Friday, July 31, 2020

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन












जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज

-       पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

  अमरावती, दि. 31 : पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे, पुरामुळे नैसर्गिक आपदेचा प्रसंग ओढवतो. अशा नैसर्गिक आपत्तीत जिवितहानी व वित्तहानी होण्याची दाट शक्यता असते, त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीचे पूर्व नियोजन करुन व्यवस्थापन करणे आता काळाची गरज झाली आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले. 

येथील राज्य राखीव पोलीस गट क्र. 9 येथे आज पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल, गटाचे समादेशक लोहीत मत्तानी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन केंद्राची चमू यावेळी उपस्थित होते.

 

  श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, नैसर्गिक, मानवी आणि जैविक असे आपत्तीचे तीन प्रकार असून, या सर्व आपत्तींचे पूर्व नियोजन करणे ही काळाची गरज आहे, कारण अशा आपत्तींमुळे  मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी होण्याची शक्यता असते. जिल्हास्थरावर स्थापित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या जवानांना अशा आपदा परिस्थिती संदर्भात माहिती देणे, तसेच त्यापध्दतीने जवानांना प्रशिक्षित करुन सजग ठेवणे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापन केंद्राची हेल्पलाईन चोवीस तास ऑनलाईन ठेवावी. जिल्ह्यात कुठेही नैसर्गिक आपदा उद्भवल्यास तातडीने जिल्हा प्रशासनाने त्याठिकाणी मदत पोहोचवावी. नागरिकांनी सुरक्षित स्थळी तसेच निवाऱ्याची सुविधा, जेवनाचे पाकीट, वैद्यकीय सुविधा आदी बाबी तातडीने त्याठिकाणी पुरविण्यासाठी नियोजन करावे. सुरळीत व पूर्व नियोजन करुन व्यवस्थापन केले तर आपण आपत्तीवर मात करु शकतो, असे त्या म्हणाल्या.

जिल्ह्याच्या सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, युवक-युवतींना, महिलांना तसेच गावकऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनचे प्रशिक्षण देता यावे, तसेच आवश्यक साधन सामुग्री खरेदी करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यपस्थापन प्राधिकरणला 21 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी दिली. या माध्यमातून अतिधोक्याच्या गावात, नदी काळच्या गावातील नागरिकांना आपत्तीच्या समयी कशा पध्दतीने मदत करावयाची याचे प्रात्यक्षिकेतून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपत्तीच्या वेळी सुरक्षा कशी करावयाची याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

 

 

यावेळी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या जवानांनी अतिशय कठीण अश्या अतिशय कठीण प्रात्यक्षिकांचे सादरीकरण पालकमंत्री तसेच उपस्थित अधिकाऱ्यांसमोर प्रस्तूत केले.आज उद्घाटीत झालेल्या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक-युवतींना पूर व्यवस्थापन कसे करायचे, अपघातात अडकलेल्या लोकांना कसे सोडवायचे, प्रथमोपचार कसे द्यायचे, बोट कशी चालवायची, तराफा कसा चालवायचा आदींचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. रामेकर यांनी यावेळी दिली.

 

00000

 


अनाथ लेकरांना कुटुंब मिळवून देणे पुण्याचे काम - ॲड. यशोमती ठाकूर



'फॉस्टर केअर' अर्थात प्रतिपालकत्व योजनेची सुरुवात

अनाथ लेकरांना कुटुंब मिळवून देणे पुण्याचे काम

-         ॲड. यशोमती ठाकूर

 

▪ प्रायोगिक स्वरूपात ५ जिल्ह्यात होणार अंमलबजावणी

▪ ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध

 

मुंबई, दि. ३१: एक मुलगी, आई अशा भूमिका मीदेखील बजावत आहे. त्यामुळे कुंटुंबाची, त्यांच्या प्रेमाची गरज याची जाणीव मला आहे. त्यामुळे अनाथ मुलांना कुटुंबाचे प्रेम मिळवून देऊ शकणारी प्रतीपालकत्व योजना क्रांतिकारी ठरणार असून अनाथ बालकांना घर मिळवून देण्याच्या कामाइतके मोठे पुण्य नाही, अशी भावना महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. 

 

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत पुणे येथील महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्थेच्यावतीने आयोजित तीन दिवसीय प्रतीपालकत्व प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप आणि महिला व बाल विकास विभागाच्या अधिनस्त बालगृहातील अनाथ बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना सुरक्षित कुंटुंब, घर मिळवून देणाऱ्या प्रतीपालकत्व (फॉस्टर केअर) योजनेची प्रायोगिक स्वरूपात सुरुवात आज ॲड. ठाकूर यांनी ऑनलाईन कार्यक्रमातून केली. यावेळी महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त आय. ए. कुंदन, महिला व बाल विकास आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद, सहायक आयुक्त मनीषा बिरासीस आदी उपस्थित होते. 

 

यावेळी मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, अनाथ मुलांना कुटुंब मिळवून देण्यासाठी विभाग करत असलेले अथक प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मुलांना फॉस्टर केअरच्या माध्यमातून घर मिळवून दिले, योजनेची नीट अंमलबजावणी झाली तर उद्याची युवा पिढी मानसिक, शारीरिक तसेच सामाजिकदृष्ट्या सक्षम होईल. भविष्यातील भारत घडविण्याचे कार्य यातून होईल. ही योजना प्रत्यक्षात येताना अनेक अडचणी येऊ शकतात याची मला जाणीव आहे; परंतु, अतिशय काळजीपुर्वक काम करत त्यावर मात करावी लागेल. या लेकरांना आपले समजून काम केल्यास नक्कीच आपण त्यांना न्याय देऊ शकू असा विश्वास व्यक्त करत ॲड. ठाकूर यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि विभागाला शुभेच्छा दिल्या.

 

 

महिला व बाल विकास आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद म्हणाले, या योजनेबाबत जाणीव जागृती झाली तर अनेक कुंटुंबे पुढे येतील. या योजनेच्या यशस्वीतेसाठी विभाग सजग राहून अमंलबजावणी करेल.

 

काय आहे प्रतीपालकत्व (फॉस्टर केअर) योजना:

 

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ या कायद्याअंतर्गत अनाथ मुलांना महिला व बाल विकास विभागाच्या अधिनस्त बालगृहांमधे ठेवले जाते. कौटुंबिक वातावरणात राहण्याचा बालकांचा हक्क आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करता दत्तक आणि प्रतीपालकत्व प्रायोजकत्व हे संस्थाबाह्य पर्यायही उपलब्ध आहेत. दत्तक प्रक्रियेत कायमस्वरुपी पुर्नवसन होते. परंतु सर्वच बालकांची दत्तक प्रक्रिया होतेच असे नाही. अशावेळी या बालकांचे कायदेशीर पालकत्व न देता त्यांना बाल न्याय कायद्यान्वये प्रतीपालकत्व योजनेत प्रायोजित पालकत्व देता येते. प्रतीपाकलकत्व म्हणजे बालकाला पर्यायी काळजीसाठी प्रायोजकत्व आणि प्रतीपालकत्व मान्यता समितीने निवडलेल्या योग्य कौटुंबिक वातावरणात ठेवणे. 

 

प्रायोगिक तत्वावर पुणे, सोलापूर, अमरावती, मुंबई उपनगर आणि पालघरमध्ये अंमलबजावणी

 

कुटुंबात राहिल्याने मुलांचा सर्वांगीण विकास होत असल्याने महिला व बाल विकास विभागाकडून पुणे, सोलापूर, अमरावती, पालघर, मुंबई उपनगर या पाच जिल्ह्यात ही फॉस्टर केअर योजना प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात येत आहे. योजनेच्या तयारीच्या अनुषंगाने या पाच जिल्ह्यातील सर्व बाल संरक्षण यंत्रणांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले. या योजनेतंर्गत प्रत्येक जिल्ह्यात ४० मुलांची निवड करण्यात येणार असून प्रतीपालकत्व पालकांना (फॉस्टर पॅरेंट्स) मुलांच्या संगोपनासाठी दरमहा दोन हजार रुपये देण्यात येणार आहे. 

 

संकेतस्थळावर करता येणार नोंदणी

 

प्रायोगिक अर्थात प्रतिपालकत्व स्वीकारून योजनेत भाग घेऊ इच्छिणारे पालक महिला व बालविकास आयुक्तालयाच्या https://wcdcommpune.org या  संकेतस्थळावर अर्ज करू शकतील. 

 

00000


Thursday, July 30, 2020

लक्षणे नसलेल्या इच्छूक कोरोनाबाधितांचे गृह विलगीकरणात उपचार - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

कोरोना प्रतिबंधक उपाययोजना

लक्षणे नसलेल्या इच्छूक कोरोनाबाधितांचे गृह विलगीकरणात उपचार

-    जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 

अमरावती, दि. 30 :  इच्छूक कोरोनाबाधित रूग्णांच्या घरी विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था असल्यास त्यांना गृह विलगीकरणासाठी परवानगी देण्यात येणार आहे. येत्या 1 ऑगस्टपासून ही प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिली.

            जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना श्री. नवाल म्हणाले की, केंद्र शासनाने रुग्णांच्या गृह विलगीकरणासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातही इच्छूक रूग्णांना त्यांच्या घरीच विलगीकरणाची व्यवस्था असल्यास परवानगी देण्यात येईल. त्यासाठी किमान चार खोल्यांचे घर व त्यात दोन बाथरूम अटॅच्ड खोल्या असणे आवश्यक आहे जेणेकरून रूग्णाला  बाथरूमसह स्वतंत्र खोली राहण्यासाठी व उपचारासाठी वापरता येईल व इतर कुटुंबियांचीही सुरक्षितता जपली जाईल.

            ते पुढे म्हणाले की, ही प्रक्रिया जिल्ह्यात आकार घेईपर्यंत ती टप्प्याटप्प्याने राबवली जाईल. सुरुवातीला दोन दिवस संस्थात्मक विलगीकरण आणि नंतर गृह विलगीकरणाची परवानगी , असे त्याचे स्वरूप असेल. गृह विलगीकरणाच्या काळात रुग्णाच्या देखभालीसाठी केअरटेकरची व्यवस्था असणे आवश्यक आहे. याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनशी चर्चा करण्यात येत आहे.  रुग्णाला सतरा दिवसांसाठी विलगीकरणात राहावे लागेल. रूग्णास आरोग्यसेतू ॲपचा वापर करावा लागेल. त्याशिवाय, संपर्कासाठी आणखी एक ॲप विकसित करण्यात येत आहे.  वृद्ध, ज्येष्ठ किंवा इतर गंभीर आजारांच्या रूग्णांना परवानगी देण्यात येणार नाही.

यापूर्वी संस्थात्मक विलगीकरणात उपचार घेऊन बरे झालेल्या रूग्णांशी सतत संपर्क ठेवून विचारपूस करण्यासाठी हेल्थलाईन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचाही उपयोग गृह विलगीकरणातील व्यक्तींशी संपर्कासाठी होणार आहे.      

 

                                 

संचारबंदीच्या कालावधीत पी-1, पी- 2 तत्वावर दुकाने सुरू ठेवण्यासाठी यापूर्वी मान्यता देण्यात आली होती. मात्र, आता पी-1, पी-2 तत्वाची अट रद्द करण्यात आली आहे. शनिवार व रविवारी बाजारपेठा बंद ठेवण्याबाबत यापूर्वीच आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. ते कायम राहतील. ऑगस्टमधील पहिल्या पंधरवड्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.

         नागरिकांनी हातांची नियमित स्वच्छता, सोशल डिस्टन्स, मास्क वापर या दक्षता नियमांचा अवलंब करून स्वत:सह इतरांनाही सुरक्षित ठेवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मोदी हॉस्पिटलमध्ये घडलेला गैरप्रकार लांच्छनास्पद असून, गुन्हेगारास कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न होत आहेत.  सदर व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असा प्रकार घडता कामा नये, यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

0000

 


महिलांबाबत गैरप्रकार खपवून घेणार नाही - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर



मोदी हॉस्पिटलमधील गैरप्रकाराबाबत युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

कायद्याची जरब निर्माण करा

महिलांबाबत गैरप्रकार खपवून घेणार नाही

                  -         महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

          अमरावती, दि. 30 : मोदी हॉस्पिटलमध्ये घडलेला प्रकार अत्यंत घृणास्पद व निंदनीय असून सदर गुन्हेगारास कठोर शिक्षा मिळावी. सदर व्यक्तीविरुद्ध पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून, अटक करण्यात आली आहे. असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. अशा समाजकंटकांवर कायद्याची जरब निर्माण करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

 

          येथील मोदी रुग्णालयात एका युवतीचा कोरोना चाचणीसाठी थ्रोट स्वॅब घेतल्यानंतर लॅब टेक्नीशियनने तिला अनावश्यक चाचणी करण्यास सांगून गैरवर्तणूक केली. त्यानंतर युवतीला आक्षेपार्ह संदेशही पाठवले. या अश्लाघ्य प्रकाराची तक्रार पिडीत मुलीने बडेनरा पोलीसात नोंदवली आहे. पालकमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायद्याची जरब निर्माण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

 

          पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई, माता अहिल्या यांच्या महाराष्ट्रात असा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. महिलांचा सन्मान झालाच पाहिजे.  या प्रकरणी चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. त्यानुसार सदर टेक्निशियनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मुलींनी निर्भयपणे पुढे येण्याची गरज

 

          अनेकदा असे प्रकार घडले तरी मुली तक्रारी करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे अशा प्रवृत्ती फोफावतात. त्यामुळे मुलींनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रार केली पाहिजे व गुन्हेगारी वृत्तीला वेळीच ठेचले पाहिजे.          पालकांनीही याबाबत मुलींशी सुसंवाद ठेवून त्यांना निर्भय बनविले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत अन्याय सहन करता कामा नये. मुलींनी निर्भयपणे बोलावे, पुढे यावे, व्यक्त व्हावे. घाबरू नये. शासन खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे, असे श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

 

 

 

 

सुसंस्कार व समुपदेशनाची गरज

 

          युवा पिढीत अशी विकृती निर्माण होऊ नये म्हणून सर्वांनी एकत्रित आले पाहिजे. समाजातील अशी विकृती नष्ट करण्यासाठी सुसंस्कार व सातत्यपूर्ण समुपदेशनाची गरज आहे. महिलांचा सन्मान राखला गेला पाहिजे. त्यासाठी युवा पिढीला सुसंस्कारित करणे व विधायक कार्याकडे वळविण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.

 

          अमरावती जिल्ह्यातून महिला देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचली आहे. महिलांचा गौरव करणारी, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला वाव देणारी भूमी असा जिल्ह्याचा लौकिक आहे. या जिल्ह्यात असा प्रकार घडणे लांच्छनास्पद आहे. हा प्रकार अत्यंत संतापजनक असून, गुन्हेगाराला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. यापुढे असा प्रकार घडण्याची हिंमतच कुणात होऊ नये, यासाठी कायद्याची जरब निर्माण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

 

00000


Wednesday, July 29, 2020

जिल्ह्यातील 2 लाख 69 हजार शेतकऱ्यांना लाभ - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर



प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना

लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्तीसाठी पाच ऑगस्टपर्यंत विशेष मोहिम

जिल्ह्यातील 2 लाख 69 हजार शेतकऱ्यांना लाभ

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि.29: ज्या शेतकऱ्यांना अद्याप प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठी शासनाकडून येत्या पाच ऑगस्टपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुसार लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्ती करावी व नविन लाभार्थ्यांची नोंदणी करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.अमरावती जिल्ह्यात या योजनेत 3 लाख 14 हजार 598 खातेदारांची नोंदणी झाली आहे. पहिल्या हप्त्यासाठी वर्ग करण्यात आलेल्या खातेदारांची संख्या 2 लाख 91 हजार 258 आहे. योजनेत आतापर्यंत जिल्ह्यात 2 लाख 69 हजार 706 खातेदारांना लाभ देण्यात आला आहे.

 

जे शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित आहेत, त्यांना तो लाभ मिळवून देण्यासाठी शासनाकडून येत्या पाच ऑगस्टपर्यंत मोहिम हाती घेण्यात आली आहे. काही लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे त्रुटी असलेल्या माहितीमध्ये दुरुस्ती करण्यात यावी. त्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सविस्तर आढावा घेऊन मोहिम राबविण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत. या कालावधीत महसूल यंत्रणेसह जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व कृषि सहाय्यक यांनी परस्पर समन्वय ठेवून सर्व शेतकरी बांधवांच्या अर्जातील त्रुटी दूर कराव्यात व त्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.  

 

कोरोना संकटकाळात कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रे अडचणीत आहेत. हे लक्षात घेऊन शेतकरी बांधवांच्या हितासाठी महाविकास आघाडी शासनाकडून विविध योजना- उपक्रमांची अंमलबजावणी होत आहे. किसान सन्मान योजनेसह कर्जमुक्ती योजना व इतर योजनांनाही गती देण्याचे निर्देश दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

 

       खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक करण्यात आली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै अंतिम मुदत आहे. त्यानुसार योजनेत अधिकाधिक शेतकरी बांधवांचा सहभाग मिळविण्यासाठी मिशन मोडवर काम करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

योजनेत सहभागी होण्यासाठी बँक, तसेच आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी सेंटर) यांच्यामार्फत विमा अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. त्यामुळे अंतिम मुदतीपूर्वी शेतकरी बांधवांनी अर्ज भरून घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे. योजनेतील सहभागासाठी तत्काळ  जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी,  उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी, तसेच नजिकच्या आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी सेंटर) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही श्री. चवाळे यांनी केले आहे.

 

00000

 


Tuesday, July 28, 2020

पालकमंत्र्यांच्या हस्ते बेनोडा ग्रामपंचायत भवनाचे भूमिपूजन




पालकमंत्र्यांच्या हस्ते बेनोडा ग्रामपंचायत भवनाचे भूमिपूजन

पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी शासन कटिबद्ध

             -   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 28 : नागरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातही विविध पायाभूत सुविधांच्या उभारणीतून विकासाला गती देण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज बेनोडा येथे केले.

            वरूड तालुक्यातील बेनोडा येथील नियोजित ग्रामपंचायत भवनाचे भूमिपूजन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार देवेंद्र भुयार, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की,  रस्ते, सार्वजनिक इमारती, पाणीपुरवठा व विविध पायाभूत सुविधा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्यासाठी जिल्ह्यात निधीची कमतरता पडू देणार नाही. जिल्ह्यातील अपूर्ण कामे पूर्णत्वास नेण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा होत आहे. कोरोना संकटकाळामुळे काही कामांत अडथळे आले तरी त्यावर मात करून या कामांना चालना देण्यात येत आहे. कोरोना संकटकाळातही प्रत्येक अडचण दूर करून विकासाची गती वाढविण्यासाठी शासन व प्रशासनाकडून सर्वदूर प्रयत्न होत आहेत.

या काळात रोजगाराची निर्मिती करण्याची गरज लक्षात घेऊन प्राधान्याने मनरेगातून पायाभूत सुविधांची कामे राबविण्यात आली. ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीसाठी अमरावती जिल्ह्यात जलसंधारण, रस्ते आदी अनेक कामांना चालना देण्यात आली. त्यातून मोठी रोजगारनिर्मिती झाली. या कामांत अमरावती जिल्हा सुरुवातीपासून आघाडीवर राहिला, असेही त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायतभवनासाठी 15 लक्ष निधी मंजूर आहे. ग्रामपंचायत भवनामुळे गावातील सुविधेत भर पडणार आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या सार्वजनिक इमारतींची कामेही पूर्णत्वास जाण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. प्रशासनानेही या कामांना गती द्यावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.     

                             

विलगीकरण कक्षालाही भेट

बेनोडा शहिद येथील क्वारंटाईन सेंटरला भेट देऊन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी तेथील व्यवस्थेची पाहणी केली. रूग्णांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढविले.

                                                00000

बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर








पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत वरुड येथे आढावा बैठक

कडक नियंत्रणाचे निर्देश

बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 28 : कोरोना संकटकाळात दक्षतेचे पालन न करता बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर कठोर कारवाई करून शिस्त निर्माण करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी वरुड येथे दिले.

वरुड तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा पालकमंत्री यांनी वरुड न.प. सभागृहात घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार देवेंद्र भुयार, नगराध्यक्ष स्वाती आंडे, पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

 

शहर व तालुक्यातील आरोग्य यंत्रणा, उपाययोजना, विलगीकरण स्थिती आदी विविध बाबींचा आढावा पालकमंत्र्यांनी यावेळी घेतला.  पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, स्वच्छता व निर्जंतुकीकरणासाठी साबणाचे द्रावण फवारणी, सडा यांचा वापर करावा. नागरिकांनीही घरालगतचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी असे द्रावण फवारणे उपयुक्त ठरेल. यंत्रणेने तपासण्यांची संख्या वाढवावी व सर्वेक्षणात सातत्य ठेवावे, असे निर्देश त्यांनी दिले.

 

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा अवलंब करता येतो. तसा उपाय आपण यापूर्वीही केला आहे. मात्र, स्वयंशिस्त पाळली तर लॉकडाऊनची वेळ येणार नाही आणि सर्व व्यवहार सुरळीत ठेवूनही सुरक्षितता जोपासता येईल. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

 

लॅब टेक्निशियनबाबत पाठपुरावा करू

 

वरुड तालुक्यात सहा लॅब टेक्निशियन मिळाल्यास स्वॅब मिळवणे व तपासणीच्या कामाला वेग येईल, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. त्यानुसार प्रस्ताव द्यावा. आपण त्याचा पाठपुरावा करू, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

 

                                

रुग्णवाहिकेची उपलब्धता

कोरोना संशयितांसाठी वरूड तालुक्याला स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यास उपाययोजनांना गती येईल, अशीही मागणी करण्यात आली. त्यानुसार अशी रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. आमदार श्री. भुयार यांनीही याबाबत सकारात्मकता दर्शवली व त्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले.

 

तालुक्यातील  अपूर्ण पाणीपुरवठा योजना, तसेच नव्याने करावयाची कामे याबाबत प्रस्ताव द्यावेत. त्याचा पाठपुरावा करून ते पूर्णत्वास नेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

 

लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही व्हावी

 

            कोरोना प्रतिबंध उपाययोजना व इतरही योजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही करावी. सर्वांशी समन्वय ठेवून कार्यवाही होणे अपेक्षित आहे जेणेकरून उपाययोजनेची परिणामकारता वाढेल, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.         

 

00000


विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...