‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा; प्रशासकीय विभागांनी समन्वयाने उपक्रम यशस्वी करा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार







‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा;

प्रशासकीय विभागांनी समन्वयाने उपक्रम यशस्वी करा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

अमरावती, दि. 21 (जिमाका): शासकीय योजनाची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान शासनामार्फत राबविण्यात येत आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचून त्यांना सहाय्य व्हावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अनुषंगाने शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय आयोजन अमरावती येथे लवकरच करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने प्रशासकीय विभागांनी समन्वय साधून जिल्हास्तरावरील ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या आयोजनाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी श्री. कटियार बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, पोलीस अधीक्षक विशाल सिंगुरी, अतिरिक्त जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रिचर्ड यानथन, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पी.एम. मिनू, उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, प्रदीप पवार, मनोज लोणारकर, रविंद्र जोंगी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के तसेच विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी सौरभ कटियार म्हणाले, शासन आपल्या दारी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विविध विभागांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी ती चोखपणे सांभाळावी. उपक्रमामध्ये लाभार्थ्यांना कार्यक्रमासाठी आणणे हा महत्त्वाचा भाग आहे. त्याअनुषंगाने वाहतूक आराखडा तयार करावा. लाभार्थ्यांना कार्यक्रमाच्या दिवशी आणतांना त्यांची काळजी घेण्यात यावी. बसमध्ये प्राथमिक उपचारासोबतच आरोग्य सेवक, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी. कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. कार्यक्रमस्थळी स्वच्छता विषयक व्यवस्था, शौचालय सुविधा, वीज, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य, खाद्यान्ने तसेच पाणी, आसन व्यवस्था याबाबत नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

 

कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिक येणार असल्याने आरोग्य व्यवस्था उभारण्यात यावी. फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात यावी. तसेच परिसरात स्वच्छता राहील या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बॅरेकेट्सची व्यवस्था तसेच आगीच्या स्थितीबाबत योग्य ती काळजी घेण्यात यावी. कार्यक्रमाच्या दिवशी शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या स्तरावर नियोजन करावे, असे आवाहन श्री. कटियार यांनी केले.

00000 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती