Sunday, September 23, 2018

आयुष्यमान भारत’ योजनेचा जिल्ह्यात शुभारंभ
जिल्ह्यात साडेतीन लाखांहून अधिक कुटुंबांना लाभ
-         पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

अमरावती, दि. 23: ‘आयुष्यमान भारत’ ही योजना वंचित घटकांसाठी महत्वपूर्ण असून,  या योजनेसह महात्मा फुले जनआरोग्य योजनाही एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. त्यामुळे 90 टक्के लोकसंख्येला या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील साडेतीन लाखांहून अधिक व्यक्तींना अर्थात तेवढ्या कुटुंबांना त्याचा लाभ मिळणार आहे, असे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे सांगितले.
           झारखंडमधील रांची येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘आयुष्मान भारत’ योजनेचा राष्ट्रव्यापी शुभारंभ केला. त्याचवेळी जिल्ह्यात या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांच्या उपस्थितीत इर्विन रुग्णालयात झाला. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, आरोग्य उपसंचालक डॉ. फारूकी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. अरुण लोहकपुरे, डॉ. किल्लेदार आदी यावेळी उपस्थित होते.
  श्री. पोटे पाटील म्हणाले की, वैद्यकीय उपचाराच्या खर्च गरीब नागरिकांना परवडत नाही. त्यामुळे ‘आयुष्मान भारत’ योजना ही वरदान ठरणार आहे. गरीबांना खासगी रुग्णालयांतही सेवा या माध्यमातून मिळू शकेल. या योजनेचे वैशिष्टय म्हणजे लाभार्थ्याला कुठलाही अर्ज भरावा लागणार नाही. सहज सुलभपणे रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची सुविधा या योजनेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, आयुष्मान कार्डाधारे राज्याबाहेरील रुग्णालयांतही उपचार घेता येतील. पाच लाख रुपयांपर्यंत उपचार व सेवा याद्वारे मिळणार आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागाच्या आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक वाढून रोजगारही उपलब्ध होतील.   
              योजनेत समाविष्ट आजार, योजनेंतर्गत रुग्णालयांची यादी व टोल फ्री क्रमांकाची माहितीही कार्डासोबत प्रसारित करावी, अशी सूचना श्री. सिंह यांनी केली. डॉ. फारूकी यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी 14 लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डांचे वितरण करण्यात आले. उत्तम मुडवाईक हे  जिल्ह्यातील पहिले लाभार्थी ठरले.
राज्यात  83.72 लाख कुटुंबांची निवड आयुष्मान योजनेंतर्गत करण्यात आली असून त्यांना दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत मिळणार आहेत. या योजनेत शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये सहभागी होणार आहेत. त्यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना उपचाराची सुविधा देणार आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांनादेखील सहभागी करुन घेतले जाणार आहे, असे डॉ. निकम यांनी  प्रास्ताविकात सांगितले.

        राज्यात सध्या पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविली जात असून त्याचा लाभ 2 कोटी 23 लाख कुटुंबाना देण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून 971 प्रकारचे उपचार, 121 शस्त्रक्रिया पश्चात सेवा देण्यात येत असून प्रतिवर्ष दीड लाख रुपयांपर्यंत उपचारांची सुविधा योजनेतून दिली जात आहे. राज्यातील 484 शासकीय व खासगी रुग्णालयांमार्फत ही सेवा दिली जात आहे. आतापर्यंत 19 लाखांहून अधिक शस्त्रक्रिया योजनेंतर्गत करण्यात आल्या आहेत.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...