Wednesday, September 5, 2018

रिक्षा चालकाने लोकशाही दिनात व्यक्त केली भावना मुख्यमंत्री साहेब धन्यवाद मला न्याय मिळाला !


मुंबई, दि.5 : ‘मुख्यमंत्री साहेब, माझ्या तक्रारीची आपण दखल घेऊन मला न्याय मिळवुन दिला. थेट आपल्याशी बोलायला मिळाले, आपला आभारी आहे’, अशा शब्दात उल्हासनगर येथील रिक्षाचालक अरुण खैरे यांनी आपली भावना लोकशाही दिनात आज व्यक्त केली.
आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 110 वा लोकशाही दिन झाला. यावेळी पनवेल, शहापूर, पुणे, लातूर, सांगली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, यवतमाळ, पंढरपूर, चांदूरबाजार येथील नागरिकांच्या तक्रारींवर सुनावणी करण्यात आली.
उल्हासनगर येथील अरुण खैरे रिक्षा चालक आहेत. त्यांच्या अंबरनाथ येथील गुरुकूल ग्रॅण्ड युनियन शाळेत शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेश मिळाला असून ही शाळा आपल्या पाल्याला गणवेश, पाठ्यपुस्तक देत नसल्याबाबत तक्रार केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी तक्रार ऐकून योग्य ती कार्यवाही करण्याबाबत निर्देश ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पालक श्री. खैरे व संबंधित शाळेच्या प्राचार्य उपस्थित होते. दोघांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. खैरे यांच्या पाल्याला गणवेश आणि पाठ्यपुस्तके शाळेमार्फत देण्यात येतील, अशी ग्वाही प्राचार्यांनी दिली. तक्रारीवर तोडगा निघाल्याने श्री. खैरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि मुख्यमंत्र्यांशी थेट बोलायला मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यवतमाळ येथील एकनाथ ठोंबरे यांनी सिंचन विहिरींचा लाभ न मिळाल्याबाबत तक्रार दाखल  केली होती. त्यावर  महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत त्यांना विहिर मंजूर करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. कांदिवली येथील हर्षदा गायतोंडे यांनी आपल्या सदनिकेच्या वर राहणाऱ्या रहिवाशांनी तोडफोड केल्याने गायतोंडे यांच्या मालकीच्या सदनिकेत पाण्याची गळती होत असल्याबाबत गेल्या महिन्याच्या लोकशाही दिनात तक्रार दाखल केली होती. त्याची कार्यवाही पूर्ण करत आयआयटी अभियंत्यामार्फत सदनिकेची तपासणी करुन दुरुस्ती करुन घेतल्याचे नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी सांगितले.
आतापर्यंत लोकशाही दिनात 1493 अर्ज दाखल झाले असून त्यापैकी 1486 अर्ज निकाली काढले आहेत. यावेळी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, सामान्य विभागाचे अपर मुख्य सचिव बिपीन मलीक, स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदींसह अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...