Saturday, September 29, 2018

पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात सुमारे पावणेसातशे निवेदने दाखल
नागरिकांच्या मागण्यांवर तत्काळ कार्यवाही व्हावी
                                       -पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

      अमरावती, दि. 29 :  स्वच्छतेचा प्रश्न नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असून, त्याबाबत काटेकोर कामे झाली पाहिजेत. शहरातील एकही परिसर अस्वच्छ राहता कामा नये. जनता दरबारात नागरिकांनी दिलेल्या निवेदनांवर तत्काळ कार्यवाही व्हावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले.
            शहरात साथ आजारांच्या पार्श्वभूमीवर महापालिका यंत्रणा व विविध विभागांची बैठक पालकमंत्र्यांनी नुकतीच घेतली होती. त्यानंतर पालकमंत्र्यांनी दिवसभर शहरात स्वच्छता कामांची पाहणी करून कार्यवाहीबाबत निर्देश दिले होते आणि आपल्या परिसरातील तक्रारी जनता दरबारातून दाखल करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. जनता दरबारात लेखी निवेदनांद्वारे सुमारे 400, तर दूरध्वनीद्वारे 272 निवेदने दाखल झाली.
आज सकाळपासूनच पालकमंत्र्यांच्या इर्विन चौक स्थित जनसंपर्क कार्यालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.  शहरातील अनेक नगरसेवक, आयुक्त संजय निपाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा नैताम यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
            पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी जनता दरबारात संपूर्ण दिवसभर अथकपणे निवेदने स्वीकारत नागरिकांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या, तसेच प्रशासनाला तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले.  
पालकमंत्री पोटे पाटील म्हणाले की, स्वच्छतेचा मुद्दा थेट आरोग्याशी निगडित आहे. त्यामुळे नगरसेवक व नागरिकांच्या मागणीनुसार संपूर्ण शहरातील स्वच्छतेबाबत प्रत्यक्ष पाहणीतून आढावा घेतला. प्रशासन लोकप्रतिनिधींच्या सूचनांची दखल घेत नाही, तसेच नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर असल्याने संपूर्ण आढावा घेतला. त्याचा शहरात काही प्रमाणात निश्चित सुयोग्य परिणाम दिसून आला. कचरा उचलण्याचे प्रमाण वाढले आहे.
            महापालिकेत स्वच्छतेची कामे करणारे बहुतेक कंत्राटदारी कर्मचारी आहेत. स्वच्छतेचा प्रश्न थेट आरोग्याशी निगडित असल्याने कायमस्वरूपी कर्मचारी असले पाहिजेत. प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सूचनांनुसार कामे केली पाहिजेत. कुणाही व्यक्तीचा शहरातील अस्वच्छतेमुळे पसरलेल्या आजाराने मृत्यू झाल्याची तक्रार आली तर त्यासंबंधी जबाबदार व्यक्तींवर फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
                                               


                                      पालकमंत्र्यांकडून नागरिकांना आवाहन
     अमरावती जिल्हा ही जगाला स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबांची भूमी आहे. जिल्ह्याचा हा लौकिक राखण्याची व वाढविण्याची जबाबदारी प्रशासनाची व नागरिकांची आहे. त्यामुळे विविध क्षेत्र काम करणारे नागरिक, शहरातील विक्रेते, दुकानदार, उपाहारगृहचालक आदींनी शहराची स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने स्वच्छ महाराष्ट्र मोहिमेसारखा राज्यव्यापी कार्यक्रम राबविला आहे. शासनाच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे कचरा कचरापेटीतच टाकणे आदी शिस्त सर्वांनीच पाळली पाहिजे, असेही ते म्हणाले.

                                                            ०००



No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...