कुपोषणमुक्तीसाठी सकस आहार पुरवठ्याला गती देणार - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

कोरोना मुकाबल्यासाठी स्थानिक स्तरावर प्रयोगशाळा, प्लाझ्मा यंत्रणा

संकटकाळातही पायाभूत सुविधांना चालना



कुपोषणमुक्तीसाठी सकस आहार पुरवठ्याला गती देणार

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 16 : कोरोना संकटकाळात निर्माण झालेल्या विविध अडचणींचा सामना करत शासन- प्रशासनाने विविध सुविधा व योजनांना चालना दिली. प्रभावी उपचारयंत्रणेसाठी प्रयोगशाळा, प्लाझ्मा सुविधा, कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. एकीकडे कोरोना संकटाचा मुकाबला सुरू असताना पायाभूत सुविधा व महत्वाच्या कामांनाही चालना देण्यात आली. त्याचप्रमाणे, कुपोषणमुक्तीसाठी राज्यात सर्वत्र सकस आहार पुरवठ्याला गती देणार, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

नवराष्ट्र व नवभारत वृत्तपत्र समूहातर्फे ‘कोरोना संकटकाळात शासन- प्रशासनाचे प्रयत्न’ या विषयावर वेबिनार आज आयोजित करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. नवभारतचे संपादक धनराज गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार,  नवभारतचे प्रतिनिधी त्रिदीप वानखडे, सार्वनजिक बांधकाम विभागाचे अभियंता चंद्रकांत मेहेत्रे, विभावरी वैद्य, अनिल जवंजाळ आदी यावेळी उपस्थित होते.सर्वप्रथम पालकमंत्र्यांनी महत्वाच्या विषयावर वेबिनार आयोजित केल्याबद्दल नवभारत वृत्तपत्रसमूहाचे अभिनंदन केले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की,  कोरोनाचे संकट सर्व जगासाठी नवे होते. त्याच्या मुकाबल्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जात असतानाच विकासाची कामे सुरू ठेवणे हेही आव्हान होते. या काळात सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. मात्र, शासन- प्रशासनाने अहोरात्र काम करून कामांना गती दिली. उपचारपद्धती निश्चित करण्यापासून ते स्वतंत्र कोविड रुग्णालय उभारणे, तालुका स्तरावर कोविड केअर सेंटरची उभारणी, अहवाल तपासणीसाठी स्थानिक स्तरावर प्रयोगशाळा, प्लाझ्मा यंत्रणा, मनुष्यबळाचे प्रशिक्षण, समाजात जनजागृती अशी अनेकविध कामे सुरु असतानाच काही काळ बंद असलेल्या उद्योग- व्यवसायांना चालना देऊन रोजगारनिर्मितीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.

 

 

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना देण्यात आली. त्यातून जलसंधारण, इमारत बांधकाम, रस्तेदुरुस्ती अशी अनेक कामे अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरु झाली. त्यामुळेच सुरुवातीपासूनच अमरावती जिल्हा मनरेगाअंतर्गत रोजगारनिर्मितीच्या कामात आघाडीवर आहे. स्थलांतरित व प्रवासी नागरिकांना प्रवास व्यवस्था करून त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविणे, निवारा केंद्रांतून निवास व भोजनाची सोय, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग मिळवणे या उपायांबरोबरच खरीपाच्या पूर्वतयारीसाठी वेळोवेळी आढावा घेऊन पीक कर्ज वितरण, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी अशा कामांनाही गती देण्यात आली.

       त्या पुढे म्हणाल्या की, कुपोषण हा केवळ दुर्गम क्षेत्रातील प्रश्न नाही, तर महानगरातही ही समस्या आढळून येते. त्यासाठी सकस आहार पुरवठा सर्वदूर करण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याचे नियोजन होत आहे. बाळाच्या जन्माआधीपासून मातेला सकस आहार मिळणे व बाळाच्या जन्मानंतर त्या बालकाला सकस आहार मिळत राहाणे, असा व्यापक विचार करून योजना राबविण्याचा मानस आहे.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम म्हणाले की, कोरोना संकटकाळात अहोरात्र उपाययोजना होतच आहेत, मात्र, नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून सोशल डिस्टन्सिंगसारखे उपाय कटाक्षाने पाळलेच पाहिजेत.

कोरोनाची जोखीम सर्वांना समान आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला पाहिजे.श्रीमती शर्मा म्हणाल्या की, पावसाळ्यापूर्वी 23 रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली व ती पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न आहे. पूल, रस्ते, इमारतींच्या बांधकामाला गती देण्यात आली आहे. काहीशी निधीची अडचण असली तरी महत्वाची कामे थांबलेली नाहीत.श्री. मेहेत्रे, श्रीमती देशपांडे, श्री. पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. श्री. वानखडे यांनी सूत्रसंचालन केले.

 

                                    000

 


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती