद होत असल्यामुळे किडग्रस्त बोंडे बाहेरून ओळखता येत नाहीत. अशी बोंडे फोडून पाहिल्यास आत गुलाबी रंगाच्या अळ्या दिसतात. किडग्रस्त बोंडे परिपक्व न होताच फुटतात.

एकात्मिक व्यवस्थापन

शेतकरी बांधवानी पिकाची नियमित पाहणी करून सदर किडीच्या नियंत्रणासाठी खालील प्रमाणे व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात.

1.         एकरी दोन याप्रमाणे पिकाच्या उंचीच्यावर एक फुट याप्रमाणे कामगंध सापळे लावावे. सतत तीन दिवस या सापळ्यामधे आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.

2.        पिकातील डोमकळ्या नियमित शोधून त्या अळी सहीत नष्ट कराव्या.

3.         निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडीरेक्टिन (३००० पी पी एम) १० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणे गरजेनुसार १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारण्या कराव्यात.

4.        खालील रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.

५ ते १० टक्के  प्रादुर्भाव असल्यास: क्विनालफॉस २५ टक्के ए एफ २५ मिली किंवा क्लोरपायरीफॉस २५ टक्के २५ मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के ३० मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ टक्के १० मिली  या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

१० टक्के च्यावर प्रादुर्भाव असल्यास: अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार प्रादुर्भाव पुढे वाढू नये म्हणुन खालील पैकी कोणत्याही एका मिश्र किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. क्लोरॅट्रॉनिलीप्रोल ९.३ टक्के + लॅम्बडा-सायलोथ्रिन ४.६ टक्के - ५ मिली किंवा क्लोरपायरीफॉस ५० टक्के + सायपरमेथ्रीन ५ टक्के - २० मिली किंवा इंडोक्झाकार्ब १४.५ टक्के + अॅसीटामाप्रिड ७.७ टक्के - १० मिली. वापरावा.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...