Friday, July 17, 2020

गोट बँकेचा उपक्रम महिलांना स्वावलंबी बनवेल - ऍड. यशोमती ठाकूर




गोट बँकेचा उपक्रम महिलांना स्वावलंबी बनवेल

               - ऍड. यशोमती ठाकूर

 

बांबूपासून बनविलेल्या पर्यावरणपूरक राख्या विदेशी बनावटीला सक्षम पर्याय

 

बांबूच्या राख्यांचे उद्धाटन

गोट बँक उपक्रमासाठी सामंजस्य करार

 

मुंबई, दि. १७: माविमच्यावतीने सुरू करण्यात येत असलेला गोट बँकेचा उपक्रम अतिगरीब महिलांच्या आर्थिक  सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरेल. शेळीपालनातून होणाऱ्या कमाईतून चलन फिरते राहिल्यामुळे उपजीविकेला हातभार लागण्यासह जीवनमान सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांनी बांबूपासून बनविलेल्या आकर्षक राख्यांचे उद्घाटन करताना; या पर्यावरणपूरक राख्यांची निर्मिती हे कोविड परिस्थितीत संकटातून संधी कशा प्रकारे निर्माण करता येतात याचे उत्कृष्ट उदाहरण होय, असे कौतुकोद्गारही ऍड. ठाकूर यांनी काढले.

 

अकोला आणि अमरावती जिल्ह्यात प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात येत असलेल्या 'गोट बँक' उपक्रमासाठी राज्य शासनाच्यावतीने महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि कारखेडा कृषी उत्पादक कंपनी, अकोला यांच्यामध्ये सामंजस्य करार (एम.ओ.यु.) करण्यात आला. तसेच बांबूपासून निर्मित राख्यांच्या सचित्र यादीपुस्तकाचेही (कॅटलॉगचे) उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे लाभार्थी महिलांशी संवाद साधण्यात आला. याप्रसंगी राज्यमंत्री श्री. बच्चू कडू ऑनलाईनरित्या तर मंत्रालयात ऍड. ठाकूर यांच्यासह माविमच्या अध्यक्षा श्रीमती ज्योती ठाकरे, महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी, कारखेडा कृषी उत्पादक कंपनीचे संचालक नरेश देशमुख उपस्थित होते.

 

गरीब महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी माविम उत्कृष्ट काम करत असल्याचे सांगून मंत्री ऍड. ठाकूर म्हणाल्या, कोरोना महामारी हे मोठे संकट आहे. तथापि, ग्रामीण महिलांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यास कुटुंबाचे जीवनमानही उंचावले जाते. याच उद्देशाने महिलांसाठी विषेश उपजीविका प्रकल्प राबविण्यात येत आहे. माविमअंतर्गत लोकसंचालित साधन केंद्र (सीएमआरसी) तसेच सामूहिक उपयोगिता केंद्रे (सीएफसी) त्यासाठी काम करत आहेत. गोट बँक उपक्रमांतर्गत माविमच्या महिला बचत गट सदस्य महिलांना नाममात्र प्रक्रिया शुल्क आकारून प्रत्येकी एक शेळी वितरित करण्यात येणार आहे. या शेळीच्या पहिल्या चार वेतातून ४ पिल्ले गोट बँकेला परत केल्यानंतर ही शेळी पुर्णतः संबंधित महिलेच्या मालकीची होईल. अशा प्रकारे गोट बॅंकेतील शेळ्यांची संख्या वाढत जाण्यासह जास्तीत जास्त महिला सदस्यांना या योजनेचा लाभ देता येईल. हा उपक्रम अकोला व अमरावतीमध्ये यशस्वी ठरल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा मानस आहे, असेही ऍड. ठाकूर म्हणाल्या.

 

चंद्रपूर जिल्ह्यात चिचपल्ली येथील बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्राच्या सहयोगाने बांबू पासून कलात्मक वस्तू बनविण्याचे माविमच्या बचतगटातील महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी चिमूर, मूल तसेच चंद्रपूर तालुक्यात  ६ 'सीएफसी' स्थापन करण्यात आली आहेत. त्यातून बांबूपासून घड्याळ, सोफा, बांबू डायरी, फोटो फ्रेम आदी कलात्मक हस्तकौशल्याच्या वस्तू बनविल्या जातात. त्या बनविण्यात येत असताना वाया जाणाऱ्या टाकाऊ वस्तूंपासून उत्कृष्ट अशा प्लास्टिकमुक्तीला चालना देणाऱ्या  पर्यावरणपूरक राख्या बनविण्यात येत असल्याचे समजून आनंद होत आहे. कोविड सारख्या संकटाच्या काळातही न डगमगता या महिलांनी संकटाचे रूपांतर संधीमध्ये केले आहे. चिनी उत्पादनांवरील नागरिकांचा रोष पाहता या स्वदेशी राख्यांना मोठा प्रतिसाद मिळेल. यामुळे ग्रामीण रोजगाराला चालना मिळेल. यापुढेही माविमने असे नाविन्यपूर्ण उत्पादनांचे उपक्रम हाती घ्यावेत, राज्य शासन या महिलांच्या पाठीशी खांबीरपणे उभे राहील, असेही मंत्री ऍड. ठाकूर म्हणाल्या.

 

श्रीमती ठाकरे म्हणाल्या, गोट बँक हा उपक्रम ग्रामीण महिलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणेल. अकोला, अमरावतीनंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक गोट बँक स्थापन करण्यात येईल. तसेच बांबूच्या पर्यावरणपूरक राख्यांना महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून पुढील काळात उत्पादनात मोठी वाढ करण्यात येईल.श्रीमती श्रद्धा जोशी यांनी गोट बँक उपक्रमाची आणि राखी निर्मिती प्रकल्पाची माहिती यावेळी दिली. कार्यक्रमादरम्यान अकोला जिल्ह्यातील शेळी प्रकल्पातील निवडक लाभार्थ्यांशी तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील राखी तयार करणाऱ्या महिलांशी ऑनलाईन संवाद साधण्यात आला. 

 

 

00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...