पालकमंत्र्यांकडून संपू्र्ण शहरात स्वच्छताकामांची पाहणी साथरोगाने प्राणहानी झाल्यास जबाबदार संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू -पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील









डेंग्यू, स्वाईन फ्लू आदी साथ आजारांच्या पार्श्वभूमीवर शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेने अधिक सजगतेने काम करणे आवश्यक आहे. तथापि, अस्वच्छतेमुळे साथरोग पसरत असल्याच्या मोठ्या तक्रारी आहेत. अशा स्थितीमुळे प्राणहानी झाल्यास जबाबदार अधिकारी- कर्मचा-यावर मनुष्यवधाचा गुन्हा मी स्वत: दाखल करेन, असा स्पष्ट इशारा पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज दिला.     
          शहरातील साथ आजारांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी महापालिका यंत्रणेची बैठक काल जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली व शहरातील स्वच्छतेच्या कामाबद्दल निर्देश दिले. त्याच अनुषंगाने आज सकाळपासून पालकमंत्र्यांनी शहरातील विविध प्रभागांची पाहणी संपूर्ण दिवसभर अथकपणे केली. महापालिका आयुक्त संजय निपाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा नैताम, संबंधित प्रभागाचे नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
या दौ-यात पालकमंत्र्यांनी प्रत्येक परिसरात जाऊन तेथील कंटेनर ठेवण्याच्या जागा, कचरा साठलेल्या जागा आदी ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रियाही जाणून घेतल्या. तेथील लोकप्रतिनिधींशीही या कामांबाबत चर्चा केली.
या पाहणीत नागरिकांनी दर्शवलेल्या कचरा साठलेल्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी स्वत: जाऊन स्वच्छता कामांसाठी जबाबदार कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक यांना कामाबाबत विचारणा केली, तसेच कर्तव्यात कसूर करणा-या कर्मचा-यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, असे सुस्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी पालिका प्रशासनाला दिले.   
कचरा साठल्याची तक्रार कंत्राटदाराकडे, कर्मचारी व जबाबदार यंत्रणेकडे केल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नसल्याची तक्रार न्यू सातुर्णानगर येथे श्रीमती सुनंदा चिखलकर यांनी केली. याबाबत तत्काळ संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
पालकमंत्री श्री. पोटे- पाटील म्हणाले की, हा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे त्याचे गांभीर्य ओळखून कामात पालिका यंत्रणेने दक्षता राखली पाहिजे. कर्तव्यपालन न करणा-या कर्मचारी व कंत्राटादारांची यादी करुन तत्काळ कारवाईचे निर्देश त्यांनी दिले.
                    दिवसभर अथकपणे पाहणी
 शेगाव नाका, रहाटगाव, नवसारी, साईनगर, सातुर्णा, न्यू सातुर्णानगर,  गडगडेश्वर, अंबाविहार, पार्वतीनगर, रवीनगर, शेगाव नाका, आशियाड कॉलनी, इमामनगर, अल हिलाल कॉलनी यासह विविध परिसरांत जवळजवळ संपूर्ण शहरभर पालकमंत्र्यांनी अथकपणे पाहणी केली.
                             सुकळी कचरा डेपोची पाहणी
          त्यानंतर प्रत्यक्ष सुकळी येथील कचरा डेपोला भेट देऊन तेथे दिवसभरात किती कंटेनर येतात, याची माहिती घेतली व तेथील रजिस्टरही तपासले. कचरा डेपोत प्रत्यक्षात किती कंटनेर दिवसभरात कचरा वाहून आणतात, रजिस्टरमधील नोंदी व कंटनेरच्या   फे-या यात तफावत आहे किंवा कसे, हे तपासून तत्काळ कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले. दुपारी दोननंतर शहरात एकही गाडी फिरत नसल्याच्या तक्रारी आहेत. कंटेनरच्या नोंदी नियमित तपासत राहणे आवश्यक आहे. आकडेवारीनुसार कंटेनरची संख्या तत्काळ तपासण्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण करावी, असेही ते म्हणाले. त्यानुसार कंटेनरवर क्रमांक टाकण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
          सकाळपासून संपूर्ण दिवसभर चाललेल्या या पाहणी दौ-यात ठिकठिकाणचे नगरसेवक, अधिकारी- कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व शेकडो नागरिक उपस्थित होते.
000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती