पालकमंत्र्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून केले अडचणींचे निराकरण




पालकमंत्र्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून केले अडचणींचे निराकरण

दक्षता त्रिसूत्रीचा अवलंब करावा

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

          अमरावती, दि. 28 : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सातत्यपूर्ण स्वच्छता, मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सचे पालन या दक्षता त्रिसूत्रीचा अवलंब करणे अपरिहार्य आहे. कुणीही ते टाळून आपल्यासह इतरांचेही आरोग्य धोक्यात आणू नये, असे कळकळीचे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज नेर पिंगळाई येथे केले.

         कोरोनाबाधित व्यक्ती आढळलेल्या विविध गावांना भेट देऊन तेथील उपाययोजनांचा आढावा  पालकमंत्री श्रीमती ठाकूर या सातत्याने घेत आहेत. आज त्यांनी मोर्शी तालुक्यातील नेर पिंगळाई, सावरखेड या गावांना भेट देऊन तेथील उपाययोजनांचा आढावा घेतला, तसेच क्वारंटाईन सेंटरला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली व दाखल नागरिकांशीही संवाद साधून मनोबल वाढवले.

       पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी गावांत कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.उपविभागीय अधिकारी  नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, स्थानिक पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

                                             निर्जंतुकीकरणात सातत्य ठेवा

गावात स्वच्छता व निर्जंतुकीकरणात सातत्य आवश्यक आहे. वेळोवेळी फवारण्या व्हाव्यात. साबणाचे द्रावण फवारणीचा प्रयोग काही ठिकाणी होत आहे. त्याचा अवलंब व्हावा.अद्यापही अनेकदा नागरिक त्याचे पालन करताना दिसत नाहीत.  असे दुर्लक्ष आपल्या स्वतःसह इतरांनाही धोक्यात टाकणारे असते. त्यामुळे नागरिकांनी दक्षता नियम पाळावेत, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.कोरोना संकटकाळात अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांचा गौरवही पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला.

                                विविध अडचणींचे निराकरण

 सावरखेड येथे महसूल मंडळाच्या तांत्रिक त्रुटींमुळे पीक विमा योजनेत सहभागासाठी अडचणी येत असल्याची तक्रार आहे. तत्काळ तिचे निराकरण करावे.पीएम किसान योजनेच्या  अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी प्रशासनाला दिले.

                           प्रलंबित मजुरीचा प्रश्न प्राधान्याने सोडविणार

नेर पिंगळाई येथील नाल्याच्या कामाबद्दल सुमारे साडेतीन लाख रूपये मजुरी प्रलंबित असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली.  हा प्रश्न तत्काळ सोडविण्यात येईल. त्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे पालकमंत्री यांनी सांगितले.

00000

 

 


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती