राजमाता अहिल्यादेवी फौंडेशनतर्फे विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव अहिल्यादेवी फौंडेशनचे कार्य कौतुकास्पद -पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील








अमरावती, दि. 11 : देश आणि समाजाच्या जडणघडणीत महिलांचे मोठे योगदान आहे. राजमाता अहिल्यादेवी फौंडेशनकडून विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवणा-या महिलांचा एका व्यासपीठावर सत्कार होणे हा ख-या अर्थाने स्त्री-शक्तीचा गौरव आहे, असे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे सांगितले.
राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशनतर्फे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्कारांचे वितरण करताना ते बोलत होते. खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार ॲड. यशोमती ठाकूर, श्रीमती कमलताई गवई, सुरेखाताई ठाकरे, अभिनेत्री अनिताराज, डॉ. सुनीता महात्मे, फौंडेशनचे अध्यक्ष संतोष महात्मे व पदाधिकारी उपस्थित होते. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर, मॅराथॉन धावपटू लता करे, चाळीसगाव येथील उद्योजिका मीनाक्षी निकम यांना यावेळी पुरस्काराने गौरविण्यात आले.  नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुचेता धामणे यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला असून, काही कारणांस्तव त्या उपस्थित राहू न शकल्याने त्यांना तो स्वतंत्रपणे प्रदान करण्यात येणार आहे.
श्री. पोटे- पाटील म्हणाले की, पुरस्कारप्राप्त महिलांची त्या त्या क्षेत्रातील कामगिरी, जिद्द व कष्ट सगळ्यांसाठीच प्रेरणादायी आहेत. मनात विश्वास व जिद्द असेल तर अनेक शिखरे पादाक्रांत करता येतात, हे या महिलांनी आपल्या कामगिरीतून दाखवून दिले. त्यांचा गौरव करण्याचे फौंडेशनचेही कार्य कौतुकास्पद आहे.
ॲड. ठाकूर म्हणाल्या की, फौंडेशनने राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांना एकत्रित आणून स्त्रीशक्तीचा गौरव केला आणि हा सुंदर व प्रेरणादायी कार्यक्रम घडवून आणला. हा उपक्रम अमरावती जिल्ह्यासाठी भूषणावह आहे.  डॉ. महात्मे, श्रीमती गवई, अभिनेत्री अनिताराज व श्रीमती ठाकरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर आजारी पतीच्या उपचारासाठी पैसे मिळविण्यासाठी मॅराथॉनमध्ये उतरून जिंकणा-या श्रीमती लता करे, अपंग असतानाही उत्कृष्ट उद्योग उभारणा-या मीनाक्षी निकम व लावणी कलावंत सुरेखा पुणेकर यांची मनोगते सभागृहाला जिंकून घेणारी ठरली.
रवींद्र गोरडे यांनी आभार मानले. श्रीमती राठोड यांनी सूत्रसंचालन केले.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती