सूर्यगंगा नदीवरील पुलाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
            रस्ते व पायाभूत सुविधांतून विकासाला चालना                                            - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील
अमरावती, दि. 30 : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राला रस्तेविकासासाठी मोठा निधी मिळाला असून अनेक कामे सुरू झाली आहेत. भरभक्कम पायाभूत सुविधांतून विकासाला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे,  असे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे सांगितले. 
तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार या गावाजवळून वाहणाऱ्या सूर्यगंगा नदीवरील उंच पुलाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार यशोमती ठाकूर,भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, निवेदिता दिधडे चौधरी, केंद्र शासनाच्या गंगा पुनर्जीवन प्रकल्पाचे सल्लागार सुधीर दिवे,  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे स्वीय सचिव मनोज वाडेकर, सा. बां.  विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक साळवी आदी उपस्थित होते. शेंदुरजना येथे 11 कोटी 41 लाख रुपयांच्या निधीतून मोठा पूल उभारण्यात येणार आहे. हा पूल 6 मीटर उंच, 12 मीटर रुंद व 120 मीटर लांब असेल. हे बांधकाम जून 2019 पूर्वी पूर्ण करण्यात येईल. 
पालकमंत्री श्री. पोटे पाटील म्हणाले की, शेंदूरजना या संत अच्युत महाराज यांच्या कर्मभूमीत आज पुलाचे काम सुरु होत आहे. याचप्रकारे संपूर्ण राज्यात रस्ते, पूल आणि विविध पायाभूत सुविधांची निर्मिती सुरु आहे. केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी यांनी राज्याला मोठा निधी मिळवून दिला आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात 20 हजार 500 कोटी रुपये इतका मोठा निधी येऊन अनेक कामे पूर्णत्वास जात आहेत. यातून अधिक प्रभावी विकास साधणे शक्य होणार आहे. शेंदुरजना गावाचे सुपुत्र मनोज वाडेकर यांनी या पुलाचे काम मार्गी लागण्यासाठी महत्वाचे प्रयत्न केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी आणि इतर व्यक्त्यांनीही त्यांचे कौतुक केले.
  
      संत अच्युत महाराज कर्मभूमी विकास आराखडा व नमामी वसिष्ठा प्रकल्प राबविण्याची गरज श्रीमती ठाकूर यांनी व्यक्त केली. श्री. साळवे यांनी प्रास्ताविक केले.  सरपंच सागर बोडके यांनी आभार मानले. 

  
 
                    
शेंदुरजना येथील यापूर्वीचा पूल 1948 मध्ये उभारण्यात आला होता. तो बसका व पावसाळ्यात त्यावरून पाणी वाहत असल्याने उंच पूल निर्माण करण्याची नागरिकांची मागणी होती. ती लक्षात घेऊन पुलासाठी केंद्रीय मार्ग निधीतून तत्काळ निधी उपलब्ध करून देण्यात आला. तिवसा, कुऱ्हा, अंजनसिंगी, धामणगाव रेल्वे, यवतमाळ या मार्गावरील वाहतूकीला पुलाचा फायदा होणार आहे.

000





Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती