मच्छिमारांना विविध योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष मोहिम

 

मच्छिमारांना विविध योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष मोहिम

 

अमरावती, दि. 14 (जिमाका):  जिल्ह्यातील मच्छिमारांसाठी शासनाव्दारे विविध योजना राबविण्यात येतात. या योजनेचा लाभ देण्यासाठी सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभागामार्फत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा मच्छिमारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्यव्यवसायचे सहायक आयुक्त सु. रा. भारती यांनी केले आहे.

किसान क्रेडीट कार्ड या योजनेंतर्गत मत्स्यकास्तकारांना मत्स्यव्यवसाय उपयोगी साहित्य जसे मत्सबीज, मत्स्यखाद्य, जाळे, होडी, खते इ. खरेदीसाठी बँकेमार्फत विनातारण खेळते भांडवल आर्थिक स्वरुपात व अत्यल्प व्याज दराने उपलब्ध करुन देण्यात येते. तसेच अपघात गट विमा योजनामधून मच्छिमारांचा विनामुल्य विमा काढण्यात येतो. योजनेमध्ये मच्छिमाराचा अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरुपी संपूर्ण अपंगत्व झाल्यास त्याच्या वारसदारास 5 लक्ष रुपये, कायमचे अपंगत्व आल्यास 2 लक्ष 50 हजार रुपये तसेच अपघाती रुग्णालयात दाखल केल्यास 25 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येते.

 

ई-श्रम कार्ड या योजनेंतर्गत असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत मच्छिमार किवा मत्स्यकास्तकारांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेव्दारे अपघात विमा संरक्षण दिले जाते. ई-श्रम कार्ड योजनेत अपघाती मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास 2 लक्ष रुपये, आंशिक प्रमाणात अपंगत्व आल्यास 1 लक्ष रुपयांचा लाभ दिला जातो. या विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी मत्स्यकास्तकारांनी सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय, केशव कॉलनी, विद्याभारती कॉलेज जवळ, कॅम्प रोड, अमरावती येथे अर्ज सादर करावा.

 

योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, दोन पासपोर्ट फोटो, तलावामध्ये मच्छिमारीकरीत असल्यास संस्थेचा तलाव ठेका आदेश व संस्थेचा सभासद असल्याचे प्रमाणपत्र किंवा व्यक्तिश मत्स्यव्यवसाय करीत असल्याबाबतचे ग्रामपंचायत प्रमाणपत्रसह आवश्यकता कागदपत्र सोबत जोडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती