नगर विकास विभागाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 


नगर विकास विभागाच्या योजनांचा लाभ

लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

अमरावती, दि. 5 (जिमाका): जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या अध्यक्षतेखाली आज नगर विकास विभागांतर्गत सर्व नगर परिषद, नगर पंचायत यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभाकक्षात घेण्यात आली. नगरपालिका प्रशासनाचे सह आयुक्त सुमेध अलोणे तसेच नगर विकास विभागातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

नगरपालिका प्रशासनाचे श्री. अलोणे यांनी जिल्ह्यामध्ये केंद्र तसेच राज्य शासन व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत सर्व उपक्रमांची सादरीकरणाव्दारे माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी पंडित दीनदयाल अंत्योदय योजनेंतर्गत ‘पंतप्रधान स्वनिधी योजना’ तसेच ‘स्वनिधी से समृध्दी तक’ या योजनांचा नगरपरिषद, नगरपंचायतनिहाय आढावा घेतला. या योजनेचा लाभ जास्तीत-जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कालमर्यादित कार्यक्रम राबवावा. बँक व्यवस्थापकांनी योजनेतील प्रलंबित प्रकरणांचा तत्काळ निपटारा करण्याचे निर्देश श्री. कटियार यांनी यावेळी दिले. ‘आयुष्यमान भारत योजनें’तर्गत नागरी भागात व्यापक प्रमाणात प्रचार, प्रसिध्दी करुन जास्तीत-जास्त लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी सर्व मुख्यधिकारी व तहसीलदार यांनी समन्वय साधून गतीने कामे पूर्ण करावी, असेही ते यावेळी म्हणाले.

नगर विकास विभागांतर्गत ‘स्वच्छ भारत अभियान 2.0’ व ‘माझी वसुंधरा अभियान 4.0’ या अभियानाची जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. या योजनेंतर्गत राष्ट्रीय व राज्य स्तरावरील आयोजित स्पर्धांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग नोंदवून मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न करावा. यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून सुक्ष्म नियोजनावर भर द्यावा. आगामी काळात होणाऱ्या निवडणूक कार्यक्रमांमुळे विकास कामांचे नियोजन करुन तत्काळ अंमलबजावणी करण्याची सूचना त्यांनी यावेळी दिली.

प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात (शहरी) 11 हजार 572 घरकुल मंजूर करण्यात आले असून त्यापैकी 7 हजार 777 घरकुलासाठी बांधकाम परवानगी प्रदान करण्यात आली आहे. तसेच 2 हजार 652 घरकुल पूर्ण करण्यात आले आहे. शहरी भागातील बेघर तसेच कच्चे घर असणाऱ्या गरजूंना हक्काचे पक्के घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविली जाते.

पीएमएसव्ही निधी योजना

पीएमएसव्ही निधी योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यासाठी (शहरी) 21 हजार 443 लाभार्थ्यांचे सुधारित उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. त्यापैकी 12 हजार 793 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. पंतप्रधान स्वानिधी योजनेंतर्गत रस्त्यावरील फळभाजी विक्रेते, मोची, न्हावी, फेरीवाले, धोबी, इ. छोटे व्यवसाय करणाऱ्या लोकांना विविध क्षेत्रात त्यांचा रोजगार सुरू करण्यासाठी केंद्र शासनाकडून 10 हजारापर्यंत भांडवल उपलब्ध करुन दिल्या जाते. या भांडवलाची वेळेत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना शासनामार्फत वाढीव भांडवल उपलब्ध करुन देण्यात येते.

आयुष्यमान भारत योजना

आयुष्यमान भारत योजनेंतर्गत जिल्ह्यात (शहरी) भागात आभा कार्ड काढण्यासाठी पुढील दोन महिन्यात आरोग्य विभागासोबत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत गरजूंना आभा कार्ड चे वितरण करण्यात येते. यामध्ये गरजूंना निशु:ल्क वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येतात.

*****




Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती