Saturday, September 1, 2018

आपली बँक आपल्या दारी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा जिल्ह्यात शुभारंभ -खासदार आनंदराव अडसूळ





       अमरावती, दि. 1 : बँकिंगची घरपोच आणि विनामूल्य सेवा देणारी इंडिया पोस्ट पेमेंट बँक नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त असून मेळघाटसारख्या दुर्गम परिसरात या सेवेचा मोठा लाभ होणार आहे, असे खासदार आनंदराव अडसूळ यांनी आज येथे सांगितले.  
           भारतीय टपाल विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक या उपक्रमाचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  देशभरात, तर खासदार आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते जिल्ह्यात झाला. मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश वानखडे,  महापालिका गटनेते प्रशांत वानखडे, नागपूर विभागाचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र किसन जायभाये आदी उपस्थित होते. देशातील 650 जिल्ह्यांत हा उपक्रम आज सुरू झाला. अमरावती शहरातील श्याम चौकातील टपाल कार्यालयातील सेवेचा शुभारंभ यावेळी झाला.
         श्री. अडसूळ म्हणाले की, पोस्टाचे जाळे ग्रामीण भागासह सर्वदूर पसरलेले आहे. देशात 39 हजार बँका आहेत आणि 1 लाख 55 हजार पोस्ट कार्यालये आहेत. पोस्टाच्या या विस्तीर्ण सेवेचा बँकिंगसाठी प्रभावी वापर व्हावा या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम नागरिकांच्या सेवेत रुजू होत आहे. त्यामुळे ग्राहकाला प्रत्यक्ष कार्यालयापर्यंत जाण्याची गरज नाही. पोस्टमन घरी येऊन पैसे जमा करेल किंवा काढून देईल. त्याद्वारे 'आपका बँक आपके द्वार' ही संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. ग्रामीण जनजीवनात पोस्टमन या कर्मचाऱ्याने मोठ्या काळापासून आपुलकीचे स्थान मिळवले आहे. या उपक्रमाने हे अनुबंध अधिक दृढ होतील, असा विश्वासही त्यांनी वक्त केला.
        ही सुविधा ग्रामीण भागातील विकासासाठी उपयुक्त ठरेल, असे श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले. दीर्घ काळापासून उत्कृष्ट सेवेमुळे पोस्टाबद्दल जनतेच्या मनात आपुलकी व विश्वास कायम आहे, असे श्री. वानखडे यांनी सांगितले. कार्यालयातर्फे क्यू आर कोडच्या माध्यमातून कार्डचे वितरण नव्या खातेदारांना करण्यात आले.                               बचत खात्यावर 4 टक्के वार्षिक व्याज
 इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खातेदाराकडून एक लाखापर्यंतची रक्कम स्वीकारण्यात येईल. उपक्रमात व्यावसायिकांसह नागरिक खाते उघडू शकतात. बँकेद्वारे मोबाईलच्या माध्यमातून व इंटरनेटद्वारे बँकिंग सुविधाही मिळणार आहेत.  कमीत कमी रक्कम ठेवण्याची अट नसून, बचत खात्याला चार टक्के वार्षिक व्याजही मिळेल, तसेच या खात्यातून अन्य कोणत्याही बँकेच्या खात्यात रक्कम ट्रान्सफर करता येईल. वीज व फोनची देयकेही याद्वारे अदा करता येतील.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...