राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा नेमबाज राही सरनोबत आणि क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना अर्जुन पुरस्कार रुस्तम- ए-हिंद दादू दत्तात्रय चौगुले यांना ध्यानचंद पुरस्कार






नवी दिल्ली, 21 :  क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणा-या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली . महाराष्ट्र कन्या नेमबाज राही सरनोबत आणि क्रिकेटपटू स्मृती मानधना यांना अर्जुन पुरस्कार तर रुस्तम- ए- हिंद दादू दत्तात्रय चौगुले यांना ध्यानचंद पुरस्कार  जाहीर झाला आहे.
            केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०१८ ची घोषणा करण्यात आली. मानाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारोत्तोलक एस.मीराबाई चानू आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांची निवड करण्यात आली आहे. एकूण ६ श्रेणींमध्ये ३५ खेळाडू व प्रशिक्षक आणि  संस्थाना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मंगळवार दिनांक २५ सप्टेंबर २०१८ रोजी राष्ट्रपती भवनात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

                               रूस्तम -ए- हिंद  दादू दत्तात्रय चौगुले यांच्या विषयी
            मुळचे अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथील दादू चौगुले हे कुस्तीनिमित्त वयाच्या सातव्या वर्षी कोल्हापुरातील मोतीबाग तालीममध्ये दाखल झाले. हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले. न्यूझीलंड येथे १९७४ मध्ये ख्राईस्टचर्च येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांनी रौप्यपदकाची कमाई केली. दादू चौगुले यांनी १९७० मध्ये पुणे येथे व १९७१ साली आलिबाग येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत  ‘महाराष्ट्र केसरी’ हा किताब पटकावला.
दादू चौगुले यांनी ३ मार्च १९७३ ला मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुपर हेवी गटात ‘रुस्तम-ए-हिंद’ हा मानाचा किताब पटकावला. त्यानंतर ३ एप्रिल १९७३ ला नवी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत सुपर हेवी गटात ‘महान भारत केसरी’ हा किताब पटकावला.  
सुवर्णकन्या राही सरनोबत  
                     कोल्हापुरात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यर राही सरनोबत या नेमबाजीमधील २५ मीटर ०.२२ स्पोर्टस पिस्तल प्रकारातील आघाडीच्या नेमबाज आहेत. नुकतेच जाकार्ता (इंडोनेशिया) येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत त्यांनी भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले
 त्यांनी २००८ साली झालेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्णपदक पटकाविले. त्यानंतर तिने २०१० साली नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. २०११ साली आशियाई स्पर्धेत त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. याच काळात ग्लासगो येथे झालेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकाविले. अशी कामगिरी करणा-या त्या पहिल्या भारतीय महिला  ठरल्या. ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक, तर इचिऑनमध्ये २०१४ साली झालेल्या आशियाई स्पर्धेत याच प्रकारात तिने कांस्यपदक पटकावले.
क्रिकेटपटू स्मृती मानधना

              मुंबईत जन्मलेल्या स्मृती मानधनाचे बालपण सांगलीत गेले. वयाच्या ९ व्या वर्षीच महाराष्ट्राच्या १५ वर्षांखालील क्रिकेट संघात त्यांची निवड झाली. वयाच्या ११ व्या वर्षी  महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील संघात वर्णी लागली होती. १९ वर्षांखालील संघातून खेळताना त्यांनी गुजरातविरुद्ध नाबाद २२४ धावांची खेळी केली होती. अशी कामगिरी करणा-या त्या पहिली महिला खेळाडू ठरल्या. १० एप्रिल २०१३ ला त्यांनी एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. त्यांनी ४४ एकदिवसीय सामन्यात १६०० धावा केल्या आहेत. प्रसंगी ऑफ ब्रेक गोलंदाजी करणाऱ्या मानधना यांनी भारतीय संघात सलामीच्या फलंदाज म्हणून आपला ठसा उमटविला आहे.
                                               असे आहे पुरस्कारांचे स्वरूप
            साडे सात लाख रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र असे राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे स्वरुप आहे. अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जातील. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार विजेत्यांना चषक आणि प्रमाणपत्र दिले जाईल. आंतर विद्यापीठ स्पर्धेत अव्वल कामगिरी करणाऱ्या गुरुनानकदेव विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आजाद चषक, १० लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहेत.


   राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०१८ साठी निवड झालेल्या खेळाडू व संस्थांची नावे खालील प्रमाणे आहेत.             
  1. राजीव गांधी खेलरत्न-2018
·         एस. मीराबाई चानू- भारोत्तोलन
·         विराट कोहली- क्रिकेट
  1. द्रोणाचार्य पुरस्कार– 2018
·         सुभेदार चेनंदा अच्चय्या कुटप्पा– मुष्टियुद्ध
·         विजय शर्मा– भारोत्तोलन
·         ए. श्रीनिवास राव- टेबल टेनिस
·         सुखदेव सिंग पन्नू- धावपटू
·         क्लॅरेन्स लोगो- हॉकी (जीवनगौरव)
·         तारक सिन्हा- क्रिकेट (जीवनगौरव)
·         जीवन कुमार शर्मा- ज्युडो ( जीवनगौरव)
·         व्ही.आर.बीडू- धावपटू (जीवनगौरव)
  1. अर्जुन पुरस्कार- 2018
·         नीरज चोप्रा-धावपटू
·         नायब सुभेदार जीनसन जॉनसन-धावपटू
·         हीमा दास- धावपटू
·         नेलाकुरथी सिक्की रेड्डी- बॅडमिंटन
·         सुभेदार सतीश कुमार- मुष्टियुद्ध
·         स्मृती मानधना- क्रिकेट
·         शुभंकर शर्मा- गोल्फ
·         मनप्रित सिंग-हॉकी
·         सविता-हॉकी
·         कर्नल रवी राठोड- पोलो
·         राही सरनोबत- नेमबाजी
·         अंकुर मित्तल- नेमबाजी
·         श्रेयसी सिंग- नेमबाजी
·         मनिका बत्रा- टेबल टेनिस
·         जी. साथियन- टेबल टेनिस
·         रोहन बोपन्ना- टेनिस
·         सुमित- कुस्ती
·         पुजा कडियन- वुशू
·         अंकूर धामा- पॅरा ॲथलिटिक्स
·         मनोज सरकार- पॅरा बॅडमिंटन
  1. ध्यानचंद पुरस्कार- 2018
·         सत्यदेव प्रसाद- तिरंदाजी
·         भारत कुमार छेत्री- हॉकी
·         बॉबी अलॉयसियस- धावपटू
·         चौगले दादू दत्तात्रय- कुस्ती
  1. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार- 2018
·         उदयोन्मुख आणि युवा प्रतिभेची निवड आणि प्रोत्साहन- राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड
·         कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून खेळांना प्रोत्साहन- जेएसडब्ल्यू स्पोर्टस्
·         विकासासाठी खेळ- इशा आउटरीच
  1. मौलाना अबुल कलाम आजाद चषक 2017-18
·         गुरु नानक देव विद्यापीठ, अमृतसर

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती