कुपोषणमुक्तीसाठी राज्य शासन प्रयत्नरत - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मातामृत्यू कमी असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र देशात दुसरा

कुपोषणमुक्तीसाठी राज्य शासन प्रयत्नरत

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. १९:  सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्वेच्या (एसआरएस) प्रकाशित झालेल्या अहवालात  मातामृत्यू दर कमी असणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र राज्याला देशात दुसरा क्रमांक मिळाला आहे. शासनाकडून मातामृत्यू, तसेच कुपोषण रोखण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न होत आहेत, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी केले. 

केंद्रीय नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्वेच्या यादीत केरळनंतर महाराष्ट्राचा मातामृत्यू दर कमी आहे. महाराष्ट्राचा मातामृत्यू दर ६८ वरून ६१ नंतर ५५ आणि आता ४६ असा कमी झाला आहे. या सर्वेनुसार देशाचा मातामृत्यू दर हा ११३ आहे. संयुक्त राष्ट्र संघाने माता मृत्यू दर कमी करण्यासाठी नेमून दिलेल्या शाश्वत विकास ध्येयाची पूर्तता देशातील पाच राज्यांनी केली असून त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र देशात अग्रेसर असताना माता मृत्यू दर कमी असलेल्या राज्यांच्या यादीतही  महाराष्ट्राने दुसरा क्रमांक मिळविला, ही बाब दिलासा देणारी आहे. राज्यात संस्थात्मक बाळंतपणात वाढ झाली असून त्यामुळे मातामृत्यू रोखणे शक्य होत आहे. राज्यातील गर्भवती मातांच्या आणि नवजात अर्भकांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्यात २४८ प्राथमिक संदर्भ सेवा केंद्र (फर्स्ट रेफरल युनिट) सुरू करण्यात आले असून त्यामाध्यमातून संस्थात्मक बाळंतपण वाढविण्यावर भर दिला जात आहे. माहेर योजनेच्या माध्यमातूनही दुर्गम भागात मातामृत्यू रोखण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

 

                           कुपोषणमुक्तीसाठी विशेष प्रयत्न

 

कुपोषणमुक्तीसाठी राज्यात सर्वत्र सकस आहार पुरवठ्याला गती देण्यात येणार आहे. कुपोषण हा केवळ दुर्गम क्षेत्रातील प्रश्न नाही, तर महानगरातही ही समस्या आढळून येते. त्यासाठी सकस आहार पुरवठा सर्वदूर करण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याचे नियोजन होत आहे. बाळाच्या जन्माआधीपासून मातेला सकस आहार मिळणे व बाळाच्या जन्मानंतर त्या बालकाला सकस आहार मिळत राहाणे,    असा व्यापक विचार करून योजना राबविण्याचा मानस आहे, असेही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

         

 मेळघाटात प्रभावी यंत्रणा

 

कुपोषण मुक्तीसाठी मेळघाटात आशा सेविका अंगणवाडी सेविका ग्रामसेवक आरोग्य सेवक यांच्या समन्वयातून प्रभावी संपर्क यंत्रणा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.लहान बालकांचे योग्य पोषण होणे हा अंगणवाडी केंद्रांच्या कामामागील उद्देश आहे. कुपोषण निर्मूलनासाठी बालकांचे नियमित वजन, उंची मापन करून वयानुरूप वाढ होते का हे पाहिले जाते, त्यामुळे कोरोना संक्रमणाचा कालावधी असला तरी आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना व सावधानता बाळगून या कामात खंड पडू दिला जाऊ नये, असे निर्देश यंत्रणेला दिले आहेत.

    कोरोना परिस्थितीमध्ये लहान बालकांचे लसीकरण, योजनेअंतर्गत गृहभेटी, जमेल तेथे ऍपवर प्रशिक्षण, गृहभेटीच्या वेळी प्रशिक्षण, पोषण आहार वाटप अशी कामे अंगणवाडी सेविका तत्परतेने करीत आहेत. दुर्गम भागातही कुपोषणमुक्तीच्या योजना उपक्रम राबविण्यात त्यांचे योगदान मिळत आहे पुढेही गाव, प्रा. आ. केंद्र व तालुका पातळीवरील  यंत्रणांच्या समन्वयातून हे योजना व उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले

 

00000

 


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती