महाराष्ट्राला मनरेगाचे ४ पुरस्कार ‘जलयुक्त शिवार’ व ‘मागेल त्याला शेततळे’योजनांची राष्ट्रीय पातळीवर दखल


केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणा-या ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार- २०१८’ (मनरेगा) अंतर्गत महाराष्ट्राला चार पुरस्कार जाहीर झाले आहेत. विशेषत: मुख्यमंत्र्याची महत्वाकांक्षी योजना ‘जलयुक्त शिवार’ व ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत झालेल्या रोजगार निर्मितीची खास दखल घेण्यात आली आहे.
मंगळवार दिनांक ११ सप्टेंबर २०१८ रोजी दिल्लीत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. रोजगार हमी योजनेच्या उत्कृष्ट अंमलबाजवणीसाठी महाराष्ट्राला राज्य, जिल्हा, ग्रामपंचायत आणि पोस्ट ऑफीस अशा चार श्रेणींमध्ये पुरस्कार जाहीर झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ व ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह जलसिंचनात केलेल्या उत्तम कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रोजगार हमी विभागाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
रोजगार हमी विभागाने आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये नैसर्गीक स्त्रोतांचे व्यवस्थापनांतर्गत(एनआरएम) एकूण 70 हजार 514 कामे पूर्ण केली आहेत व यासाठी 1451.74 कोटींचा व्यय झाला आहे. एनआरएम अंतर्गत राज्य शासनाची महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार योजना’ व ‘मागेल त्याला शेततळे’ या योजना राबविण्यात आल्या व यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. या विभागाने एनआरएमच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला नकाशे पुरविले आहेत आहेत. राज्याच्या रोजगार हमी योजना व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह मनरेगा आयुक्त आदी वरिष्ठ अधिकारी हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.
मनरेगा अंतर्गत गडचिरोली जिल्हा सर्वोत्तम
गडचिरोली जिल्हा हा मनरेगा अंतर्गत सर्वोउत्कृष्ट कार्य करणारा राज्यातील जिल्हा ठरला आहे. गडचिरोलीचे माजी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नाईक यांच्या कुशल नेतृत्वात आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 8 हजार 894 कामांना सुरुवात झाली यातून दोन वर्षात 39.12 लाख मनुष्य दिन निर्मिती झाली. विद्यमान जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्या नेतृत्वात या आदिवासी बहुल जिल्हयामध्ये मनरेगाअंतर्गत वैयक्तिक कामांवर भर देण्यात आला आहे आतापर्यंत जिल्हयात शेततळे, सिंचन विहीर, वर्मी कंपोस्ट आदी 6 हजार750 कामे पूर्ण झाली आहेत व यातून मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती झाली आहे. मनरेगा पुरस्काराचा बहुमान मिळविणा-या गडचिरोलीचे माजी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नाईक आणि विद्यमान जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना मनरेगा पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.
मनरेगा अंमलबजावणीत नागरी ग्रामपंचायत राज्यात सर्वोत्कृष्ट
मनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीसाठी गडचिरोली जिल्हयातीलच गडचिरोली ब्लॉक मधील नागरी ग्रामपंचायतीची सर्वोत्तम ग्रामपंचायत म्हणून निवड झाली आहे. सरपंच अजय मशाखेत्री यांच्या नेतृत्वामुळे ग्रामपंचायतीने एनआरएमची कामे हाती घेतली व लवकरच एनआरएमची 38 कामे पूर्णत्वास नेली यामाध्यमातून गावात मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती झाली. सरपंच अजय मशाखेत्री आणि ग्रामसेवक राकेश शिवणकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
श्रीमती नूतन प्रकाश यांना उत्कृष्ट डाकसेवक पुरस्कार
ठाणे जिल्हयातील खुटाघर येथील ग्राम डाकसेवक श्रीमती नुतक प्रकाश यांची मनरेगाच्या प्रभावी अंमलबजाणीकरिता केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्यातील सर्वोत्तम ग्राम डाकसेवक म्हणून निवड झाली आहे. त्यांनी या भागातील कामगारांना मनरेगा अंतर्गत विविध कामे व योजनांची माहिती दिली व या भागात मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी कामगारही उपलब्ध करून दिले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना सन्मानीत करण्यात येणार आहे.
उत्कृष्ट कार्यासाठी जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल आणि राज्याचे मुख्यसचिव डी.के.जैन यांनी राज्य शासनाचे विभाग ,अधिकारी तथा लोकप्रतिनिधींचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती