शहर स्वच्छतेबाबत पालकमंत्र्यांचा शनिवारी जनता दरबार


             अमरावती, दि.21: शहरातील स्वच्छता व कचऱ्याचा प्रश्न आदींबाबत नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांचा जनता दरबार शनिवार, दि. 29 सप्टेंबरला दुपारी 1 ते 5 या वेळेदरम्यान त्यांच्या कॅम्प रस्त्यावरील जनसंपर्क कार्यालयात होणार आहे. 
            शहरातील साथ रोगांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी दि. 19 सप्टेंबरला महापालिका प्रशासनाची बैठक घेऊन निर्देश दिले होते व आपण शहरातील कंटेनर स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचेही सांगितले होते. त्यानुसार, दि. 20 सप्टेंबरला त्यांनी शहरभर ठिकठिकाणी कचरा कंटेनर, सुकळी येथील कचरा डेपो आदी स्थळांची दिवसभर अथकपणे पाहणी करुन नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तसेच तत्काळ कार्यवाहीबाबत प्रशासनाला निर्देशही दिले. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले. एका आठवड्याच्या आत शहरातील स्वच्छतेबाबत परिस्थिती सुधारली पाहिजे व सगळीकडे नियमित स्वच्छता दिसावी, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.
            याच अनुषंगाने पुढील आठवड्यात हा दरबार होणार आहे. बैठक व पाहणी दौऱ्यानंतर निर्देशांच्या अनुषंगाने कंत्राटदार व जबाबदार यंत्रणेकडून कामात सुधारणा झाली किंवा कसे, याचा पडताळा थेट जनता संवादातून होईल.
            समस्त शहरातील नागरिकांना स्वच्छतेबाबत आपल्या तक्रारी व म्हणणे मांडण्याची संधी जनता दरबारातून मिळणार आहे. अशा तक्रारींबाबत पालकमंत्र्यांकडून ऑन दि स्पॉट निर्णय व कार्यवाही होणार आहे. नागरिकांना आपल्या घराशेजारील, परिसरातील स्वच्छता, पालिकेकडून होणारी कार्यवाही आदींबाबत दरबारात म्हणणे मांडता येईल. नागरिकांनी आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर, तक्रारीचे स्वरुप, यापूर्वी तक्रार केली असल्यास तिचा तपशील अशी लेखी तक्रार घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.      
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती