शेतक-यांचे उत्पन्न वाढण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान सर्वदूर पोहोचवावे - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

                                     

पालकमंत्र्यांकडून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

कृषी दिन आणि कृषी संजीवनी सप्ताहाचा जिल्ह्यात शुभारंभ


 


अमरावती, दि. 1 : शेती उत्पादनाबरोबरच शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात भर पडावी व शेतकरी बांधव आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व समृद्ध व्हावा, यासाठी कृषी क्षेत्राच्या विकासाचे धोरण राज्य शासनाकडून राबवले जात आहे. कृषी संजीवनी सप्ताहाच्या माध्यमातून अद्ययावत कृषी तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनाजयंतीनिमित्त अभिवादन केले, तसेच कृषी दिनाच्या तसेच कृषी विभागातर्फे आयोजित कृषी संजीवनी सप्ताहाच्या शुभेच्छाही जिल्ह्यातील नागरिकांना दिल्या. कृषी विभागातर्फे कृषीदिन व कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभांरभ आज जिल्ह्यात विविध ठिकाणी झाला.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला अन्न-धान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण केले. ते स्वत: प्रयोगशील शेतकरी आणि कृषीतज्ज्ञ होते. शेती आणि सिंचन क्षेत्राच्या आपल्या अभ्यासाचा राज्याच्या धोरणात त्यांनी प्रभावीपणे उपयोग केला. माजी मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांनी आपल्या कार्यातून महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपला अमीट ठसा उमटवला आहे. त्यांच्या कार्य व विचारांपासून प्रेरणा घेऊन राज्य शासन कृषी क्षेत्राच्या विकासाचे धोरण राबवत आहे.  

पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसूत्रीचा अवलंब करत कृषी संजीवनी सप्ताह साजरा करायचा आहे. शेतीचे उत्पादन वाढण्याबरोबरच शेतक-यांचे उत्पन्नही वाढले पाहिजे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाला पाहिजे. कृषी तंत्रज्ञानातील छोटीशी सुधारणा देखील पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करू शकते. त्यामुळे अद्ययावत तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवावे. त्यासाठी कृषी संजीवनी सप्ताहाचा उपक्रम गावोगाव प्रभावीपणे राबवावी. जिल्ह्यातील स्थानिक स्थितीचा संदर्भ लक्षात घेऊन उपक्रम सर्वदूर राबविण्याचे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.  

 

सात जुलैपर्यंत विविध कार्यक्रम

 

         शेतकरी बांधवांच्या बांधावर निविष्ठा पुरवठ्याच्या उपक्रमानंतर आता अद्ययावत कृषी तंत्रज्ञान शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम कृषी संजीवनी सप्ताहाद्वारे राबवला जात आहे. प्रत्येक तालुक्यात उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिपूर्ण नियोजन करण्याचे व कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, तज्ज्ञ यांना सहभागी करून घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार कृषी विभागाकडून विविध तालुक्यांत कार्यक्रमांना आज सुरुवात झाली असून, सात जुलैपर्यंत कार्यक्रम राबविण्यात येतील, अशी माहिती जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे यांनी दिली.

श्री. चवाळे म्हणाले की, या संपूर्ण सप्ताहात कृषि विकास अधिकारी व प्रकल्प संचालक (आत्मा) यांच्यासह दररोज किमान एका गावातील तर उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांनी दररोज किमान दोन गावांतील कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कृषीविषयक नाविन्यपूर्ण उपक्रमांना भेटी देऊन त्याची माहिती इतरांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. एम किसान पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. आज शुभारंभानिमित्त गोपाळपूर पिंप्री येथे कृषी अधिका-यांनी शेतकरी बांधवांसह श्रमदान केले, तसेच कमी खर्चातील तंत्रज्ञान व सहकारातून स्वावलंबन साध्य  करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आल्याची माहितीही श्री. चवाळे यांनी दिली.

कोरोना संकटकाळ लक्षात घेऊन शक्य तिथे प्रत्यक्ष संवाद व अनेक ठिकाणी सोशल मीडिया या माध्यमाचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांसह गावपातळीवरून कृषी सहायक, कृषी अधिकारी यांनाही जबाबदारी देण्यात आली आहे. झूम ॲपच्या माध्यमातून दुर्गापूर कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. के. पी. सिंह यांचे सोयाबीन व कापूस पीक व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण, पशुधन विकास अधिकारी डॉ. रामेश्वर अढाऊ यांचे पावसाळ्यात पशुधनाची घ्यावयाची काळजी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. कोरोना संकटकाळामुळे स्वतंत्र कार्यक्रम न घेता विविध तालुक्यात स्थानिक अधिका-यांमार्फत शेतीच्या बांधावर जाऊन 44 प्रयोगशील शेतकरी बांधवांचा सत्कार करण्यात आला, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी कुर्बान तडवी यांनी दिली.

 

                                              00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती