ध्वजदिन 2023 निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा; निधी संकलनात सढळ हाताने मदत करावी- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 










ध्वजदिन 2023 निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा;

निधी संकलनात सढळ हाताने मदत करावी- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

अमरावती, दि. 13 (जिमाका):  देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून प्रत्येक नागरिकाने सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी योगदान देणे आवश्यक आहे. यंदा निधी संकलनाचे उद्दिष्ट 1 कोटी 10 लक्ष रूपये आहे. या राष्ट्रीय कार्यात अमरावती जिल्ह्याने यापूर्वीही उत्स्फूर्तपणे योगदान दिले आहे. आताही हे उद्दिष्ट 28 फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करण्यासाठी सढळ हातांनी मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्ह्यातील ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ करताना आज सांगितले.

 

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयातर्फे नियोजन भवनात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन व सैनिक मेळावा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आशिष बिजवल, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, पोलीस ठाणेदार कैलास पुंडकर, फ्लाईट लेफ्टनंट रत्नाकर चरडे, ब्रिगेडियर शंतनू मयंकर, कर्णल लक्ष्मण गाले आदी उपस्थित होते. शहिद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, शौर्यपदकधारक व सैनिकांच्या पाल्यांचा सत्कार, तसेच दिवंगत सैनिकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटपही यावेळी झाले.

 

जिल्हाधिकारी सौरभ कटियार म्हणाले की, भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेशानंतर प्रशिक्षण घेताना सिक्कीम  राज्यात सेनादलाचे कार्य प्रत्यक्ष जाणून घेता आले. देशाच्या संरक्षणासाठी अत्यंत खडतर परिस्थितीत प्राणांची बाजी लावून सैनिक कार्य करत असतात. सेवानिवृत्तीनंतरही सैनिक गावांमध्ये विविध उपक्रमांत पुढाकार घेऊन योगदान देतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून ध्वजदिन निधीत प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. माजी सैनिक तसेच सिमा संरक्षणासाठी कर्तव्यावर असलेल्या सैनिकांच्या कुटूंबावर येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर राहिल, अशी ग्वाही श्री.कटियार यांनी दिली.

 

ध्वजनिधीसाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांच्या हस्ते 19 लक्ष रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला. तसेच उपस्थित माजी सैनिक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी ध्वज निधी जमा केला.

 

देशाच्या संरक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे यासाठी, तसेच युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या जवानांच्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी ध्वजनिधीचा उपयोग होतो. अमरावती जिल्ह्यात गतवर्षी 1 कोट 10 लक्ष उद्दिष्टाच्या तुलनेत 1 कोटी 17 लक्ष रूपये निधी संकलित झाला. त्याची टक्केवारी 106 इतकी आहे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आशिष बिजवल यांनी प्रास्ताविकात सांगितले. वैभव निमकर यांनी संचालन व आभार मानले.

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती