Friday, December 29, 2023

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

 



कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

नागरिकांनी घाबरून न जाता कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

अमरावती दि. 29 : कोविड जेएन-वन या व्हेरियंटचा प्रसार जगभर वेगाने होत आहे. यासाठी पुर्वानूभव लक्षात घेता वेळीच दक्षता आणि सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील कोविड संबंधित यंत्रणा सुसज्ज ठेवावी. येणाऱ्या संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी डॉक्टरांचे पथक, मुबलक औषधसाठा व कोविड तपासणी किट उपलब्ध करून देण्यात येईल .नागरिकांनी घाबरून न जाता कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले .

कोविड - 19 च्या नव्याने उद्भवलेल्या व्हेरियंटचा प्रादुर्भावाबाबत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवन येथे आढावा बैठक घेण्यात आली , त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी संजय आसोले तसेच विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

          कोविडच्या नव्याने निर्माण झालेल्या जेएन-वन या व्हेरियंटबाबत नागरिकांनी घाबरून न जाता दक्षता बाळगणे गरजेचे असल्याचे सांगून श्री. कटियार म्हणाले की, आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करून कोविडच्या लाटेला थोपविण्यात यश मिळविले आहे. आता नव्याने आलेल्या जेएन-वन या नवीन व्हेरियंटवरही सर्वांच्या सहकार्याने मात करावयाची आहे. याबाबत सावधगिरी बाळगण्याबाबत केंद्र शासनामार्फतही सूचना आल्या आहेत. जेएन-वन व्हेरियंट झपाट्याने वाढत आहे. परंतु नागरिकांनी न घाबरता कोविड मार्गदर्शक तत्वे तसेच त्रिसुत्रींचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शासकीय रुग्णालयात कोविड तपासणी सुविधेसाठी आरटीपीसीआर मशिन अद्ययावत कराव्यात. त्यासाठी पुरेशा किटचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा. रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास संबंधित रुग्णाला योग्य तो औषधोपचार उपलब्ध करून द्यावे. वैद्यकीय रुग्णालयात येणाऱ्या सर्व संशयित रुग्णांची तपासणी करून माहिती संकलित करावी. नागरिकांनी वैयक्तिक स्तरावर मास्क वापरणे, हातांची स्वच्छता, सामाजिक अंतर राखणे याबाबींचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन श्री. कटियार यांनी केले आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच राज्यातील प्रशासकीय यंत्रणा तसेच आरोग्य यंत्रणेची आढावा बैठक घेतली. मागील अनुभवाच्या आधारे आताही राज्यातील यंत्रणा संपूर्णपणे सज्ज आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास त्यांनी  तात्काळ तपासणी करुन घ्यावी. आगामी सण व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा. आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार यासाठी काळजी घ्यावी. सोशल मीडियावरून तसेच प्रसारमाध्यमांनीही या नव्या व्हेरिएंट संदर्भात चुकीच्या बातम्या प्रसारित होणार नाहीत याची दक्षता घ्यावी . जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम वा घबराट निर्माण होणार नाही, अफवा पसरणार नाहीत. माहिती प्रसारीत करताना अधिकृत माहितीचाच उपयोग करावा,  असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...