Monday, July 27, 2020

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसह लोकशिक्षणावर भर द्यावा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर





कोरोनावर मात करण्यासाठी सामाजिक वर्तनात बदल आवश्यक
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसह लोकशिक्षणावर भर द्यावा

-         पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

       अमरावती, दि. 27 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित आहे. परंतू, गत दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यात संक्रमितांची संख्या वाढलेली आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी जनमानसांनी मास्क लावणे, हात नेहमी स्वच्छ धुणे, निजंर्तुकीकरण आदी सवयीसह सामाजिक वर्तणात बदल आणला तरच कोरोनावर मात करता येईल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज  सांगितले.

 

     जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात आढावा पालकमंत्र्यांनी घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. महापौर चेतन गावंडे, आमदार प्रताप अडसळ, आमदार राजकुमार पटेल, आमदार सुलभाताई खोडके, जि.प.अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख,जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलीस आयुक्त संजय बावीस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिपक रणमले यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

 

     श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्यात दर शनिवार व रविवारी कडक जनता कर्फ्यु पाळण्यात येत आहे. संक्रमितांवर तत्काळ उपचार व संपर्कातील व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी येत्या काळात डॉक्टरांचे पॅनल निर्माण करुन शहरी भागात मोहल्ला कमेटीव्दारे तर ग्रामीण भागात कोरोना नियंत्रण समितीव्दारे प्रत्येक नागरिकांवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. रोजगाराचा प्रश्न मिटविण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे कठोर पालनासह पी1, पी 2 ही उपक्रमांतर्गत बंद दुकाने 31 जुलैनंतर पुन: खुली करण्यात येणार आहे. जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात लोकसंख्येचे प्रमाणानुसार रॅपीड ॲन्टीजेन चाचण्या वाढविण्यात येणार आहे. कोरोना संक्रमितांची साखळी तोडण्यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन येत्या काळात सात किंवा पंधरा दिवासाकरीता कडक लॉकडाऊन लागू करण्याचे विचार करण्यात येणार आहे.  

 

      कोरोना विषाणू बाधितांना तत्काळ उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाव्दारे ऑक्सीमीटरसह व्हेंटीलेटर आदी साहित्याची सुविधा उपलब्ध केली आहे. पॉझीटिव्ह व नॉन पॉझिटिव्ह व्यक्तींसाठी अकरा आयसोलेशन सेंटर तयार करण्यात आले आहे. याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कोरोना न घाबरता, आजाराची लक्षणे दिसल्यास तत्काळ कोविड रुग्णालयात जावून चाचणी करुन घ्यावी, घाबरुन घरीच राहिले तर उपचारासाठी उशीर होतो व संक्रमितांची सख्याही वाढते. हे टाळण्यासाठी स्वत: रुग्णालयात जावून चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.

 

कोरोना विषाणूची भिती घालविण्यासाठी तसेच याविषयी जनसामान्यांमध्ये सतर्कता व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती होण्यासाठी प्रसिध्दी पत्रकांचे वितरण आणि छोटे छोटे व्हीडिओच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, अश्या सूचनाही त्यांनी आरोग्य विभाग व पोलीस विभागाला दिल्या.

00000

 

 

 


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...