पालकमंत्र्यांकडून जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी






पालकमंत्र्यांकडून जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची
  पाहणी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई मिळवून द्यावी

           - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 9: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या, तसेच बियाणे न उगविल्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढविलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, यासाठी सविस्तर सर्वेक्षण अहवाल तयार करून नुकसान भरपाई उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.मोर्शी तालुक्यातील विचोरी येथील नुकसानग्रस्त शेत शिवाराची पाहणी पालकमंत्री ऍड.  ठाकूर यांनी केली, त्यानंतर आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

 

उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार मोरे, उपविभागीय कृषी अधिकारी सातपुते यांचे सह अनेक अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विचोरी गावातील शेत शिवारात पेढी नदीचे पाणी शिरले. त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांचे शेतीतील पेरणी केलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. कपाशी, सोयाबीन अशा अनेक पिकांचे नुकसान झाले आहे.

त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती क्षेत्राचे तत्काळ सर्वेक्षण करून पंचनामा करून नुकसानाबाबत अहवाल सादर करावे, असे स्पष्ट निर्देश महसूल प्रशासन व कृषी विभागाला त्यांनी दिले.

 

सर्वेक्षण व्यापक स्वरूपात व्हावे. एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटता कामा नये. शेतकरी बांधवाना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली व शेतकरी बांधवांशी  चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांचे निराकरण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.खरीप हंगामात बियाणे उगवण न झाल्याच्या अनेक तक्रारी मोर्शी तालुक्यात प्राप्त झाल्या आहेत. विचोरी गावातील शेतकऱ्यांच्या सुध्दा बियाणे न उगविल्याच्या तक्रारी आहेत. सदर तक्रारी संदर्भात बियाणे कंपनीकडून भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी, असे निर्देश त्यानी संबधित यंत्रणाना दिले.

 

यासंबंधी नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कंपन्यांना निर्देश दिले आहेत. भरपाईचे वाटपही होत आहे. मात्र, काही कंपन्यांकडून हयगय होत असल्यास कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

                                                                                     नया वाठोडा येथे रस्त्याचे भूमिपूजन

 

           यावेळी दौऱ्यात, मोर्शी तालुक्यातील नया वाठोडा येथे चौदाव्या वित्त आयोग म ग्रा रो ह यो अभिसरण अंतर्गत सात लाख रुपयांच्या निधीतून सिमेंट काँक्रीट रस्त्याचे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. प्रस्तावित रस्त्याचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावे. परिसरातील नागरिकांसाठी ती चांगली सुविधा होईल. या अनुषंगाने इतरही विविध कामांना गती मिळावी, असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले.जिल्हा परिषदेचे सदस्य संजयराव घुलक्षे, शंकर चव्हाण व गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रमही यावेळी झाला.

 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती