कुपोषण निर्मूलन उपाययोजनांसाठी बालकांची नियमित वजनमापे महत्वाची वजने घेण्याच्या कामात खंड पडता कामा नये - ऍड. यशोमती ठाकूर

कुपोषण निर्मूलन उपाययोजनांसाठी बालकांची नियमित वजनमापे महत्वाची*

वजने घेण्याच्या कामात खंड पडता कामा नये

                       - ऍड. यशोमती ठाकूर

 

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची दिली ग्वाही

 

मुंबई, दि.15: लहान बालकांचे योग्य पोषण होणे हा अंगणवाडी केंद्रांच्या कामामागील महत्वाचा उद्देश आहे. कुपोषण निर्मूलनासाठी बालकांचे नियमित वजन, उंची मापन करून वयानुरूप वाढ होते का हे पाहिले जाते, त्यामुळे कोरोना संक्रमणाचा कालावधी असला तरी आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना व सावधानता बाळगून या कामात खंड पडू दिला जाऊ नये. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांबाबत सकारात्मक विचार निश्चितच केला जाईल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज दिली.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती या संघटनेच्या प्रतिनिधी एम. ए. पाटील आणि अन्य सदस्यांनी ऍड. ठाकूर यांना भेटून निवेदन सादर केले. याप्रसंगी एकात्मिक बाल विकास योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो उपस्थित होत्या.संघटनेने निवेदनामध्ये म्हटले आहे की, नागरी भागातील तसेच ग्रामीण भागातही कोरोनाचा होत असलेला संसर्ग पाहता लहान बालकांना अंगणवाडी केंद्रावर पाठविण्यास पालक इच्छुक नाहीत. तसेच काही अंगणवाड्या या शाळांच्या परिसरात असून शाळांमध्ये कोरोनाच्या कारणामुळे काही व्यक्तींना क्वारंटाईन  केलेले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी अंगणवाडी सुरू करणे धोकादायक आहे. कोरोना परिस्थितीमध्ये लहान बालकांचे लसीकरण, योजनेअंतर्गत गृहभेटी, जमेल तेथे ऍपवर प्रशिक्षण, गृहभेटीच्या वेळी प्रशिक्षण, पोषण आहार वाटप अशी कामे अंगणवाडी सेविका तत्परतेने करीत आहेत. त्यामुळे अंगणवाडी केंद्रे चालू करण्याची सक्ती करू नये.

काही जिल्हे व महानगरपालिका क्षेत्रात प्रशासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना रक्तशर्करा तपासणी, ताप, रक्तदाब, स्वॅब तपासणी अशी वैद्यकीय तांत्रिक कामे सोपविली असून ज्यामध्ये योग्य ज्ञान नसल्यामुळे  अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोरोनाचा धोका संभवतो. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ही तांत्रिक कामे लावू नयेत. बदलापूर तसेच अन्य काही ठिकाणी या अशा कामांना नकार दिल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणीदेखील संघटनेने केली आहे. याविषयी मंत्री ऍड. ठाकूर यांनी आपत्ती व्यवस्थापन, मदतकार्य मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी तातडीने दूरध्वनीवरून चर्चा केली.

बालकांची वजनमापे घेताना होणारा प्रत्यक्ष संपर्क टाळणे तसेच वजनकाटे घरोघरी घेऊन फिरणे प्रत्येक वजनानंतर सॅनिटाइझ करणे, एकच झोळीकाटा सर्व ठिकाणी वापरणे या मर्यादांमुळे कोरोनाचा धोका बालकांना  आहे. त्यामुळे वजन, उंची घेण्याच्या कामाला स्थगिती द्यावी, प्रतिबंधित क्षेत्रात कलम १४४, काही ठिकाणी संचारबंदी असे प्रतिबंध असल्यामुळे अंगणवाडीच्या कामांना स्थगिती द्यावी. काही ठिकाणी खासगी जागांमध्ये असलेली अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यास जागामालकांनी विरोध केला आहे. या बाबीचाही विचार करावा. तसेच ५५ वर्षापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्ती, गरोदर, स्तनदा माता, व्याधीग्रस्त व्यक्तींना असलेला कोरोनाचा धोका पाहता या गटातील कर्मचाऱ्यांना अंगणवाडी कामातून वगळावे, आदी मागण्यादेखील निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

 

0000

 


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती