प्लेसमेंट ड्राइव्हअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप

 





प्लेसमेंट ड्राइव्हअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना

 जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप

 

        अमरावती, दि. 08 (जिमाका): जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटरमार्फत दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी प्लेसमेंट ड्राइव्ह (निवड मोहिम) राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 35 उमेदवारांची खाजगी कंपन्यांमध्ये प्राथमिक निवड करण्यात आली. या निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

            जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर, कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी जितेंद्र गायकवाड, मॉडेल करिअर सेंटरचे क्रपा अरगुल्लेवार, जिल्हा समन्वयक वैभव तेटू, वरिष्ठ लिपीक प्रविण बांबोळे, कनिष्ठ लिपीक पंकज कचरे आदी यावेळी उपस्थित होते. 

            प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये विविध उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या पात्रतेच्या पदांसाठी कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देत आहेत. नुकतेच दि. 29 ऑगस्ट, 2023 रोजी प्लेसमेंट ड्राइव्ह राबविण्यात आली. या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये जिल्ह्यातील जाधव स्टील अलॉयज, अमरावती तसेच कोर प्रोजेक्ट इंजिनियर अँड कन्सल्टंट प्रा. लि., अमरावती या खाजगी कंपन्यांनी 61 रिक्तपदांसाठी जागा अधिसूचित केल्या होत्या. यामध्ये एकूण 199 बेरोजगारांनी सहभाग नोंदविला. त्यातील 88 उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्यात. त्यातून 35 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. प्रातिनिधिक स्वरुपात ऋषिकेश साबळकर, तेजस होले, यश क्षीरसागर, सौरभ खंडेजोड, अभिजीत मेहरे, अभिलाष काळकर, अनिरुद्ध डहाट, गणेश पुसतदकर आदी उमेदवारांना श्री. कटियार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

जिल्हाधिकारी यांचे उद्योजकांना आवाहन

            जिल्ह्यातील खाजगी आस्थापना, उद्योजकांनी दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी प्लेसमेंट ड्राइव्हसाठी आपल्याकडील रिक्तपदे सात दिवस अगोदर कौशल्य विकास विभागाकडे अधिसूचित करावी. तसेच त्यांना आवश्यक असलेल्या कुशल अथवा अकुशल मनुष्यबळाची मागणी नोंदवावी. यामुळे उद्योजकांचा जाहिरातीवरील खर्च वाचेल. तसेच गरजू असलेल्या उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे जागेवरच निवड करता येईल. यामुळे खर्च आणि वेळ दोन्हींची बचत होईल, असे श्री. कटीयार म्हणाले.

 

जिल्हाधिकारी यांचे उमेदवारांना आवाहन

        बेरोजगार युवक-युवतींना स्थानिकस्तरावर नोकरी व अनुभवाची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्लेसमेंट ड्राइव्हचा लाभ घ्यावा. या माध्यमातून शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगाराची संधी प्राप्त होईल. उत्कृष्ट उद्योजकांकडे रोजगाराची संधी मिळाल्यामुळे अनुभव प्राप्त होईल. याचा भविष्यात निश्चितच उपयोग होईल. प्लेसमेंट ड्राइव्हमुळे स्थानिकस्तरावर नोकरीची संधी उपलब्ध होत असल्यामुळे पात्र उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन श्री. कटियार यांनी यावेळी केले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती