जिल्ह्यात सव्वा सहा हजार मेट्रीक टन युरिया होणार उपलब्ध

पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश

जिल्ह्यात सव्वा सहा हजार मेट्रीक टन युरिया होणार उपलब्ध

आठवडा भरात होणार सर्वदूर वितरण

अमरावती, दि. 18 : जिल्ह्यात युरियाचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्याच्या महिला व बालविकासमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. इफको, आरसीएफ आदी विविध कंपन्यांमार्फत युरिया बडनेरा, धामणगाव रेल्वे येथील रेल्वे रेक पॉईंटवर पोहचला आहे. पुढील आठ दिवसात विविध कंपन्यांच्या सहा हजार 350 मेट्रीक टन युरियाचा पुरवठा सर्व तालुक्यात केला जाणार आहे.

आरसीएफमार्फत एक हजार 300 मेट्रीक टन युरिया बडनेरा येथे पोहचला असून इफको मार्फत एक हजार 550 मेट्रीक टन युरिया धामणगाव रेल्वे येथे उद्या पोहचत आहे. युरियाचे जिल्ह्यात सर्वदूर गतीने वितरण होण्यासाठी कृषी विभागाने काटेकोर नियोजन करुन सगळीकडे युरिया उपलब्ध ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.  

रासायनिक खतांची विक्री इलेक्ट्रॉनिक मशिनद्वारे करणे बंधनकारक असून शेतकरी बांधवांनी कापूस, ज्वारी, मका व फळबागांच्या क्षेत्रानुसार आवश्यक युरियाची खरेदी करताना पीक पेरा क्षेत्र व आधार कार्ड सोबत ठेवावे. तसेच पीओएस मशीन वरुन युरियाची खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे.

जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात युरिया उपलब्ध होत असल्याने कापूस, ज्वारी, मका व फळबागा यांच्या क्षेत्रानुसार आवश्यक तेवढाच युरिया खरेदी करावा व विक्री केंद्रावर अनावश्यक गर्दी टाळून आरोग्याची काळजी घ्यावी. आवश्यक दस्तऐवज सोबत ठेवावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

सोयाबीन, मुग, उडीद, तूर या शेंगवर्गीय द्विदल पिकांमध्ये नत्र शोषून घेण्याची नैसर्गिक क्षमता असल्याने या पिकांमध्ये युरियाचा वापर टाळावा. या पिकांमध्ये जिवाणू संघाचा आवर्जून वापर करावा. इतर पिकांवर सुद्धा युरियाचा अतिरिक्त वापर टाळावा कारण त्यामुळे पिकांना फुले व फळे येण्याचा कालावधी लांबतो व पिकांची कायिक वाढ होवून पिके जास्त मऊ व लुसलुशीत होतात व रोगाचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे युरिया खताचा अतिरेकी वापर टाळावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी श्री. चवाळे यांनी केले आहे.

00000

 


--

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती