Wednesday, July 8, 2020

भरपाई न देणा-या कंपन्यांवर कठोर कारवाईचे पालकमंत्र्यांचे निर्देश

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश

      सदोष बियाणे तक्रारीबाबत शेतक-यांना नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात

      

  भरपाई न देणा-या कंपन्यांवर कठोर कारवाईचे पालकमंत्र्यांचे निर्देश

 

 

       अमरावती, दि. 24 : सदोष बियाण्यामुळे पीकाची उगवण न झाल्याच्या शेतकरी बांधवांच्या तक्रारींची दखल घेत संबंधित कंपन्यांकडून तातडीने नुकसानभरपाई देण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्यानुसार कंपन्यांकडून शेतक-यांना नुकसानभरपाई दिली जात असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे यांनी दिली.दरम्यान, नुकसानभरपाई न देणा-या कंपन्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.

 

     कोरोना संकटामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांपुढे सदोष बियाण्यामुळे आणखी अडचण उभी राहिली आहे. त्यामुळे त्यांना नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे.  बियाणे अधिनियमाअंतर्गत सदोष बियाणे आढळल्यास संबंधित कंपनीने शेतक-यांना नुकसानभरपाई दिली पाहिजे, अन्यथा कृषी विभागाने कंपन्यांविरुद्ध कडक कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते.

 

          पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार तपासणी पथकांची संख्या वाढवत पंचनामा प्रक्रियेला वेग देण्यात आला. जिल्ह्यात प्राप्त झालेल्या 1 हजार 28 तक्रारींनुसार पाहणी करण्यात आली आहे. त्यानुसार महाबीज व विविध कंपन्यांकडून भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी श्री. चवाळे यांनी दिली.ज्या शेतकरी बांधवांनी महाबीजचे बियाणे पेरले व ते उगवून आले नाही अशा तक्रारीची तातडीने दखल घेऊन तपासणी अहवालाची वाट न पाहता बियाणे बदलून देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना शासनाकडून महाबीजला यापूर्वीच देण्यात आल्या. त्यानुसार जिल्हा कृषी कार्यालयाने तत्काळ महाबीजशी संपर्क साधून कार्यवाही करण्यात आली आहे. महाबीजकडूनही बियाणे बदलून देण्यात येत असल्याचे श्री. चवाळे यांनी सांगितले.

 

जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे व या वर्षी पाऊस वेळेवर झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्याही वेळेवर केल्या. त्यामुळे जिल्ह्याच्या अनेक भागातून सोयाबीनचे बियाणे उगवण न झालेल्या बाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्याबाबत व्यापक सर्वेक्षण करून तात्काळ पंचनामे करून शेतक-यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी. दुबार पेरणीचे संकट सोसणारा एकही शेतकरी बांधव त्यापासून वंचित राहता कामा नये. प्रशासन व अधिकारी वर्गाने स्वत: पाठपुरावा करून पंचनाम्यानुसार कंपन्यांकडून भरपाई दिली जाते किंवा कसे, याचा पडताळा घ्यावा. कंपन्यांकडून कुठेही हयगय होत असल्याचे आढळल्यास तत्काळ गुन्हा दाखल करावा , असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत. 

 

           जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उगवण न झाल्याबाबतच्या तक्रारी संबंधित तालुका कृषी अधिकारी कृषी सहाय्यक अथवा तलाठी यांच्याकडे तात्काळ द्याव्यात, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात सोयीबीन बियाणे उगवण न झाल्याबाबत महाबीज, राष्ट्रीय विमा निगम, उत्तम सीडस्, बसंत ॲग्रो (विक्रांत) या कंपनीच्या तक्रारी प्राप्त झाल्या. उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत पाहणी होत आहे, अशी माहिती श्री. चवाळे यांनी दिली.

 

श्री. चवाळे म्हणाले की, जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे सरासरी क्षेत्र 2.94 लाख असून, प्रत्यक्षात 1 लाख 60 हजार 304 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. एकूण क्षेत्राच्या तुलनेत हे प्रमाण 54.48 टक्के आहे. सर्वेक्षणातून सर्व तक्रारींचे निराकरण होण्यासाठी तत्काळ अहवाल देण्यासाठी व भरपाई मिळण्यासाठी कंपन्यांकडे पाठपुरावा करत आहोत, असे श्री. चवाळे यांनी सांगितले.

 

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...