‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रम’ जास्तीत जास्त शाळांनी उपक्रमात सहभाग घ्यावा - मुख्य कार्यकारी अधिकरी अविश्यांत पंडा

 


‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रम

जास्तीत जास्त शाळांनी उपक्रमात सहभाग घ्यावा

-    मुख्य कार्यकारी अधिकरी अविश्यांत पंडा

 

            अमरावती, दि. 29 (जिमाका) :  सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक ,पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे , यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राबविण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त आहेत. हे अभियान दि. 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविल्या जाणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत - जास्त शाळांनी या उपक्रमात सहभाग घेण्याच आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज येथे केले आहे.

           या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत कार्यवाहीचा आढावा जिल्हा परिषदेचे सभागृहामध्ये श्री. अविश्यांत पंडा यांच्याकडून घेण्यात आला. गट शिक्षणाधिकारी यांनी तालुकानिहाय मुख्याध्यापकांच्या सभा घेऊन त्यांना या अभियानात सहभागी होण्याबाबत सूचित करण्यात आले.

          अभियानाचे कालबद्ध नियोजन करुन हे अभियान यशस्वी करावे. जिल्ह्यातील सर्व शाळांनी या अभियानामध्ये सहभाग घेऊन जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त प्राविण्य मिळवावे. या अभियानामध्ये सहभागी शाळांच्या कामागिरीच्या आधारे मुल्यांकन करण्यात येऊन त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र वर्ग अ व ब च्या महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र व उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्र या गटांमध्ये मुल्यांकन करण्यात येणार आहे.

 

          अमरावती जिल्हा उर्वरित महाराष्ट्र कार्यक्षेत्रामध्ये मोडत असून या अंतर्गत तालुका, जिल्हा, विभागस्तर व राज्यस्तरावर शाळांचे मुल्यांकन होणार आहे. या अभियानामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था व इतर व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीतून शाळांची निवड होणार आहे.

           दोन्ही वर्गवारीतून तालुकास्तरावर पहिले बक्षिस 3 लक्ष रुपये, दुसरे बक्षिस 2 लक्ष रुपये व तिसरे बक्षिस 1 लक्ष रुपये असे आहेत. जिल्हास्तरावर पहिले बक्षिस 11 लक्ष रुपये, दुसरे बक्षिस 5 लक्ष रुपये व तिसरे बक्षिस 3 लक्ष रुपये असून विभागस्तरावर पहिले बक्षिस 21 लक्ष रुपये , दुसरे बक्षिस 11 लक्ष रुपये व तिसरे बक्षिस 7 लक्ष रुपये या प्रमाणे देण्यात येणार आहे. राज्यस्तरावर पहिल्या बक्षिसांची रक्कम ही 51 लक्ष रुपये असून दुसरे बक्षिस 21 लक्ष रुपये व तिसऱ्या बक्षिसांची रक्कम 11 लक्ष रुपये अशी आहे.

          जिल्ह्यातील सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली असून जास्तीत -जास्त बक्षिसे मिळविण्याचा शाळांचा प्रयत्न आहे असे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे यांनी सांगितले. 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती