विभागीय युवा महोत्सव; युवा महोत्सवातुनच भावी कलाकारांची निर्मिती होते -डॉ. मनीष गवई

 


विभागीय युवा महोत्सव; युवा महोत्सवातुनच भावी कलाकारांची निर्मिती होते

                                                -डॉ. मनीष गवई

महोत्सवातुन दिसला  तरुणाईचा कला आविष्कार

 

अमरावती, दि. 11 (जिमाका): क्रीडा व युवा सेवा संचालनालय, कृषी संचालनालय  व शिवाजी शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विभागीय युवा महोत्सवाचे आयोजन विमलाबाई देशमुख सभागृहात नुकतेच करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तथा अंतरार्ष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत अल्पसंख्याक आयोगाचे सल्लागार सदस्य डॉ मनीष शंकरराव गवई यांनी केले.

 

विभागीय युवा महोत्सवातुन  जिल्ह्यातील युवकांच्या कला गुणांना विभागीय स्तरावर वाव मिळत असतो. या महोत्सवातुन  युवक कलाकारांना नवी दिशा प्राप्त होते आणि भविष्यातील कलाकारांची निर्मिती देखील होते असे प्रतिपदान डॉ. मनीष शंकरराव गवई यांनी उद्घाटन प्रसंगी केले. यावेळी राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी सूचिता बर्वे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालाचे प्राचार्य शशांक देशमुख यांची उपस्थिती होती.

 

स्पर्धेचे उद्घाटन  दिप प्रज्वलन व नटराज प्रतिम पुजन करुन करण्यात आली.  राष्ट्रीय एकात्मता तसेच युवकांच्या सप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र शासनामार्फत सन 1994 पासून राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. राज्याची संस्कृती व परंपरा जतन करण्यासाठी जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार अमरावती येथे आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्षनिमित्त जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन  करण्यात आले.  अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यातून  निवड झालेल्या स्पर्धकांना विभागीय युवा महोत्सवात आपली कला सादर करण्याचे संधी मिळते आणि पुढे विभागीय युवा महोत्सवातुन अमरावती विभागाचा संघ तयार होतो आणि तो राज्य स्तरावर  विभागाचे प्रतिनिधित्व करतो.

 

डॉ. मनीष गवई म्हणाले कि, युवा कलावंतासाठी युवा महोत्सव हा कलेची पर्वणी असतो. या महोत्सवातुनच यशस्वी कलावंत निर्माण होतात  आणि आपली वेगळी ओळख निर्माण करून यशस्वी  ठरतात. युवा महोत्सव हा कलाकारांना ऊर्जा देण्याचे कार्य करतो आणि या महोत्सवातून युवा पिढीला सांस्कृतिक दिशा देखील प्रदान होते. हा युवा महोत्सव युवकांसाठी प्रेरणादायी असून युवा कलावंतांसाठी एक प्रकारची पर्वणी असते.

 

युवा महोत्सवात अमुलाग्र बदल केंद्रशासनाच्यावतीने  करण्यात आले असून मिलेट्स वर्ष ही थीम घेऊन हा महोत्सव राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येत आहे. तसेच प्रथमच रोख रक्कम देखील विजेत्यांना या महोत्सवातून पहिल्यांदाच देण्यात आले आहे. येत्या वीस डिसेंबरला विभागीय युवा महोत्सवातील विजेत्या स्पर्धकांना अमरावती विभागाच्या वतीने राज्य स्तरीय स्पर्धांमध्ये सादरीकरण करण्याची संधी मिळत असून  राष्ट्रीय स्तरावर 12 जानेवारीला मणिपूर इम्पाळे येथे राष्ट्रीय युवा महोत्सव साजरा होणार आहे. मिलेट्सवर आधारित महिला विकास आर्थिक महामंडळ व जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलचे उदघाटन डॉ. गवई यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावर्षी विभागीय  युवा महोत्सवात रांगोळी, पथनाट्य, फोटोग्राफी,वक्तृत्व, लोकगीत व लोकनृत्य या  प्रकारासाठी स्पर्धा होत्या. ज्यात विभागीय  स्तरातून युवा कलाकारांनी भाग घेतला. शिरीष मेश्राम यांनी या स्पर्धाचे व्यवस्थापन केले असून  त्यांच्या  मार्गदर्शनात उत्तम युवा महोत्सव संचालित करण्यात आले. विभागीय युवा महोत्सवातील युवा कलावंतांना राज्य स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार आहे. विभागीय युवा महोत्सवाचे  पंच म्हणुन भारत मोंढे, राहुल तायडे, स्वामिनी  तायडे, सुशीलदत  बागडे, प्रेम भैसेने, उमेश गजभिये, भीम बारसे यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे संचालन मनजीत मेश्राम  आभार प्रदर्शन डॉ मनीष गवई यांनी मानले यांनी केले. विभागीय युवा महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालयाचे प्राध्यापक, क्रीडा अधिकारी वैशाली इंगळे, संतोष विघ्ने, दिपक समदुरे, त्रिवेणी बांते, प्रणिती भिमटे, अशोक खंडारे, अकिल शेख, शुभम मोहतुरे, गणेश तांबे यांनी काम पाहिले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती