Friday, December 29, 2023

वराहांवरील आफ्रिकन स्वाईन फिवर रोगाबाबत मार्गदर्शक सूचना

 

वराहांवरील आफ्रिकन स्वाईन फिवर रोगाबाबत मार्गदर्शक सूचना

वराहपालन करणाऱ्या सर्व आस्थापनांनी स्वच्छता व जैव सुरक्षा उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी

- जिल्हाधिकारी सौरभ कटियार

 

            अमरावती, दि. 29 (जिमाका) : अचलपूर तालुक्यातील मौजा फरमानपूर येथील मृत वराहाच्या घेण्यात आलेल्या नमुन्यामध्ये प्राप्त अहवालात आफ्रिकन स्वाईन फिवर हा रोग आढळून आलेला आहे. रोगाचा प्रार्दुभाव रोखणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मौजा फरमानपूर या भागाचे एक कि.मी. परिघातील क्षेत्रास बाधितक्षेत्र व दहा कि.मी. परिघातील क्षेत्रास संनियंत्रण क्षेत्र घोषित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आदेशित केले आहे. आफ्रिकन स्वाईन फिवर रोगाबाबत मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे :

            बाधित क्षेत्राच्या एक कि.मी. परिसरातील सर्व वराहांचे कलिंग करुन त्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावून त्या परिसराचे  निर्जंतूकीकरण करावे. आफ्रिकन स्वाईन फिवर या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित परिसरातील सक्रिय संनिरीक्षण व्यापक प्रमाणावर करावे व सुयोग्य जैवसुरक्षा उपाय योजना कराव्यात. पाळीव तसेच जंगली वराहातील अनियमित मर्तूकीवर बारकाईने लक्ष ठेवावे. वराहाच्या मासाची विक्री करणाऱ्या आस्थापनाची नोंदणी करण्याची प्रक्रिया पूर्ण करुन त्या आस्थापनांना स्थानिक पशू वैद्यकीय यांनी नियमित भेटी देऊन नियंत्रण ठेवावे. तसेच वराहपालन करणाऱ्या सर्व आस्थापनांनी स्वच्छता व जैव सुरक्षा उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी .

            घरगुती तसेच हॉटेलमधील वाया गेलेले, शिल्लक राहिलेले अन्न वराहांना देणे ही बाब विषाणूच्या प्रसारास मुख्यत्वे करुन कारणीभूत आहे. यामुळे वराहांना अशा प्रकारचे खाद्य देणे टाळावे. असे करणे अवघड असल्यास मांसविरहित (शाकाहारी) अन्न 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ उकळून द्यावे. निरोगी वराहाच्या घरगुती व कत्तलखान्यातील कच्चे मांस, उपपदार्थ तसेच कचऱ्याशी संपर्क येणार नाही याची दक्षता घ्यावी.

            वराह पालन केंद्रातील तसेच वराह मांस विक्री केंद्रातील कचरा एकत्रित साठवून ठेऊ नये. सर्व कचरा नष्ट करावा अथवा त्याचे सार्वजनिक कचरा व्यवस्थापनांकडून शास्त्रोक्तदृष्ट्या योग्यरितीने विल्हेवाट लावावी.  वराह पालन करणारे पशूपालक या व्यवसायसंबंधी व्यक्ती जसे व्यापारी, वितरक, कसाई  यांच्यामध्ये या रोगाविषयक जागृकता निर्माण करुन रोगाच्या प्रादुर्भावाविषयी सूचना देणे व सुप्त संनिरीक्षण करण्यासाठी अवगत करावे.

            पशुपालकांना या रोगाची लक्षणे, संनिरीक्षण धोरण, रोग नियंत्रण उपाययोजनांबाबत प्रशिक्षण देण्यात यावे. पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पोलीस व चेक नाके यांच्याशी समन्वय ठेऊन शेजारील राज्यातील वराहांचे अनधिकृत प्रवेश होणार नाहीत , यांची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी  दिले आहेत.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...