मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी स्वीप मोहिम




अमरावती, दि. 12 : लोकशाही प्रक्रियेत अधिकाधिक मतदारांचा समावेश करणे व मतदार यादी अद्ययावत करणे यासाठी भारत निवडणूक आयोगाने स्वीप (Systematic Voters' Education and Electoral Participation ) मोहिम हाती घेतली आहे. नवमतदारांसह सर्व घटकांनी यात सहभागी होऊन लोकशाही प्रक्रिया अधिक बळकट करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी आज केले.
स्वीप गाभा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण) मंगला मून, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, महिला व बाल कल्याण प्रकल्प संचालक प्रवीण येवतीकर, आकाशवाणीच्या सुनालिनी शर्मा, नायब तहसीलदार श्रीमती लबडे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे डॉ.एच.आर.देशमुख, आरोग्य अधिकारी डॉ.अरुण लोहकपुरे, महापालिकेचे सहाय्यक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे, एस.एस.शेंडगे, दीपक डांगे आदी यावेळी उपस्थित होते.
लोकशाही व निवडणूकासंबंधी सातत्यपूर्ण शिक्षण मोहिमेत मतदार नोंदणी व मतदानाचे प्रमाण वाढवून गुणात्मक सहभाग वाढविणे यासाठी प्रत्येक तालुक्यात मोहिम राबविण्यात येत आहे. मतदान केंद्राच्या सुसुत्रीकरणानंतर मतदान केंद्रांची संख्या 2607 वर गेली आहे. तथापि, मतदान टक्केवारीतही वाढ व्हावी असा प्रयत्न आहे, असे श्री. पाटील म्हणाले.
श्री. पाटील पुढे म्हणाले की, महिला, नवमतदार, दिव्यांग मतदार, सेवा मतदार, तृतीयपंथी मतदार अशा विविध घटकांना प्रक्रियेत सामावून घेण्याचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे इव्हीएम व व्हीव्हीपीएटी यंत्रणेबाबत नागरिकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. निवडणूकीसाठी अद्ययावत यंत्रणा निर्माण करण्यात आली असून त्याच्या चाचणीसाठी व तसेच विश्वासार्हता जोपासण्यासाठी विविध राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी सर्व विभागांनी समन्वय ठेऊन काम करण्याचे आवाहन ही श्री. पाटील यांनी केले. विद्यापीठाकडून मोहिम तरुणांपर्यंत पोहचविण्यासाठी महाविद्यालयांचा सहभाग मिळविण्यात येईल, असे श्री. देशमुख म्हणाले. व्यापक जनजागृतीसाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती