पेढी पूरग्रस्त परिसराची पालकमंत्र्यांकडून पाहणी













अतिवृष्टीग्रस्त भागातील नुकसानाचे तत्काळ पंचनामे करा

                                            -   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

नदी खोलीकरणाबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश

 

 

अमरावती, दि. 3 : गत आठवड्यात अतिवृष्टीने पेढी नदीला पूर येऊन पेढीकाठच्या गावांचे, शेतांचे नुकसान झाले आहे. मोर्शी  तालुक्यातील पातूर, अडगाव, काटसूर परिसरातील, तसेच अमरावती तालुक्यातील सावंगा व अंतोरा  परिसरातील शेतांचे, तर काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या या नुकसानीबाबत दोन दिवसात परिपूर्ण सर्वेक्षण करून पंचनामे करावेत, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज मोर्शी- अमरावती तालुक्यातील दौऱ्यादरम्यान दिले.

        नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी काटेकोर सर्वेक्षण करण्याचे निर्देश देतानाच शेतकरी बांधवांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाहीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. दि. 30 व 1 तारखेला अतिवृष्टीमुळे पेढी नदीला पूर येऊन पेढीकाठच्या नुकसान झालेल्या भागाची पाहणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज केली. यावेळी त्यांनी पातूर, अडगाव, काटसूर, सावंगा, अंतोरा येथे भेट देऊन शेती, रस्ते, पुलांची पाहणी केली, तसेच गावातील शेतकरी बांधवांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांचे निराकरण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार सिध्दार्थ मोरे, अमरावतीचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष काकडे, उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपुते, अविनाश पांडे  यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, अतिवृष्टीमुळे पेढी नदीला आलेल्या पुरामुळे काटसुर, पातुर, अडगाव, सावंगा, अंतोरा परिसरातील गावांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात नदीचे पाणी घुसून पिके वाहून गेल्याचे दिसून येते. सोयाबीन, तूर, कपाशी यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  त्यामुळे या नुकसानीचे काटेकोर सर्वेक्षण करण्यात यावे. प्रत्येक शेतकरी बांधवांशी, स्थानिक नागरिकांशी चर्चा करून परिपूर्ण पाहणी करावी व पंचनामे तात्काळ सादर करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

            पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, अतिवृष्टीने नदीचे पाणी वाढून शेतीत घुसल्याने नुकसान झाले. नदीत मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. येथील गाळ काढण्याचे काम यापूर्वीच होणे आवश्यक होते. प्रशासनाने यापूर्वीच ही कामे न राबवल्याबद्दल पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली व पुढील काळात होणा-या पावसामुळे असे नुकसान टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना अंमलात आणाव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.

अमरावती तालुक्यातील सावंगा व अंतोरा या गावांना भेट देऊन तेथील नुकसानाची पाहणीही पालकमंत्र्यांनी केली. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, अंतोरा गावात नाल्याचे पाणी घुसून नुकसान झाले. त्याचे सविस्तर सर्वेक्षण करून पंचनामे करावे. नाला खोलीकरणाच्या कामाचे नियोजन करून अहवाल सादर करावा. त्याचप्रमाणे, पांदणरस्त्याचेही काम पूर्ण करावे.  नदी खोलीकरणाची कामे सर्वच परिसरात राबवावीत. अनेक ठिकाणी पेढीचे पात्र अरूंद झाले. हे पात्र मोकळे करणे, गाळ काढणे, बांध मोठे करणे ही कामे पूर्ण करावीत. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तत्काळ द्यावा.

 

नुकसानग्रस्त रस्ते, पुलाचीही पाहणी

 

            पातूर- राजुरा रस्त्याच्या कामाला गती द्यावी. हा रस्ता पूर्ण झाल्यास राजूर- काटसूर अंतर कमी होईल. विचोरी- अडगाव रस्त्यावरील पुलाची व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या रस्ते व पुलाची तत्काळ दुरूस्ती करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

 

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती