‘स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा’;

जिल्ह्यातील नवउद्योजकांसाठी उत्तम संधी -अविश्यांत पंडा

 

अमरावती, दि. 20 (जिमाका):  विद्यार्थ्यांच्या डोक्यात नवनवीन कल्पना असतात. त्यांच्या नवसंकल्पनाना मूर्त रुप मिळवून उद्योग उभारणीकडे वळविण्यासाठी ‘स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धा’ उत्तम संधी आहे. याचा तरुणांनी लाभ घ्यावा. तसेच तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी अशा स्पर्धा नियमित आयोजन करावे. जेणेकरुन नवसंकल्पाना वाव मिळवून उद्योग उभा उभारण्यास पाठबळ मिळेल, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

 

नवसंशोधकांना आपल्या नाविन्य पूर्ण संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी नाविन्यता सोसायटी, मुंबई व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावतीमार्फत श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथे नुकतेच जिल्हास्तरीय सादरीकरण करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता विभागाचे उपायुक्त दत्तात्रय ठाकरे, शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, प्राचार्य डॉ. जी.व्ही.कोरपे, कार्यक्रम संयोजक डॉ. डी. डी. खेडकर, मार्गदर्शन अधिकारी अभिषेक ठाकरे तसेच इतर प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

उपायुक्त दत्तात्रय ठाकरे म्हणाले की, भारताचे पहीले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी भारताच्या कृषी क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने ज्याप्रकारे विविध उपाययोजना राबविल्या तेही एक इनोव्हेशनच असल्याबाबतचे उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिले.

 

 कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतुन युवावर्गामधे उद्योग प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने उद्योजकीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये इन्क्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल हिरुळकर यांनी इन्क्युबेशन सेंटरच्या कार्यपध्दतीबाबत माहिती दिली. ई.सी.ई इंडीयाचे संचालक अमित आरोकार यांनी संकल्पना ते उद्योग या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तर एमआयडीसी असोसीएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर यांनी उद्योजकीय क्षमता, विकास या विषयी मार्गदर्शन केले. एम.सी.ई.डीचे विभागीय संचालक प्रदीप इंगळे यांनी यशस्वी उद्योजक व्यक्तिमत्वाचे पैलू काय असतात याबाबत मार्गदर्शन केले.

 

 जिल्हास्तरावर निवड झालेल्या एकूण 11 नवसंशोधकांनी या स्पर्धेमधे आपल्या नवसंकल्पनांचे सादरीकरण केले. या सादरीकरणाचे  ज्युरी मेंबर कडून मूल्यमापन करण्यात आले. त्यापैकी उत्कृष्ट 10 नवसंकल्पानाची निवड करण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी 1 लक्ष रुपयाचे बीज भांडवल  महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मुंबई याच्यामार्फत देण्यात येणार आहे. तसेच श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती यांनी सुध्दा त्यांच्या महाविद्यालयीन स्तरावर अशी नवसंकल्पना स्पर्धा आयोजीत केली होती. ज्यामधील चार विजेत्यांना महाविद्यालयामार्फत प्रत्येकी 50 हजार रुपयांचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिअर कट्टा समन्वयक डॉ. रेखा मग्गीरवार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. व्ही. कोरपे यांनी केले.

 

जिल्हास्तरीय सादरीकरणाचे मुल्यमापन करण्यासाठी ज्युरी मेंबरची नियुक्ती राज्यस्तरावरून विविध क्षेत्रनिहाय करण्यात आली होती. त्यामध्ये ज्युरी मेंबर सहायक प्राध्यापक पियुष डालके, सहायक प्राध्यापक अमितकूमार राणीत, सुशील चरपे, प्राध्यापक काशिनाथ बाराहाते, राजेश चव्हाण, रोशन देवतारे, रश्मी हलगे, सहायक नगररचनाकार जुगल मालधुरे, सहायक प्राध्यापक डॉ.शंतनु लोही, राजेश मेटकर, डॉ.निलेश गोटकर, दिनेश चांडक यांचा समावेश आहे. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालय व जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती